शामळ : ( ? सुमारे १६९० – ? १७६९). गुजराती कवी. पित्याचे नाव विरेश्वर व गुरूचे नाव नानाभट्ट. शामळ व्यवसायाने कथेकरी होता. सिंहुज गावात रविदास नावाच्या धनिकाच्या आश्रयाने त्याने ४० वर्षे वास्तव्य केल्याचा उल्लेख आढळतो. प्राचीन संस्कृत तसेच जैन व इतर साहित्यातील कथाप्रसंगांची त्याने कल्पकतेने वेधक पुनर्निर्मिती केली. मध्ययुगीन गुजराती कथाकाव्यपरंपरेतील तो सर्वाधिक लोकप्रिय कवी होय. शामळाने एकूण सु. २६ कथाकाव्ये रचली. त्यांपैकी सिंहासनबत्रीशी, सुडाबहोतेरी, मदनमोहना, पद्मावती, चंद्रचंद्रावर्ती, बरस कस्तुरी  इ. उल्लेखनीय आहेत. रंजकतेवर भर देणारी शामळची कथाकाव्ये पौराणिक अद्‌भुतरम्यता, लोकव्यवहाराचे सूक्ष्म दर्शन, साधी व सुबोध शब्दकळा व वेधक कथनकौशल्य यांनी नटलेली आहेत. मदनमोहना, विनेचटनी वार्ता इ. काव्यकृतींतून तत्कालीन गुजराती काव्यात अभावानेच आढळणाऱ्या शृंगाररसाचा परिपोष साधला आहे. त्याने ‘छप्पा’ (सहा ओळींची चतुरोक्ती) या रचनाप्रकाराचा मुबलक वापर केला. त्याचे हे छप्पे गुजराती साहित्यात विशेष प्रसिद्ध आहेत. कथाकाव्यांखेरीज शामळाने अंगदविष्टि, रावण मंदोदरी संवाद, शिवपुराण इ. पौराणिक काव्ये रचली. त्यांत त्याने दोहा, चौपाई इ. वृत्तरचनांचा तसेच ब्रज बोलीभाषा तसेच अरबी-फार्सी शब्दांचा अधूनमधून लक्षणीय वापर केलेला आहे.

पेंडसे, सु. न.