जोशी, सुरेश हरिप्रसाद : (३१ मे १९२१ –  ). आधुनिकगुजरातीतील प्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक. जन्म सुरत जिल्ह्यातील वालोड ह्या गावी. १९४५ मध्ये ते मुंबई विद्यापीठातून एम्. ए. झाले. नंतर कराची, वल्लभ विद्यानगर व बडोदा येथे गुजरातीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. १९६१ मध्ये ते पीएच्. डी. झाले. संस्कृत, इंग्रजी व गुजराती ह्या भाषा-साहित्यांचा त्यांचा सखोल व्यासंग आहे. सध्या ते बडोदा येथे महाराजा सयाजीराव विद्यापीठात गुजरातीचे प्रपाठक आहेत. फाल्गुनी, वाणी, मनिषा, क्षितिज  ह्या गुजराती नियतकालिकांचे त्यांनी काही काळ संपादन केले.

पाश्चात्त्य प्रभावातून जे अस्तित्ववादी नवे साहित्य गुजरातीत निर्माण होत आहे, त्याचे नेतृत्व सुरेश जोशी यांनी केले. घटना, पात्रे व परिस्थिती यांच्या चित्रणांतून मानवी भावभावना वर्णन करण्याऐवजी अस्तित्ववादी संकुल प्रतिमांद्वारे स्वत:ची मनोव्यथा अभिव्यक्त करणाऱ्या ह्या गुजराती कवींनी जीवनातील अर्थशून्यता व परिवेदना तसेच जीवनाबाबतची व विश्वाबाबतची अश्रद्धा व्यक्त केली आहे. प्रत्यंचा (१९६१) ह्या सुरेश जोशींच्या काव्यसंग्रहात नवकाव्याची सर्व लक्षणे सर्वप्रथम स्पष्टपणे व्यक्त झाली आहेत. त्यांच्या काव्यापेक्षाही त्यांनी अस्तित्ववादाच्या संदर्भात मांडलेल्या नवकाव्यविषयक विचारांनी त्यांचे अनुयायी अधिक प्रभावित झाले आहेत. काव्याप्रमाणेच गुजराती कथा व कादंबरी ह्या क्षेत्रांतही त्यांनी नवे प्रवाह आणले. गृहप्रवेश (१९५७), बीजी थोडीक (१९५८), अपि च (१९६४), कथाचक्र, न तत्र सूर्यो भाति (१९६७) हे त्यांचे कथासंग्रह होत. यांतील कथांमध्ये बोध व उपबोध मनांतील सूक्ष्म संवेदनांचे त्यांनी प्रतीकांच्या द्वारे चांगले चित्रण केले आहे. त्यांच्या नंतरच्या कथांत मात्र तोचतोपणा जाणवू लागला आहे. छिन्नपत्र (१९६५) आणि मरणोत्तर (१९७३) ह्या त्यांच्या कादंबऱ्या. छिन्नपत्र  ही प्रतीकांच्या साहाय्याने मनोविश्लेषण करणारी त्यांची प्रयोगात्मक कादंबरी आहे. त्यांची ही कादंबरी घटनाविरहित असून विषाद आणि वेदना ह्या नायक-नायिकेचे तसेच मृषात्व, शून्यता, वैफल्य इत्यादींचे तीत प्रतीकात्मक चित्रण आहे.

काव्य, कथा, कादंबरी यांशिवाय त्यांनी काही ललित निबंध आणि समीक्षाग्रंथही लिहिले असून काही भारतीय व परकीय साहित्यकृतींचे गुजरातीत अनुवादही केले आहेत. जनांतिके (१९६५) आणि इदं सर्वम् (१९७१) हे त्यांच्या ललित निबंधांचे संग्रह होत. गुजराती साहित्यात एक श्रेष्ठ समीक्षक म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे. किंचित (१९६०), गुजराती कविता नो आस्वाद (१९३२), कथोपकथन (१९६९), काव्यचर्चा (१९७१), श्रुण्वंतु (१९७२) व अरण्यरुदन (१९७६) हे त्यांचे विचारप्रवर्तक समीक्षाग्रंथ होत. त्यांच्या समीक्षेस व कथांस गुजरात सरकारचे पुरस्कार लाभले आहेत. क्काएट फ्‍लोज द डॉनच्या भाषांतरासाठी त्यांना सोव्हिएट लँडचा नेहरू पुरस्कार लाभला. गुजराती साहित्यातील ‘रणजीतराम सुवर्णचंद्रक’ही त्यांना मिळाला. रवींद्रनाथ टागोर यांच्या दोन ग्रंथांचे तसेच शैलजानंद मुखोपाध्याय यांच्या कादंबरीचा त्यांनी गुजरातीत अनुवाद केला. त्यांची नावे अनुक्रमे पंचमित्र (निबंधसंग्रह, १९४४), मृत्यू (तत्त्वज्ञानपर, १९५०) व अभिशाप (कादंबरी) ही होत.

पेंडसे, सु. न.