बर्झीलियस (बर्सेलियस), यन्स याकॉप :(२० ऑगस्ट १७७९-७ ऑगस्ट १८४८). स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आधुनिक रसायनशास्त्राचे एक संस्थापक. विशेषतः मूलद्रव्यांच्या अणुभारांचे निश्चितीकरण, रासायनिक चिन्हांच्या आधुनिक पद्धतीचा विकास, विद्युत् रासायनिक सिद्धांत, काही मूलद्रव्यांचा शोध तसेच वैश्लेषिक रसायनशास्त्रातील अभिजात तंत्राचा विकास ही बर्झीलियस यांची महत्वाची कामगिरी मानण्यात येते. त्यांचा जन्म लिनकोयपिंगजवळील व्हॅव्हरसुंड सॉरगार्ड येथे झाला. गरीबीमुळे त्यांच्या शिक्षणात पुष्कळ अडचणी आल्या. तथापि चिकाटीने अप्साला येथे शिक्षण घेऊन त्यांनी १८०२ मध्ये वैद्यक विषयातील डॉक्टरेट पदवी मिळविली, त्याच वर्षी स्टॉकहोम येथील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यक व औषधनिर्मितिशास्त्र या विषयांचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि १८०७ मध्ये ते प्राध्यापक झाले. १८१५-३२ या काळात ते स्टॉकहोम येथे नवीनच स्थापन झालेल्या कॅरोलाइन मेडिकल-सर्जिकल इन्स्टिट्यूटमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते.

त्यांनी १८०७ च्या सुमारास कार्बनी रसायनशास्त्रातील संशोधनास प्रारंभ केला. त्यांनी रक्त, पित्त, दूध, हाडे इ. कार्बनी द्रव्यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. तथापि कार्बनी संयुगाच्या विश्लेषणाचे तंत्र त्या काळी अगदीच प्राथमिक अवस्थेत असल्याने त्यांचे कार्य अनिर्णायक स्वरूपात संपुषटात आले. त्यानंतर त्यांनी अकार्बनी रासायनिक संयुगांच्या संघटनाचे विश्लेषण करण्यास सुरूवात केली आणि सु. दहा वर्षाच्या काळात त्यांनी स्वतः विकसित केलेल्या तंत्रांच्या साहाय्याने सु. २,००० संयुगांचे भारात्मक विश्लेषण केले. त्यांनी ऑक्सिजन हा संदर्भ घेऊन त्याच्या सापेक्ष इतर मूलद्रव्यांचे अणुभार काढले. याकरिता त्यांनी जे.एल्.प्रूस्त यांचे रासायनिक संयुगांच्या संयोगाच्या निश्चित प्रमाणाचे तत्व, जॉन डाल्टन यांचा अणू सिद्धांत, जे.एल्. गे-ल्युसॅक यांचा संयोग पावणाऱ्या पदार्थांच्या घनफळांचा नियम यांचा आधार घेतला होता. भिन्न अणूंचे एकमेकांशी संयोग पावण्याचे प्रमाण व ४५ मूलद्रव्यांचे अणुभार यांचे पुष्कळसे अचूक कोष्टक त्यांनी आपल्या संशोधनावरून तयार केले व ते १८१८ मध्ये प्रसिद्ध केले आणि त्याच्या सुधारित आवृत्त्या १८२६ व १८२८ मध्ये प्रसिद्ध केल्या. त्यांना आधुनिक भारात्मक विश्लेषणाचे जनक समजण्यात येते. त्यांनी विश्लेषण पद्धतींत पुष्कळ सुधारणा केल्या व त्यांत अचूकता आणली. प्रयोगशाळेत आजही वापरात असलेली जलकुंड (तापवावयाच्या वस्तूचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वस्तू ठेवलेले पात्र प्रत्य़क्ष न तापविता ते पाण्यात ठेवून तापविण्याची पद्धती), शुष्कन पात्र, गालन पत्र, रबरी नळ्यांचा जोडकामासाठी उपयोग इ.तंत्रे बर्झीलियस यांनीच प्रथमतः वापरात आणली.

विविध संयुगांच्या विश्लेषणाचे काम करीत असताना त्यांना असे जाणवले की, प्रत्येक वेळी मूलद्रव्यांच्या पूर्ण नावांचा उल्लेख करण्याची पद्धती अडचणीचा आहे आणि डाल्टन यांची चिन्ह पद्धती सोयीची नाही. यामुळे त्यांनी असे सुचविले की, मूलद्रव्याचा निर्देश त्याच्या लॅटिन भाषेतील नावाचे आद्याक्षर किंवा दोन वा अधिक मूलद्रव्यांची नावे एकाच आद्याक्षराने सुरू होत असल्यास आद्याक्षर व त्यापुढील अक्षर यांचा उपयोग करावा (उदा., कार्बनासाठी C, तांब्यासाठी Cu). मूलद्रव्ये व संयुगे यांच्या निर्देशासाठी अक्षरांचा उपयोग करण्याची पद्धती तशी नवी नव्हती पण बर्झीलियस यांनी या चिन्हांना नवी राश्यात्मक संकल्पना दिली. या पद्धतीत अक्षरे अणुभारही दर्शवीत असून त्यामुळे संयुगांच्या सूत्रांतील त्यांमधील मूलद्रव्यांचे रासायनिक प्रमाण दर्शविले जाते (उदा., H2O, Fe3O4). बर्झीलियस यांच्या मूळ पद्धतीत नंतर काही बदल झालेले असले, तरी त्यांनी प्रतिपादन केलेल्या मूलभूत तत्त्वांमुळेच रसायनशास्त्राची आजची आंतरराष्ट्रीय भाषा प्रचारात आली.

बर्झीलियस यांनी व्हिल्हेल्म हिसिंजर यांच्या बरोबर व्होल्टा विद्युत् घटाचा उपयोग करून सोडियम, पोटॅशियम, अमोनिया व कॅल्शियम यांच्या लवणांवर विद्युत प्रवाहाच्या होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला व त्यासंबंधीची माहिती १८०३ मध्ये प्रसिद्ध केली. त्यांना असे आढळून आले की, ऑक्सिजन अम्ले, ऑक्सिडीभूत पदार्थ [⟶ ऑक्सिडीभवन] धनाग्रापाशी आणि क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ), क्षारीय मृत्तिका (कॅल्शियम, बेरियम, इत्यादींची ऑक्साइडे) व ‘ज्वलनक्षम’ पदार्थ [ऑक्सिडीकरण अवस्था कमी असलेले पदार्थ ⟶ ऑक्सिडीभवन] ऋणाग्रापाशी जातात. अशाच स्वरूपाचे प्रयोग ⇨सर हॅफ्री डेव्हीयांनीही १८०६-०७ च्या सुमारास केले. बर्झीलियस यांनी आपल्या प्रयोगावरून विद्युत् रसायनशास्त्रातील आपला प्रसिद्ध द्वैती सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार संयुगे विद्युत् दृष्टया निरनिराळ्या असलेल्या दोन भागांची (धन व ऋण भारित) बनलेली असतात. अकार्बनी पदार्थांबरोबरच कार्बनी पदार्थांकरिता हा सिद्धांत लागू करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या प्रयत्नांतून मूल्क सिद्धांताचा [⟶ मूलके] पाया घातला जाण्यास मदत झाली आणि त्यामुळे त्यांना मूलक सिद्धांताचे एक जनक म्हणून मानले जाते. त्यांच्या द्वैती सिद्धांतानुसार सर्व संयुगांचे विद्युत् ऋण व विद्युत् धन अशा दोन गटांत विभाजन करता येते. रासायनिक विक्रियेत विरुद्ध विद्युतांचे उदासिनीकरण होते. या सिद्धांतानुसार त्या वेळी ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची उतरत्या विद्युत् ऋणतेनुसार एक श्रेणी त्यांनी मांडलेली होती. या श्रेणीत ऑक्सिजन सर्वांत अधिक विद्युत् ऋण व पोटॅशियम सर्वांत अधिक विद्युत् धन मानलेला होता. हा सिद्धांत भौतिकीविज्ञांनी जरी फारसा मान्य केला नाही, तरी हा सिद्धांत लागू न पडणाऱ्या कार्बनी संयुगांचा शोध लागेपर्यंत बहुतेक सर्व रसायनशास्त्रज्ञांवर त्याने मोठा प्रभाव पाडलेला होता [⟶विद्युत रसायनशास्त्र]. विद्युत् विच्छेदन हे रासायनिक संयोगाच्या विरुद्ध असून त्यात विद्युत् भारांची पुनःस्थापना होते व संयोजित झालेले रेणवीय गट अलग होतात, असा बर्झीलियस यांचा दृष्टिकोन होता.

बर्झीलियस यांनी सिरियम (हिसिंजर यांच्याबरोबर, १८०३), सिलिनियम (जे. जी. गान यांच्या समवेत, १८१७) व थोरियम (१८२८) या मूलद्रव्यांचा शोध लावला. सिलिकॉन (१८२३), झिर्कोनियम (१८२४) व टिटॅनियम (१८२५) ही मूलद्रव्ये अलग मिळविण्यात त्यांना यश लाभले. खनिजांचे त्यांच्या स्फटिकांच्या रूपावरून करण्यात येणाऱ्या वर्गीकरणऐवजी त्यांच्या रासायनिक संघटनावर आधारलेले वर्गीकरण बर्झीलियस यांनी मांडले. त्यांनी टेल्यूरियम, व्हॅनेडियम, मॉलिब्डेनम, टंगस्टन, युरेनियम आणि इतर मूलद्रव्यांच्या संयुगांचा सखोल अभ्यास केला.

एकोणिसाव्या शतकातील रसायनशास्त्रीय ज्ञानाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा दोन संकल्पना-समघटकता व उत्प्रेरण-त्यांनी मांडल्या. स्नायूंच्या पेशीसमूहातील लॅक्टिक अम्ल व किण्वन (आंबण्याच्या) क्रियेतील लॅक्टिक अम्ल यांच्या गुणधर्मात फरक असल्याचे त्यांना दिसून आले. यावरून एकच रासायनिक संघटन असलेल्या पण भिन्न गुणधर्म असलेल्या संयुगांना ‘समघटक’ असे म्हणावे, असे बर्झीलियस यांनी सुचविले [⟶ समघटकता]. १८३५ मध्ये त्यांनी उत्प्रेरणाची (ज्या रासायनिक बदलात एक पदार्थ स्वतः न बदलता विक्रिया घडवून आणतो अशा बदलाची) सैद्धांतिक संकल्पना मांडली [⟶ उत्प्रेरण]. या संकल्पनांना अनुक्रमे ‘आयसोमेरिझम’ आणि कॅटॅलिसिस ही नावेही त्यांनीच सुचविली. ‘प्रोटीन’ (प्रथिन) हा शब्दही बर्झीलियस यांनीच सुचविला.

त्यांनी २५० हून अधिक (बहुशः स्वीडिश भाषेत) शास्त्रीय निबंध प्रसिद्ध केले. स्टॉकहोम ॲकॅडेमी ऑफ सायन्सचे सदस्य म्हणून १८०८ मध्ये त्यांची निवड झाली व १८२८-४८ या काळात ते ॲकॅडेमीचे कायम सचिव होते. १८२१-४८ पर्यंत त्यांनी ॲकॅडमी तर्फे रसायनशास्त्रातील प्रगतीचे चिकित्सक अहवाल प्रतिवर्षी लिहून प्रसिद्ध केले. त्यांच्या रसायनशास्त्रावरील पाठ्यपुस्तकाच्या (११ खंड, १८०८-१८) पाच आवृत्त्या निघाल्या व बहुतेक सर्व यूरोपीय भाषांत त्याची भाषांतरे झाली. त्यांचे अहवाल व पाठ्यपुस्तक यांचा त्यांच्या काळातील रसायनशास्त्राच्या विकासावर फार मोठा प्रभाव पडलेला होता. त्या काळातील इतर रसायनशास्त्रज्ञांबरोबरील त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या प्रचंड पत्रव्यवहारांवरून हा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. त्यांचे सर्व संशोधन कार्य वरील अहवालांत व त्यांच्या पाठ्यपुस्तकाच्या विविध आवृत्त्यांत प्रसिद्ध झाले. खनिजांच्या वर्गीकरणासंबंधीच्या कार्याबद्दल १८३६ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना कॉप्ली पदकाचा बहुमान दिला. स्वीडनच्या राजांनी १८३५ साली त्यांना बॅरन हा किताब दिला. ते स्टॉकहोम येथे मृत्यूपावले.

जमदाडे, ज. वि. घाटे, रा. वि.