शिकरा

शिकरा : हा ससाण्यासारखाच एक शिकारी पक्षी असून त्याचा ॲक्सिपिट्रिडी या पक्षिकुलात समावेश केलेला आहे. याचे शास्त्रीय नाव ॲक्सिपिटर बॅडियस असे आहे. मध्य आशिया, इराण, भारत, श्रीलंका, म्यानमार इ. देशांत शिकरा आढळतो. आकारमान व रंगव्यवस्था यांवरून या जातीच्या कित्येक प्रजाती पाडलेल्या आहेत. भारतात याच्या तीन प्रजाती आढळतात. त्यांपैकी दोन आपल्याकडे कायमच्या राहणाऱ्या असून तिसरी प्रजाती मध्य आशियातून हिवाळ्यात आपल्याकडे येते. हा पक्षी भारतात सगळीकडे व हिमालयात १,५२५ मीटर उंचीपर्यंत आढळतो.

साधारणपणे कबुतराएवढा हा असतो. नराची वरची बाजू निळ्या-करड्या रंगाची, हनुवटी व गळा पिवळसर आणि त्यांच्यावर मध्यभागी उभा करडा पट्टा, शेपटीवर चार-पाच आडवे काळसर पट्टे, छाती आणि पोटाकडचा भाग विटकरी रंगाचा आणि त्यावर पांढऱ्या नागमोडी आडव्या रेषा असतात. मादी नरापेक्षा मोठी असून तिच्या वरच्या बाजूचा रंग गडद तपकिरी असतो. डोळे नारिंगी-पिवळे, चोच आखूड, वाकडी आणि निळसर काळी, तर पाय गडद पिवळे असतात. खेड्यांच्या आणि शेतीच्या आसपासच्या झाडीत, त्याचप्रमाणे विरळ जंगलात हे पक्षी राहतात.

लहान पक्षी, उंदीर, खारी, बेडूक, टोळ वगैरे प्राणी यांचे भक्ष्य होत. झाडाच्या दाट पानांत तो लपून बसतो आणि भक्ष्य दृष्टीस पडल्याबरोबर त्याच्यावर झडप घालून ते पकडतो व झाडावर नेतो. तो नखांनी भक्ष्याला ओरबाडून, फाडून खातो. पुष्कळदा जमिनीपासून थोड्या उंचीवर घिरट्या घालीत तो भक्ष्याची टेहळणी करीत असतो. कित्येकदा सातभाई, होला या पक्ष्यांचा वेगाने पाठलाग करून तो त्यांना पकडतो. हा अतिशय धीट आणि क्रूर असतो. खेड्यापाड्यांतून कोंबडीच्या पिल्लांवर अचानक झडप घालून तो ती पळवितो. शिकरा दिसला की जवळपासच्या खारी आणि लहान पक्षी भीतीने ओरडून इतर प्राण्यांना संकटाची सूचना देतात.

भारतात बरेच लोक शिकऱ्यांना शिकारीचे शिक्षण देऊन तयार करतात. असे शिकरे लावा, तितर, कावळा यांच्यासारख्या मोठ्या पक्ष्यांची सहज शिकार करतात. पूर्वी राजेमहाराजे शिकरे व ससाणे बाळगीत असत व त्यांना शिकवून तयार करण्याकरिता खास अधिकारी नेमीत असत त्यांना ‘मीरशिकार’ म्हणत.

शिकऱ्याचे कर्कश ओरडणे कोतवाल पक्ष्याप्रमाणे मोठया आवाजाचे असते. मार्चपासून जूनपर्यंत यांचा विणीचा हंगाम असतो. विणीच्या हंगामात प्रणयक्रीडा करताना हे पक्षी ‘टिटुई’ असा तीव्र स्वर काढतात व हवेत नाना प्रकारचे खेळ करतात. घरटे काटक्याकुटक्यांचे बनविलेले असून त्याला बारीक गवत व मुळ्यांचे अस्तर असते. ते कावळ्याच्या घरट्यासारखे असून आंबा, वड किंवा अशाच एखाद्या मोठ्या झाडाच्या शेंड्याजवळ दाट पानांत असते. मादी तीन किंवा चार अंडी घालते. ती निळसर पांढऱ्या रंगाची असून त्यांच्यावर करड्या रंगाचे पुसट डाग असतात. अंडी उबविण्याचे काम फक्त मादीच करते. अंड्यांतून पिले बाहेर पडायला साधारणपणे तीन आठवडे लागतात.

कर्वे, ज. नी.