शेले (शील), कार्ल व्हिल्हेल्म : (९ डिसेंबर १७४२- २१ मे १७८६). स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ व औषधनिर्माणशास्त्रज्ञ. अनेक कार्बनी अम्ले अलग करण्याबरोबरच ऑक्सिजन, क्लोरीन, मँगॅनीज, टंगस्टन, बेरियम, मॉलिब्डेनम इ. मूलद्रव्यांच्या शोधात त्यांनी मोलाची कामगिरी केली, तथापि त्यांच्या संशोधनाची उपेक्षा होऊन त्याचे श्रेय अन्य शास्त्रज्ञांच्या वाट्यास आले.
शेले यांचा जन्म स्ट्रालसुंड येथे झाला. माल्मो, स्टॉकहोम आणि अप्साला या शहरांत त्यांनी सु. १० वर्षे औषधविक्री व्यवसायात काम केले. या काळातच संशोधन करण्यास त्यांना वेळ मिळाला. अप्साला विदयापीठाचे प्राध्यापक आंडर्स युहान रेट्झिअस यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. १७७५ मध्ये त्यांनी कोपिंग येथे स्वतःच्या मालकीची रसशाळा सुरू केली.
रेट्झिअस यांनी १७७० मध्ये शेले यांचा टार्टार अर्कापासून टार्टारिक अम्ल वेगळे करण्याबाबतचा शोधनिबंध रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या स्मरणिकेत प्रकाशित केला. १७७४ मध्ये त्यांना पायरोल्युसाइटाचे (मँगॅनीज डाय-ऑक्साइडाचे) विश्लेषण करताना क्लोरीन व बॅरिटा (बेरियम ऑक्साइड) यांचा शोध लागला. त्यांनी हायड्रोक्लोरिक अम्लामधील पायरोल्युसाइटाचा विद्राव तापवून क्लोरीन तयार केला आणि त्याच्या अतितीव्र गुणधर्मांचा अभ्यास केला. या वायूच्या विरंजन क्रियेचीही नोंद केली परंतु या वायूला मूलद्रव्य म्हणून मान्यता मिळाली नाही. १८१० मध्ये ⇨ सर हंफी डेव्ही यांनी क्लोरिनाचे मूलद्रव्य स्वरूप दाखवून दिले आणि या शोधाचे श्रेय मिळविले. शेले यांनी मँगॅनिजाच्या विविध लवणांचे (उदा., मँगॅनेटे आणि परमँगॅनेट यांचे) वर्णन केले. त्यांनी लोखंड, तांबे व पारा यांच्या ऑक्सिडीकरण मात्रा वेगवेगळ्या असल्याचे दाखविले. १७७५ मध्ये त्यांनी आर्सेनिक अम्ल व त्याच्या विक्रिया यांचे संशोधन केले आणि अर्साइन (हायड्रोजन आर्सेनाइड) व कॉपर आर्सेनाइड (शेले ग्रीन) या रंगद्रव्याचा शोध लावला. त्यांनी मुतखड्यापासून प्रथमच यूरिक अम्ल तयार केले. क्वॉर्ट्झ, तुरटी व मुतखडा यांच्या विश्लेषणासंबंधीचा शोधनिबंधही त्यांनी प्रकाशित केला (१७७६).
शेले यांनी ऑक्सिजनासंबंधीचे प्रयोग १७७०-७३ मध्ये केले परंतु ते केमिकल ट्रिटाइज ऑन एअर अँड फायर या गंथामध्ये १७७७ पर्यंत प्रकाशित झाले नव्हते. ⇨ जोसेफ प्रीस्टली यांनी १७७५ मध्ये या वायूचा स्वतंत्रपणे शोध लावून प्रथम प्रसिद्घ केल्यामुळे या शोधाचे श्रेय त्यांना मिळाले. शेले यांनी आपल्या गंथात वातावरणातील एक वायू ज्वलनास मदत करतो आणि दुसरा ज्वलनास प्रतिबंध करतो, हे महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले. शेले यांनी प्रारंभिक वायू म्हणजे अग्नी-हवा किंवा ऑक्सिजन हा नायट्रिक अम्ल, सोरा (पोटॅशियम नायट्रेट), मँगॅनीज डाय-ऑक्साइड, ऑक्साइड ऑफ मर्क्युरी आणि इतर पदार्थांपासून तयार केला. १७७८ मध्ये त्यांनी वर्षभर दैनंदिन नोंदी ठेवून वातावरणा-तील ऑक्सिजनाच्या प्रतिशत प्रमाणांचा अंदाज प्रसिद्घ केला. शेवटपर्यंत ते फ्लॉजिस्टॉन सिद्धांताचे पुरस्कर्ते होते. [→ ऑक्सिजन].
शेले यांनी १७७७ मध्ये विविध पद्धतींनी हायड्रोजन सल्फाइड तयार केले. चांदीच्या संयुगांवर आणि इतर पदार्थांवर होणारी प्रकाशाची क्रिया प्रथम त्यांच्या लक्षात आली. कॅलोमेल (मर्क्युरस क्लोराइड) आणि अल्गॅरोथ चूर्ण (अँटिमनी ऑक्सिक्लोराइड) तयार करण्याच्या नवीन पद्धती त्यांनी शोधल्या (१७७८). त्यांनी मॉलिब्डेनाइट या खनिजापासून मॉलिब्डिक अम्ल तयार केले. तसेच हे खनिज सामान्य मॉलिब्डेनापासून (ग्रॅफाइट) वेगळे असल्याचे प्रथम ओळखले. त्यानंतर त्यांनी ग्रॅफाइटामध्ये फक्त कार्बनच असतो, असे दाखविले. लॅक्टिक अम्लामुळे दुधाला अम्लता येते असे त्यांनी दाखविले. नायट्रिक अम्लांबरोबर दुग्धशर्करा उकळवून त्यांनी म्यूसिक अम्ल मिळविले. १७८१ मध्ये ⇨ शीलाइट (कॅल्शियम टंगस्टेट) या खनिजाचा त्यांनी शोध लावला आणि त्यापासून टंगस्टिक अम्ल मिळविले. पुढे त्यांनी ईथर तयार करण्याचे प्रयोग प्रसिद्घ केले.
लिंबापासून सायट्रिक अम्ल, सॉ रेल वृक्षापासून ऑक्झॅलिक अम्ल, सफरचंदापासून मॅलिक अम्ल, मायफळापासून गॅलिक अम्ल, दुधापासून लॅक्टिक अम्ल आणि मूत्रापासून यूरिक अम्ल ही कार्बनी अम्ले वेगळे करण्याचे श्रेय शेले यांनाच जाते.
तीव्र संधिवाताने शेले यांचे कोपिंग येथे निधन झाले.
माळी, शशिकांत