जॉन ड्रायडन

(१९ ऑगस्ट १६३१–१ मे १७००). इंग्रज कवी, नाटककार आणि समीक्षक. आनिकल, नॉर्‌दॅम्प्टन येथे एका प्यूरिटन कुटुंबात जन्म. आरंभीचे शिक्षण वेस्टमिन्स्टर येथे. केंब्रिजच्या ‘ट्रिनिटी कॉलेजा’तून बी. ए. (१६५४). इंग्लंडचा सत्ताधीश ऑलिव्हर क्रॉमवेल ह्याच्या एका अधिकाऱ्याकडे ड्रायडनने काही काळ नोकरी केली, असे दिसते.

क्रॉमवेलच्या निधनावर लिहिलेले शोककाव्य ही त्याची पहिली उल्लेखनीय काव्यनिर्मिती (१६५९). त्यानंतर काही वर्षांतच द वाइल्ड गॅलंट (१६६३) ही सुखात्मिका लिहून तो उदरनिर्वाहासाठी नाट्यलेखनाकडे वळला आणि १६८१ पर्यंत त्याने मुख्यतः नाटकेच लिहिली. एसे ऑन ड्रॅमॅटिक पोएझी (१६६८) ह्या नावाचा त्याने लिहिलेला एक संवाद म्हणजे त्याच्या समीक्षालेखनाचा पहिला लक्षणीय प्रयत्न.

एक व्यावसायिक लेखक म्हणून जगावयाचे ठरविल्यानंतर ड्रायडनने सामान्यतः समकालीन वाङ्‌मयीन आणि राजकीय–धार्मिक मतमतांतरे ह्यांना अनुसरून आपले लेखन केले. क्रॉमवेलच्या निधनानंतर एक काव्य लिहून त्याने आपला शोक व्यक्त केला असला, तरी दुसरा चार्ल्स पुन्हा राजपदावर येताच त्याच्या स्तुतिपर कविता लिहून त्याने राजघराण्याशी चांगले संबंध जोडले. स्वभावातील तऱ्हेवाईकपणावर आधारलेल्या सुखात्मिक (कॉमेडी ऑफ मॅनर्स किंवा आचारविनोदिनी) ड्रायडनच्या काळात इंग्लंडमध्ये खूप लोकप्रिय झाल्या होत्या. हीन अभिरुचीच्या आणि स्वसंतुष्ट अशा अत्यंत मर्यादित प्रेक्षकवर्गासाठी त्या मुख्यतः लिहिल्या जात. ह्या आचारविनोदिनीच्या धर्तीवर ड्रायडननेही काही सुखात्मिका लिहिल्या. तथापि जॉर्ज एथरिज, विल्यम काँग्रीव्ह आणि विल्यम विचर्ली ह्या तत्कालीन श्रेष्ठ सुखात्मिकाकारांच्या नाट्यकृतींपुढे त्या निष्प्रभ ठरल्या.

आपल्या काव्यनिर्मितीच्या पहिल्या पर्वात ड्रायडनने मुख्यतः स्तुतिगीते, विलापिका अशी काही प्रासंगिक कविता लिहिली. तीतून त्याच्या श्रेष्ठ काव्यगुणांचा प्रत्यय येत असला, तरी आपल्या कवित्वाचे खरे सामर्थ्य उपरोधिकेतून आणि वादप्रवण कवितेतून विशेष प्रभावीपणे प्रगट होत असल्याची जाणीव त्याला होत गेली. आपल्या काळातील धार्मिक–राजकीय वादांत त्याने हिरिरीने भाग घेतला. ॲब्‌सलम अँड ॲचिटोफेल (१६८१) हे त्याच्या प्रभावी उपरोधकाव्याचे एक लक्षणीय उदाहरण. रूपकात्मक पद्धतीने एका तत्कालीन राजकीय प्रश्नावर ड्रायडनने त्यातून भाष्य केले होते. ‘चर्च ऑफ इंग्लंड’ चा पुरस्कार करण्यासाठी लिहिलेले रिलिजिओ लेसी (१६८२), पुढे रोमन कॅथलिक पंथाचा स्वीकार केल्यानंतर त्याची भलावण करणारे द हाइंड अँड पँथर (१६८७) ही ड्रायडनच्या उत्कृष्ट वादप्रवण कवितेची उदाहरणे होत. आपल्या नाट्यकृतींत अंतर्भूत करण्यासाठी त्याने लिहिलेल्या भावकवितांतून त्याच्या कवित्वाचा एक वेगळा पैलू दिसून येतो. एरव्ही त्याच्या काव्यरचनेतून भावनोत्कटतेपेक्षा वैचारिकतेचाच प्रत्यय विशेषत्वाने येतो. ड्रायडनच्या काव्यावर कृत्रिमतेचा आणि गद्यशीलतेचा आरोप एकोणिसाव्या शतकातील विल्यम हॅझ्‌लिट आणि वॉल्टर पेटरसारख्या समीक्षकांनी केला. तथापि अशा समीक्षेतील न्यूने टी.एस्. एलियटसारख्या श्रेष्ठ समीक्षकाने दाखवून दिली आहेत. अठराव्या शतकातील इंग्रजी कवितेत जे जे उत्तम आहे, त्याचे सूतोऽवाच ड्रायडनने केले त्याच्या कवितेच्या यथार्थ आकलनाशिवाय त्याच्या समकालीनांच्या, तसेच पोप आदी उत्तरकालीनांच्या कवितेला न्याय देता येणार नाही.

 नाटककार म्हणून ड्रायडनचे कर्तृत्व फारसे महत्त्वाचे नाही. त्याने एकूण २८ नाटके लिहिली. त्यांतील मॅरेज अ ला मोड (१६७२) सारख्या एखाद्या सुखात्मिकेचे यश अपवादभूतच म्हणावे लागेल. वीर वृत्तीच्या धीरोदात्त नायकांवर आधारलेल्या ‘हिरोइक’ शोकात्मिका लोकप्रिय करण्यात त्याने पुढाकार घेतला. नायकत्वाच्या कृत्रिम आणि अतिरंजित कल्पनांना त्यांत नाट्यरूप दिलेले असे. ड्रायडनच्या शोकात्मिकाही ह्या वैगुण्यांपासून अलिप्त नाहीत तथापि गुंतागुंतीची कथानके नेटका घाट देऊन उभी करण्यात त्याचे कौशल्य दिसून येते. द इंडियन क्वीन (१६६४), द काँक्केस्ट ऑफ ग्रानाडा (१६७०) आणि सर्वोत्कृष्ट गणली गेलेली ऑल फॉर लव्ह (१६७७) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय शोकात्मिका. आपल्या नाट्यलेखनासाठी निर्यमक ‘ब्लँक व्हर्स’ ऐवजी यमकबद्ध छंदाचाही त्याने उपयोग केला. ऑल फॉर लव्ह हे त्याचे ब्लँक व्हर्समधील पहिले नाटक.

 ड्रायडनचे समीक्षात्मक लेखन मुख्यतः प्रस्तावना, अर्पणपत्रिका इत्यादींतून विखुरलेले आहे. शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन आदी नाट्यप्रकारांची त्याने चर्चा केली भाषांतरकलेबद्दल विचार मांडले. इंग्रजी समीक्षेची परंपरा ड्रायडनपासून सुरू होते, असे मानले जाते. शेक्सपिअरसमीक्षेचा आरंभही त्यानेच केला. १६६० पर्यंत बेन जॉन्सन हा विशेष श्रेष्ठ नाटककार समजला जात असे आणि लोकप्रियतेच्या बाबतीत बोमंट आणि फ्लेचर हे दोन नाटककार आघाडीवर होते. ड्रायडनने शेक्सपिअरचे सर्वश्रेष्ठत्व निर्णायकपणे समकालीनांपुढे मांडले.

त्याने अन्य भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही केले. व्हर्जिलचे इनिड, होमरच्या इलिअडचा काही भाग, बोकाचीओच्या कथा इत्यादींचा त्यांत अंतर्भाव होतो.

साहित्यिक म्हणून आपली प्रतिमा ड्रायडनने हळूहळू विकसित केली आणि इंग्रजी साहित्यात स्वत:चे एक युग निर्माण केले. १६६८ मध्ये त्याला इंग्लंडचा राजकवी होण्याचा बहुमान प्राप्त झाला. तथापि १६८८ मध्ये झालेल्या क्रांतीत कॅथलिक पंथीय राजा दुसरा जेम्स पदच्युत झाल्यानंतर ड्रायडनचे राजकविपद काढून घेण्यात आले.लंडनमध्ये तो निधन पावला. त्याचे समग्र साहित्य डब्ल्यू. स्कॉट ह्याने १८ खंडांत संकलित केले आहे (१८०८).

संदर्भ : 1. Eliot, T. S. Homage to John Dryden, London, 1924.

2. Eliot, T. S. John Dryden: The Poet, the Dramatist, the Critic, New York, 1932.

3. Frost, W. Dryden and the Art of Translation, New Haven, 1955.

4. Nichol Smith, D. John Dryden, Cambridge, 1950.

5. Schilling, B. N. Ed. Dryden. A collection of Critical Essays, Englewood Cliffs, N. J., 1963.

6. Van Doren, M. The Poetry of John Dryden, New York, 1920.

 देवधर, वा. चिं.