झवेरचंद कालिदास मेघाणी

मेघाणी, झवेरचंद कालिदास : (२७ ऑगस्ट १८९७? –९ मार्च १९४७). श्रेष्ठ गुजराती कवी व अष्टपैलू लेखक. सौराष्ट्रातील चोटिल गावी एका जैन कुटुंबात जन्म. त्यांच्या जन्म तिथीबाबत अभ्यासकांत मतभेद आहेत (काहींच्या मते २८ ऑगस्ट १८९६). अमरेली येथून मॅट्रिक झाल्यानंतर शामळदास कॉलेज भावनगर येथून त्यांनी पदवी घेतली. नंतर कलकत्ता येथे त्यांनी काही काळ नोकरी केली पण सौराष्ट्राच्या खेड्यातील जीवन आणि तेथील लोकसाहित्य यांच्या अनिवार ओढीमुळे ही नोकरी सोडून ते सौराष्ट्रात परत आले. त्यानंतर लोककथा, लोकगीते व इतर लोकसाहित्य गोळा करण्यासाठी ते सौराष्ट्रात सर्वत्र खूप भटकले.

त्यांनी सौराष्ट्रातील लोककथा संकलित करून त्या सौराष्ट्रनी रसधार या नावाने १९२३ ते १९४७ ह्या काळात चार खंडांत प्रसिद्ध केल्या. ह्या चार खंडांमुळे लोकसाहित्याचे एक गाढे संशोधक व अभ्यासक म्हणून त्यांना मान्यता मिळाली तसेच १९२८ मध्ये गुजरातीतील सर्वोच्च असा ‘रणजितराम सुवर्णचंद्रक’ देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला.

रढियाळी रात (१९२५–२७) या नावाने तीन खंडांत त्यांनी सौराष्ट्रातील लोकगीतेही प्रसिद्ध केली. सौराष्ट्रातील डाकूंवर त्यांनी दोन खंडांत सोरठी बहाखटिया (१९२७ व १९२८) हा ग्रंथ लिहिला. सौराष्ट्री गद्य-पद्यांचे संकलनही त्यांनी अनेक खंडांत प्रसिद्ध केले. लोकसाहित्याचा त्यांचा व्यासंग पाहूनच रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना ‘शांतिनिकेतन’ मध्ये या विषयावर काही व्याख्याने देण्यासाठी निमंत्रित केले.

पत्रकार म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फूलछाब ह्या साप्ताहिकाचे ते संपादक होते, जन्मभूमी ह्या प्रख्यात दैनिकात प्रारंभापासून (१९३३) ‘कलम अने किताब’ नावाचे साहित्यिक स्वरूपाचे साप्ताहिक सदर ते लिहीत. हे सदर त्यांनी शेवटपर्यंत चालविले. आजही हे सदर टिकून आहे.

मेघाणींच्या सर्जनशीलतेला अनेक पैलू होते. त्यांनी अनेक सुंदर कविता लिहिल्या. त्यांतून त्या काळाचे अंतःसत्त्व चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित होते. युगवंदना (१९३५) हा त्यांचा काव्यसंग्रह होय. त्यांच्या देशभक्तिपर काव्याने गांधी इतके प्रभावित झाले, की त्यांनी मेघाणींना ‘राष्ट्रीय शायर’ म्हणून संबोधित केले. मेघाणींनी रवींद्रनाथांच्या काही कवितांचे गुजराती भाषांतर रवींद्रवीणा नावाने प्रसिद्ध केले (१९४४).

त्यांचे सहा कवितासंग्रह, चौदा कादंबऱ्या, काही लघुकथासंग्रह, लोकसाहित्यसमीक्षा, आत्मचरित्रात्मक लेखन आणि स्फुट लेखांचे काही खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या गाजलेल्या कथा मेघाणीनी नवलिकाओ (२ खंड, १९३१, १९३५) नावाने संकलित आहेत. सोरठ तारां वहेतां पाणी (१९३७), विविशाळ (१९३९) व तुळसी क्यारो (१९४०) ह्या त्यांच्या गाजलेल्या कांदबऱ्या होत.

मेघाणींनी आपल्या अवघ्या सु. ५० वर्षांच्या आयुष्यात केलेले लेखन अतिशय महत्त्वाचे आहे. गद्यलेखनाची त्यांची अशी एक खास शैली होती. त्यांच्या काव्यातून व्यक्त होणाऱ्या भाववृत्तीच्या वैशिष्ट्यामुळे ते अनुकरणसुलभ नाही. गुजराती साहित्यातील त्यांचे स्थान चिरतंन महत्त्वाचे आहे. सौराष्ट्रात बोटाद येथे त्यांचे निधन झाले.

ब्रोकर, गुलाबदास (इं) सुर्वे, भा. ग. (म.)