एकनाथी भागवत : वारकरीपंथास आधारभूत असलेला, एकनाथांचा महत्त्वाचा ग्रंथ. त्याची रचना १५७० ते १५७३ या काळाता झाली. संस्कृतमधील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही ओवीबद्ध मराठी टीका आहे. या ग्रंथाची एकूण ओवीसंख्या १८,८०० व अध्याय ३१ आहेत. मूळ भागवतावरील श्रीधरी टीकेच्या आधारे या ग्रंथाची रचना झालेली असली, तरी एकनाथांचे वेगळेपण कर्मविकर्मासारख्या विषयांत स्पष्ट झालेले आहे. भागवत धर्माची परंपरा, स्वरूप, वैशिष्ट्ये, ध्येये आणि साधने यांचे विस्तृत विवेचन या ग्रंथात आलेले असल्यामुळे, त्याला या पंथाच्या धर्मग्रंथाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सत्ताविसाव्या अध्यायात पूजाविधी सांगितला आहे. भक्तीच्या द्वारे परमार्थाची प्राप्ती करून घेण्याच सुलभ मार्ग प्रापंचिकांपुढे ठेवणे, हे या ग्रंथाचे प्रयोजन. सर्वांभूती समानता आणि भगवद्‌भाव हे नाथांच्या शिकवणीचे सार म्हणून सांगता येईल. या ग्रंथाची रचना आपल्या गुरूच्या आदेशावरून केल्याचे एकनाथ सांगतात. साडेचार चरणी विस्तारपूर्ण ओवीत लिहिलेल्या या ग्रंथाचे स्वरूप श्रीकृष्णोद्धवसंवादात्मक आहे. या ग्रंथाचे स्वरूप पाहून गुरूंनी ‘हे टीका तरी मराठी । परी ज्ञानदानें होईल लाठी’(३१·५३८) असे धालेपणाचे उद्‌गार काढले. ज्ञानेश्वरांच्या अनेक कल्पना, दृष्टांत, विचार, विषय यांचा मुक्तहस्ताने एकनाथांनी आपल्या या ग्रंथात वापर केला आहे. मूळ भागवत  ग्रंथ कथारूप आहे. कथानिवेदन आणि अध्यात्मबोध यांचा सुरेख समन्वय या ग्रंथात आढळून येतो. नाथांनी भक्ती, विरक्ती आणि ईशप्राप्ती एकरूप मानली आहेत.

पैठण येथे असतानाच एकनाथी भागवताचे पहिले पाच अध्याय लिहिले गेले. एकनाथांच्या एका चाहत्याने काशीस जाताना ते पाच अध्याय सोबत नेले. भागवत ग्रंथाचा हा प्राकृत अवतार पाहून काशीक्षेत्रात विद्वानांना क्रोध आला आणि जाब विचारण्याकरिता त्यांनी एकनाथांना काशीस बोलावून घेतले. तेथे असतानाच त्यांनी आपल्या संपूर्ण भागवताची रचना केली आणि ती विद्वज्‍जनांपुढे ठेवली. काशीच्या मणिकर्णिका घाटावर या ग्रंथाची रचना झाली. ग्रंथ विद्वज्जनांच्या पसंतीस उतरला आणि त्या ग्रंथाची त्यांनी काशी मध्ये मिरवणूक काढली.

जोशी, वसंत स.