दिवेटिया,नरसिंहराव भोळानाथ : (१८५९–१९३७). गुजरातीचे एक प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ, टीकाकार, कवी व निबंधलेखक. अहमदाहबाद येथे जन्म. दिवेटियांची शैक्षणिक कारकीर्द अतिशय उज्ज्वल होती. बी. ए. ला संस्कृतचे भाऊ दाजी पारितोषिक त्यांनी मिळविले होते. शिक्षण पूर्ण होताच वडीलांच्या इच्छेनुसार ते सरकारी नोकरीत शिरले व १९१२ साली निवृत्त झाले. त्यानंतर १९२१ साली मुंबई सरकारने गुजरातीचे सन्मान्य प्राध्यापक म्हणून त्यांची एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पुन्हा काही काळासाठी नेमणूक केली होती.

त्यांचा कुसुममाळा हा काव्यसंग्रह १८८७ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातील कविता संख्येने फारशा नसल्या तरी शैली, भाषा व आशय या दृष्टीने त्यातील काव्य पूर्वीच्या गुजराती काव्यापेक्षा वेगळे होते. भावकाव्याच्या स्वरूपाचे असून त्यात प्रथमत समस्कृत वृत्तांचा वापर केला होता. नंतरच्या गुजराती काव्यावरही या दोन गोष्टींचा प्रभाव पडला. अर्वाचीन गुजराती काव्याचा प्रारंभ या संग्रहापासूनच मानला जातो. यानंतर हृदयवीणा (१८९६) आणि नुपूरझंकार (१९१४) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूवर लिहिलेली स्मरणसंहिता (१९१५) ही विलापिकाही प्रसिद्ध आहे. ते टिकाकार म्हणूनही प्रसिद्ध होते. या निमित्ताने त्यांनी वादही पुष्कळ केले. मतांच्या बाबतीत अनेक पूर्वग्रह असले आणि अतिशय आग्रहीपणा असला, तरी त्यांचा निर्भयपणा व विषयाचा सखोल अभ्यासही त्यांच्या टीकालेखनात भरपूर दिसतो. त्यांचे समीक्षणात्मक लेखन मनोमुकुर या नावाने चार भागांत (१९२४–३८) प्रसिद्ध आहे. स्मरणमुकुर (१९२६) या त्यांच्या पुस्तकांत आपल्या जीवनातील अविस्मरणीय व्यक्तींची व घटनांची त्यांनी नोंद केलेली आहे. त्यांत साहित्यिक, सुधारक व विचारवंत आहेत. महाराष्ट्रीयांच्या दृष्टीने त्यांतील एक अविस्मरणीय व्यक्तिचित्र लोकहितवादी यांचे आहे. विवर्तलीला (१९३२) या त्यांच्या ग्रथांत त्यांचे जीवनविषयक चिंतन आलेले आहे. याशिवाय नाट्यविषयक अभिनयनकला (१९३०) हे छोटे पुस्तकही त्यांनी लिहिले. दिवेटिया आपली दैनंदिनीही लिहित. तिचे संपादन करून नरसिंहरावनी रोजनिशी (१९५३) या नावाने रामप्रसाद बक्षी व धनसुखलाल मेहता यांनी ती प्रसिद्ध केली. या दैनंदिनीतून त्यांचे निर्भय व सुंदर व्यक्तिमत्त्व दिसून येते.

त्यांच्या भाषाविषयक अभ्यासही अतिशय सखोल होता. त्यामुळे १९२१ मध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाची ‘विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्सʼ देण्यासाठी निवडण्यात आले. ही व्याख्याने नंतर गुजराती लँग्वेज अँड लिटरेचर या नावाने दोन भागांत प्रसिद्ध झाली. पहिल्या चार व्याख्यानांचा पहिला भाग १९२१ मध्ये व उरलेल्या तीन व्याख्यानांचा १९३२ मध्ये प्रसिद्ध झाला. या सात व्याख्यानांचे विषय पुढीलप्रमाणे होते : (१) भाषेच्या उत्क्रांतींवर परिणाम करणारे घटक, (२) भाषेवर परिणाम करणारी ऐतिहासिक व अन्य कारणे, (३) भाषेवर परिणाम करणारी वाग्व्यापारागत कारणे, (४) व (५) गुजराती भाषेचा इतिहास–तिची उत्क्रांती, (६) गुजराती साहित्याची ऐतिहासिक रूपरेषा व (७) गुजराती भाषा व साहित्य यांचे भविष्यकालीन वळण. यांपैकी ४ व ५ प्रकरणे ही अतिशय उद्‌बोधक असूनत्यांचा अभ्यास इतर इंडो–आर्यन भाषांच्या इतिहासाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारा आहे. गुजरातीच्या शुद्धलेखनाकडे त्यांनी लक्ष दिले होते. सर्वमान्य लेखनपद्धती यावी, यासाठी एक चर्चात्मक लेख लिहून त्यांनी तो गुजराती साहित्य परिषदेकडे पाठवला होता.

कालेलकर, ना. गो. पेंडसे, सु. न.

Close Menu
Skip to content