सॅक्सो ग्र मॅटिकस : (बाराव्या शतकाचा मध्य-तेराव्या शतकाचा आरंभ). डॅनिश इतिहासकार. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही तथापि त्याचा जन्म लष्करी योद्ध्यां ची परंपरा असणाऱ्या कुटुंबात झाला. लॅटिन भाषा आणि साहित्य ह्यांचे उत्तम शिक्षण त्याला मिळाले होते. लुंडचा आर्चबिशप ॲब्सलॉन ह्याच्या पदरी ११७८-१२०१ दरम्यान त्याने कारकुनी केली. त्याच्याच विनंतीवरून त्याने Gesta Danorum (इं. शी. ‘स्टोरी ऑफ द डेन्स’) हा डेन्मार्कच्या इतिहासावरील ग्रंथ लिहिला. त्यात कल्पित (पुराणोक्त) राजा डॅनपासून प्रारंभ करून चौथ्या कॅन्यूट राजाच्या ११८५ मधील विजयश्रीपर्यंतचा इतिहास त्याने लिहिला आहे. या ग्रं थाचे एकूण १६ खंड आहेत. त्यांपैकी पहिले नऊ खंड विविध कथा, मिथ्यकथा, आख्यायिका, वीरगीते इत्यादींवर आधारले असून सु. ६० आख्यायिकीय स्वरुपाच्या डॅनिश राजांची माहिती असलेल्या या खंडांत हॅम्लेटची कथा आलेली आहे. ह्याच कथेवरून इंगज नाटककार ⇨ टॉमस किड ह्याने एक नाटक लिहिले होते. हे नाटक आज उपलब्ध नसले, तरी त्याच नाटकावरून शेक्सपिअरने हॅम्लेट हे त्याचे नाटक लिहिले असावे, असे म्हटले जाते. तसे असल्यास हॅम्लेटच्या कथेचे मूळ सॅक्सोच्या उपर्युक्त इतिहासग्रं थापर्यंत जाऊन पोहोचते, असे म्हणता येईल. आधुनिक लोकविद्येच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही हा इतिहासग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. हे महत्त्व जाणूनच ह्या ग्रंथाच्या पहिल्या नऊ खंडांचा अनुवाद इंग्र जीत (१८९४) आणि दोन वेळा जर्मन भाषेत (१९०० १९०१) करण्यात आला. उर्वरित सात खंडांत ऐतिहासिक घटनांचे निवेदन आहे. डेन्मार्कच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी हा भाग महत्त्वाचा आहे. सॅक्सोची निवेदनशैली उत्तम असून त्याची लॅटिन भाषा निर्दोष आणि आलंकारिक आहे. डेन्मार्कच्या मध्ययुगीन इतिहासावरील हा पहिला महत्त्वाचा ग्रंथ होय.

पहा : डॅनिश साहित्य.

यानसेन, बिलेस्कॉव्ह एफ्. जे. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)