मानसशास्त्र : माणसाचे मन हाही एक माणसाच्या जिज्ञासेचा विषय आहे. ग्रहगोल, वनस्पती, पशुपक्षी यांच्याविषयीच्या जिज्ञासेतून जशी भौतिकशास्त्रे व जैवशास्त्रे निर्माण झाली, तशी स्वतःविषयीच्या जिज्ञासेतून ‘मानसशास्त्र’ ही शाखा निर्माण झाली.

 स्वतःविषयीची जाणीव माणसाला आंतरिक आणि बाह्य अशी दोन ‘विश्वे’ उपलब्ध करून देते. त्यांमधील भेद लक्षात येत असतानाच बाह्य जगाचे ‘असणे’ आणि त्याचा आपल्याला अनुभव येणे, यांत फरक आहे हेही माणसाच्या लक्षात आले. यातूनच वस्तुनिष्ठ विधानांविषयीचा आग्रह हा जो शास्त्राचा पाया असतो, तो निर्माण झाला कारण फक्त अनुभवविश्वातील विधानांच्या जोरावर विचारविनिमय होऊ शकत नाही. जे जाणिवांचे किंवा अनुभवांचे, तेच त्यांच्यातील संबंधांचे बाबतीतही. कशामुळे काय होते? हा कार्यकारणभाव जाणून घेताना ‘मला वाटलेला’ संबंध आणि ‘प्रत्यक्षात असलेला’ संबंध यांत फरक दिसून येतो व मग निसर्गनियम आणि माझी समजूत यांतील दरी कमी करत करत सार्वत्रिक सिद्धांत ही व्यक्तिनिरपेक्ष ज्ञानाची कोटी निर्माण होऊ लागते. परंतु कोणत्याही सिद्धांताबाबत नव्या दृष्टीने, एखाद्या नव्या अनुभवाने किंवा अधिक निरीक्षणाने शंका उपस्थित होऊ शकते. अशा वेळी त्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न पडताळा पाहून करता येतो. त्यातून (१) शंका चुकीची ठरू शकते किंवा (२) सिद्धांतात सुधारणा होऊ शकते किंवा (३) नवा सिद्धांत मांडला जाऊ शकतो. अशा प्रकारे शास्त्राची प्रगती होत जाते.

 वस्तुनिष्ठता, सार्वत्रिकता आणि प्रत्यंतरक्षमता या मुख्य वैशिष्ट्यांमुळे आधुनिक शास्त्रे प्रगत झाली आहेत. या शास्त्रांच्या मालिकेत स्थान प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नातून प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेची प्रस्थापना गेल्या शतकात झाली. मानसशास्त्र ही ज्ञानशाखा वेगळ्या कोटीतील आहे, तिला विज्ञानाची कसोटी लावणे शक्य नाही, इष्टही नाही, हा विचार एकीकडे तर ही वेगळ्या कोटीची ज्ञानशाखा म्हणून मानण्याचे कारण नाही, हा विचार दुसरीकडे. अशी मानसशास्त्रविषयक धारणांची द्वंद्वे दीर्घकाळ चालली. अजूनही यांपैकी कोणत्याच धारणेचा निःसंदिग्धपणे स्वीकार सर्व विचारवंतांनी केलेला नाही. दोन्ही प्रकारच्या गृहीतांमधून विचार व संशोधन चालू आहे. एकीकडे वैज्ञानिक पद्धतीने मिळणारे काटेकोर सिद्धांत अपुरे पडतात आणि दुसऱ्या गटातील विचारप्रणालीमुळे प्रत्यंतराची संधी अथवा गरजच नाकारली जाते परंतु ‘व्यक्तिनिष्ठ प्रत्यय’ हा तर सार्वत्रिक होऊ शकत नाही.

 वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे सुरू झालेल्या वैचारिक प्रवाहाला प्रथम या अभ्यासविषयाबद्दलची स्पष्ट संकल्पना असण्याची गरज होती. मानसशास्त्रज्ञ कशाला अभ्यास करतात ? पूर्वापार तत्त्वज्ञानातील विचारप्रणालीशी जो विचार निगडित होता, तो जीविताच्या अंतिम ध्येयाशी, श्रेयाशी बांधलेला होता तो प्रामुख्याने विध्यर्थी होता. त्याचप्रमाणे माणसाचे सत्त्व म्हणजे देह नव्हे, शारीरिक गुणधर्म नव्हेत किंवा त्यात अंतर्हित असणारे विकारही नव्हेत माणसाचे सत्त्व म्हणजे आत्मा होय, अशी ती संकल्पना होती. परंतु ही संकल्पना वैज्ञानिक पद्धतीला मानवणे शक्य नव्हते. कारण ‘आत्मा आहे परंतु तो अवर्णनीय आहे’, अशा संकल्पनेच्या आधारे सूत्रे, नियम, प्रयोग, निरीक्षणे इ. शक्य नाही त्यामुळे फक्त नकारात्मक वर्णनाच्या ह्या व्याख्येवर आधारलेला विचार शास्त्र या पदवीला जाऊ शकत नव्हता परंतु मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र नव्हे असे म्हणताच अध्यात्मवादी विचार आणि तत्त्वज्ञान यांनी मानसशास्त्राला वेगळ्या पंक्तीला बसवले व या सामाजिक प्रक्रियेचा मानसशास्त्राच्या विकासावर सतत दबाव राहिला. [⟶ आत्ममीमांसा].

 ‘मन’ या संकल्पनेचेही तसेच झाले. मन हे अवर्णनीय नसले तरी ते ‘जणू काही देहातील विशिष्ट स्थान’, ‘जणू एक तरल अस्तित्व’, ‘जणू एक प्रवाह’ अशी रूपकाश्रयी संकल्पना राहिली. ज्या स्पष्टतेवर शास्त्रीय संकल्पना उभी राहते, त्याची इथे उणीव होती. उदा., ‘मनात विचार आला’ हे विधान ‘खोलीत माणूस आला’ अशा स्वरूपाचे प्रत्यंतरक्षम विधान नसून ते ‘समजून घ्यायचे’ विधान ठरते. अशी विधाने अव्याख्येय गृहीतांच्या पातळीच्या पुढे जाऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष कार्यपातळीवर संशोधनाच्या ती उपयोगी पडत नाहीत. अव्याख्येय पद म्हणूनही ⇨ मन ही संज्ञा वापरता आली नाही त्यामुळे मनाऐवजी ‘जाणीव’ किंवा ⇨ बोधावस्था ही संकल्पना वापरायचा प्रयत्न झाला. कारण माणसाला स्वतःला कशाची जाणीव होते आहे याचे अंतर्निरीक्षणपूर्वक निवेदन करता येते. त्यामुळे प्रायोगिक परिस्थितीत एका वेळी फक्त एकाच घटकात फरक करून व त्यामुळे जाणिवेत पडणारे फरक नोंदवून त्यांतील संबंधांची मांडणी करणे शक्य होते. त्यामुळे ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२−१९२०) यापहिल्या मानसशास्त्रीय प्रयोगशाळेच्या संस्थापकाने ‘बोधावस्था’ हीच मानसशास्त्राचा अभ्यासविषय ठरवली. यामधून ⇨ मानसभौतिकीचा (सायकोफिजिक्सचा) पाया घातला गेला.

 परंतु लवकरच बोधावस्था आणि अनुभवाचे निवेदन यांतून पद्धतीविषयक प्रश्न निर्माण झाले. कारण अंतर्निरीक्षम हेही शेवटी प्रत्यंतरक्षमतेच्या कसोटीला उतरत नाहीच. ⇨ ई. बी. टिचनर (१८६७–१९२७) यांनी अंतर्निरीक्षण करू शकणाऱ्या. व्यक्तीची प्रौढ, सुसंस्कृत, निरामय अशी वैशिष्ट्ये सांगितली तरी याही वैशिष्ट्यांचे मापन किंवा नेमके व्यक्तिनिरपेक्ष वर्णन करता येत नाहीच. म्हणजे वस्तुनिष्ठ विधानासाठी आवश्यक ती मापनीयता मुळातच मिळेना [⟶ मानसशास्त्रीय पद्धति].

या अडचणी बाजूला सारून पुढे आलेली संकल्पना म्हणजेच वर्तन. कारण वर्तन या संकल्पनेची देहसंबंधित घटनांच्या आधारे व्याख्या करता येते. त्यातील नोंदी व निरीक्षणे स्पष्टतेच्या, नेमकेपणाच्या व वस्तुनिष्ठतेच्या अटी पाळून वर्तनविषयक नोंदी व निरीक्षणे करता येतात. अंतर्निरीक्षण पद्धतीबाबत उपस्थित होणारा अभ्यासव्यक्तीच्या युक्तायुक्ततेचा प्रश्न येत नाही. अगदी प्रतिक्षिप्तक्रियांपासून तो धाडसी कृतीपर्यंत सर्व स्तरांवर जे कोणते बदल होतात, ते अभ्यासून वैज्ञानिक पद्धतीने विचार करणे शक्य असते. रशियन शरीरक्रियावैज्ञानिक ⇨ आय.पी. पाव्हलॉव्ह (१८४९–१९३६) यांनी प्रस्तुत केलेल्या अभिसंधान संकल्पनेने प्रेरित होऊन अमेरिकेत ⇨ जे. बी. वॉटसन (१८७८–१९५८) यांनी वर्तनाचा स्तर हाच मानसशास्त्रीय अभ्यासाचा रास्त विषय आहे, हे ठामपणे मांडले (१९१२) प्रयोगांनी दाखवूनही दिले. वॉटसन यांच्यापूर्वी १९०५ मध्ये मॅक्डूगल यांनीही वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असा विचार मांडला होता.

 आत्मा, मन, बोधावस्था आणि वर्तन या संकल्पनांचे परीक्षण व स्वीकार किंवा त्याग वैज्ञानिक संकल्पनावैशिष्ट्यांच्या निकषावर झाला. एकूण शास्त्राचा इतिहास पाहता यातच मानसशास्त्र उशिरा का विकसित झाले, याचे उत्तरही मिळते. एकोणिसाव्या शतकात झालेल्या विज्ञानाच्या प्रगतीत शरीरशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकी यांनी काही मानदंड निर्माण केले होते. मानवी व्यवहारांचा अभ्यास वैज्ञानिक कोटीला नेऊन पोहोचवायचा असेल, तर हे मानदंड पाळायला हवेत या दृष्टीनेच विचार सुरू झाला. विज्ञानाचे मानदंड मानले नाहीत तर मानसशास्त्रास ⇨ रहस्यवादी वा गूढवादी, ⇨ अज्ञेयवादी किंवा ⇨ ईश्वरवादी गोटातच गुंतून पडावे लागेल ही जाणीव निर्माण झाली. वर्तनवादाभोवती उठलेल्या वैचारिक खळबळीचा अर्थ असा लागतो.


 वैज्ञानिकतेचे काही कार्यविशेष या खळबळीच्या पाठीशी आहेत. सार्वत्रिक नियमांचे ज्ञान ही एक शक्ती आहे. पूर्वकथन आणि नियमन यांचा तो मूलस्रोत आहे. माणसाच्या वर्तनाविषयीच्या सार्वत्रिक नियमांचे ज्ञान प्राप्त झाले, की हे ज्ञान असणारा माणूस किंवा समूह इतरांना स्वतःला हवे तसे ‘बनवू’ शकेल तथापि हे इष्ट नव्हे अशी आशंका आणि त्यापाठोपाठ मूल्यविषयक विचारही पुढे आला. ‘मानवी स्वातंत्र्य’ किंवा ‘स्वेच्छा’ यांचा अर्थच काढून टाकणारे हे विज्ञान ठरेल अशी भीती आणि सात्त्विक संताप व्यक्त केला गेला. प्रयोगशाळेतील उंदीर किंवा कुत्रे यांच्यावरील प्रयोगांची थट्टा आणि सरळ निंदाही झाली. माणूस स्वतःमध्येच काही एक गूढ, अगम्य अस्तित्व राखून असतो आणि त्यामुळे त्याला पूर्वकथनाच्या चिमटीत पकडताच येणार नाही, असा हा प्रतिवाद होता. वॉटसन यांनी ‘मला दहा निरोगी बालके द्या, मी त्यांना एकेकाला वकील, डॉक्टर, तंत्रकुशल, गुन्हेगार इ. बनवून दाखवतो’, असे म्हणून या वादाचा तंबू ठोकला होता. [⟶ वर्तनवाद].

 मानसशास्त्र या वादांच्या चकमकीमधूनच विकसित होत राहिले आणि त्यात विविध प्रकारचे संशोधनही चालू राहिले. वैज्ञानिक पद्धतीच्या साहाय्याने शिक्षण, प्रशिक्षण इ. क्षेत्रांना उपयुक्त अशी पायाभूत तत्त्वे प्राप्त झाली आणि माणसातील अवर्णनीयतेचे आविष्कार शोधणाऱ्यामधूनही नव्या क्षेत्रांवर धूसर प्रकाश पडायला आरंभ झाला. मनुष्यस्वभावाविषयी विधान करताना ते चूक की बरोबर, हे ठरवण्याचे काही निकष यातून निर्माण झाले हे मात्र खरे.

 ही सर्व प्रक्रिया मानसशास्त्राच्या व्याख्या वेगवेगळ्या वेळी कशा केल्या होत्या, हे पाहिले की समजते. व्हिल्हेल्म व्हुंट : ‘व्यक्तीच्या जाणिवेचा अथवा चेतन (कॉन्शस) अनुभवाचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजे मानसशास्त्र’. ई. बी. टिचनर : ‘मानसशास्त्र हे प्रौढ, सुसंस्कृत आणि निरामय व्यक्तीच्या चेतन अनुभवाचे विज्ञान होय’. जे. बी.वॉटसन : ‘मानसशास्त्र हे व्यक्तीच्या वर्तनाचे विज्ञान होय’.

 मानसशास्त्र ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून १९२० पर्यंत गणली जाऊ लागली, विद्यापीठीय क्षेत्रात तिला स्थान मिळाले. ठिकठिकाणी प्रयोगशाळा सुरू झाल्या. १८७९ मध्ये व्हुंटने लाइपसिक येथे पहिली प्रयोगशाळा सुरू केली होती. त्यानंतर मानसशास्त्र हे प्रयोगशाळेत, मापनसाधनांच्या साहाय्याने शिकण्याचे शास्त्र आहे, ही गोष्ट मान्य झाली परंतु केवळ दृश्य वर्तनाच्या विश्लेषणावर निर्भर राहणारे मानसशास्त्र अपूर्णच राहील, हे मतही मानसशास्त्राच्या व्याख्यांमधून डोकावत राहिले. ‘अनुभव’, ‘जाणीवपूर्वक तसेच अर्धजाणीवपूर्वक व अजाणता केलेले वर्तन’ ‘मानसिक प्रक्रिया’ यांसारख्या संज्ञा वापरल्या गेल्या आणि याचे श्रेय मानसचिकित्सा व मनोविश्लेषण यांच्याकडे जाते. प्राणिवर्तनाचाही अंतर्भाव त्यात केला गेला.

 ‘अनुभव’ ही ज्या त्या व्यक्तीलाच जाणवू शकणारी घटना, तर ‘वर्तन’ हे इतरांना निरीक्षणाचा विषय होऊ शकणारी घटना. या दोन्हींचा समावेश मानसशास्त्राच्या अभ्यासविषयात करणे आवश्यक आहे, याबद्दल हळूहळू सर्वांची मान्यता निर्माण झाली. अनुभव म्हणजे मेंदूतील पेशींचे विशिष्ट जैवरासायनिक वर्तनच अशी टोकाची भूमिका जरी घेता येत असली तरीही हे ‘वर्तन’ फक्त त्या व्यक्तीने वर्णन केले तरच इतरांना उपलब्ध होते, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन एच्. जे. आयझेंक (१९१६− ) यांनी वर्तनाची व्याख्या व्यापक केली. ‘व्यक्तिसंवेध आणि इंद्रियगोचर अशा दोन्ही घटानांचा संपूर्ण समुच्चय म्हणजे वर्तन’ असे त्यांनी म्हटले.

या सर्व ऊहापोहातून मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये काही क्षेत्रे केंद्रवर्ती झाली आहेत. अनुभवाच्या तसेच वर्तनाच्या वेगवेगळ्या पातळ्या असतात. मूर्तापासून अमूर्तापर्यंत, स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत आणि सरलतेपासून व्यामिश्रतेपर्यंत अशा त्यांच्या छटा असतात, कप्पे क्वचितच असतात. परंतु व्यक्ती आणि बाह्य परिस्थिती यांचा संपर्क लक्षात घ्यायचा तर दिसणे, बघणे, ऐकणे यांसारख्या प्राथमिक प्रक्रिया सहजीच आरंभ बिंदू ठरतात. व्यक्ती हे एक प्राणिशरीर आहे आणि परिस्थितीतून सतत काही ना काही बदल शरीरापर्यंत पोचत असतात. या बदलांची जाणीव होणे, दखल घेणे आणि काही क्रिया करणे या अगदी साध्या स्वरूपात विश्लेषणाला सुरुवात केली, तरी वेदन आणि संवेदन ही पहिली पायरी ठरते. वेदनाच्या अभ्यासात वेदनक्षमतेच्या मर्यादा आणि भेदबोधनाचे विशेष यांचा समावेश होतो. यांत ज्ञानेंद्रियांमार्फत येणाऱ्या ‘अनुभवाचा’ विचार मुख्य आहे. शरीरशास्त्राच्या आधाराने ज्ञानेंद्रियांची रचना आणि कार्ये, भौतिकशास्त्राच्या आधाराने उद्दीपकांचे गुणधर्म आणि यांची नेमकी मापने व वर्णने करता येतात. विशिष्ट तीव्रतेचे उद्दीपक असले तर वेदनानुभव येतो किंवा नाही याचा प्रायोगिक अभ्यास करणे शक्य होते. या प्रकारच्या अभ्यासातून मानसभौतिकी ही शाखा विकसित झाली. ⇨ जी. टी. फेक्नर (१८०९–८७) यांचा या विषयावरील ग्रंथ १८६० मध्ये प्रकाशित झाला. ⇨ एर्न्स्ट हाइन्रिख वेबर (१७९५–१८७८) यांनी उद्दीपकाच्या तीव्रतेबरोबर अनुभवात पडणाऱ्‍या फरकाचा अभ्यास केला आणि त्यात फेक्नर यांनी भर घालून वेबर–फेक्नर–नियम या नावाने ओळखले जाणारे (∆I / I = K) सूत्र मांडले. यानंतर व्हुंट यांची प्रयोगशाळा स्थापन झाली आणि या क्षेत्राला विशेष गती मिळाली. वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून मानसशास्त्रातील सिद्धांत रचता येतील, हे दाखविणारे हे पहिले पाऊल म्हणता येईल. वेदनानुभवात उद्दीपकांची कोणती वैशिष्ट्ये कोणता अनुभव निर्माण करतात, याचा उलगडा करण्यात शरीरशास्त्रज्ञही रस घेत होतेच, त्यांच्या जोडीने, त्यांच्याच पद्धती वापरायला सुरुवात झाली.

वेदनानुभवाच्या अभ्यासातून शारीरिक घटकांचे मानसिक जीवनातील महत्त्व अधिकाधिक प्रस्थापित होत गेले. मज्जासंस्था, ज्ञानेंद्रियांची कार्ये, अंतःस्रावी ग्रंथी इ. शारीरिक घटकांची रहस्ये अधिकाधिक समजू लागली. यात मज्जातंतूंचे प्रकार व कार्यवैशिष्ट्ये सांगणारे चार्ल्स बेल (१७७४–१९४२) आणि ⇨ योहानेस म्यूलर (१८०१–५८) यांचे संशोधन मेंदूच्या पृष्ठावर झालेली कार्यवैशिष्ट्यांची विभागणी आणि एकात्मता यांचे प्येअर फ्लूरँस (१७९४–१८६७) यांनी केलेले विवेचन पृष्ठरज्जू आणि मेंदू यांचे प्रतिक्षेपक्रिया व ऐच्छिक क्रियांमधील वेगवेगळे कार्य दाखवणारे मार्शल हॉल (१७९०–१८५७) यांचे संशोधन टॉमस यंग (१७७३ –१८२९) आणि ⇨ हेरमान फोन हेल्महोल्टझ (१८२१– ९४) यांचे रंगवेदनांविषयीचे संशोधन पी.पी.ब्रोका (१८२४–८०) यांनी प्रस्थापित केलेले मेंदूतील वाचाकेंद्राचे कार्य अशा कित्येक पायाभूत गोष्टी एकोणिसाव्या शतकातील वैज्ञानिक विकासाने सादर केल्या होत्या. माणसाचे रहस्य उलगडू लागले होते. नसावेगांची गती, दृक्‌वेदन, श्रवण, स्नायुवेदन, आंतरेंद्रिय वेदन यांबद्दलही महत्त्वाचे संशोधन झाले.


या पायावर मानसभौतिकीचा आरंभ झाल्याने, वर्तन अथवा अनुभव यांचा शारीरिक रचनेतील आधार कोणता ? हा मानसशास्त्रातील एक मूलगामी प्रश्न ठरला. अनुभव व वर्तन यांवरील गूढतेचे पटल दूर करण्यासाठी या भूमिकेचा फारच उपयोग झाला.

वेदनानुभव सुटा करताना, प्रयोगशाळेच्या पूर्वनियंत्रित कृत्रिम परिस्थितीत काम करावे लागते. प्रत्यक्षात संवेदन हीच पहिली पायरी ठरते. नुसते ⇨वेदन स्वीकारून मनुष्य थांबत नाही. या वेदनाचा अर्थ लावण्याची, संघातबद्ध अनुभव घेण्याची पायरीही लगेचच गाठली जाते. याविषयीचे संशोधन प्रामुख्याने जर्मनीत झाले. ⇨ कुर्ट कॉफ्का (१८८६–१९४१), ⇨ व्होल्फगांग कलर (१८८७−१९६७), ⇨ माक्स व्हेर्थांयमर (१८८०–१९४३) ही त्यांतील बिनीची नावे. अनुभवाचे मूलघटक संकल्पनेच्या केवळ वैचारिक –बौद्धिक पातळीवरून उद्दीपक-प्रतिक्रिया अशा कृत्रिम स्वरूपात न मानता अनुभूत पातळीवर जे साक्षात् बंध जाणवतात, त्यांच्या आधारे प्राप्त करावेत, हा त्यांचा सैद्धांतिक आग्रह होता आणि हे मूलघटक संवेदनप्रक्रियेत कोणत्या तत्त्वांनी सिद्ध होतात हे त्यांनी दाखवले. संवेदन ही एक व्यूह वा समष्टी (गेस्टाल्ट वा होल) प्रतीत होण्याची स्थिती आहे, त्यात एका पार्श्वभूमीवर अथवा आधारभूमीवर आकृती असा प्रत्यय येतो. समीपवर्तित्व, साधर्म्य, पूरणतत्त्व, समानगती इ. वैशिष्ट्यांवरून आकृतीचा प्रत्यय कोणता असेल हे ठरते. एखादा तपशील आकृती म्हणून दाखल झाला की आधारभूमीचा भाग झाला, यांवर त्या तपशिलाचेउच्चतरमानसिक प्रक्रियांमधील भवितव्य अवलंबून असते, ही संवेदनाच्या अभ्यासातील पायाभूत मांडणी या संशोधकांनी केली [⟶ व्यूह मानसशास्त्र].

संवेदनाच्या अभ्यासक्षेत्रात स्थलसंवेदन, कालसंवेदन, गतिसंवेदन, रंगसंवेदन, ध्वनिसंवेदन, संवेदन स्थैर्य, सांवेदनिक अध्ययन इ. उपविभागांचा समावेश होतो. [⟶ संवेदन].

माणूस जे काही वागतो तसा तो का वागतो ? या प्रश्नाचे उत्तर शोधणारे मानसशास्त्राचे अभ्यासक्षेत्र म्हणजे प्रेरणा. वर्तनाच्या मुळाशी असणारे ऊर्जास्रोत कोणते ? किती ? त्यांचा जोर, दिशा, परस्परप्रभाव कशा प्रकारे कार्य करतात ? या प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रेरणांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये प्रेरणांचे तीन प्रकार आता सर्वमान्य आहेत : (१) शारीरिक प्रेरणा, (२) सामाजिक प्रेरणा आणि (३) व्यक्तिविशिष्ट प्रेरणा अथवा मानसजन्य प्रेरणा. शरीराची कार्ये आवर्तनांनी चालतात. शरीराचा रासायनिक समतोल ढळतो किंवा विशिष्ट घटकाची तूट उत्पन्न होते. ती भरून काढण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करू लागते. शरीरातील त्रुटी आणि त्यापाठोपाठ अनुभवास येणारी अस्वस्थता यानंतर ती तूट भरून काढण्याच्या दिशेने प्रयत्न आणि हे प्रयत्न सफल झाल्यावर समाधान, हे चक्र कालांतराने पुन्हा तूट निर्माण होऊन चालू राहते. सामाजिक प्रेरणांची अशी स्पष्ट आवर्तने दिसत नाहीत परंतु सहवास, समूहसदस्यत्व, वर्चस्वप्रस्थापन इ. गोष्टी सामाजिक प्रेरणांचे ध्येयविषय असतात. सामाजिक जीवनाच्या विशिष्ट संदर्भानुसार काही प्रतीकेही ध्येयवस्तू बनू शकतात. व्यक्तिविशिष्ट प्रेरणांमध्ये आत्मगौरव, आत्मोन्नती, कलात्मक अभिव्यक्ती इत्यादींचा समावेश होतो.

मानवी प्रेरणांविषयी अनुमान करण्यासाठी आणि वर्तनाचे जैविक मूळ समजावून घेण्यासाठी प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास सुरू झाला. जीवसृष्टीचे निरीक्षण आणि त्यातील साम्यभेद लक्षात घेण्याच्या शास्त्रीय कार्याला ⇨ चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतिवादाची (१८५९) चौकट लाभली. तिच्या मांडणीचा भाग म्हणून भावनिक आविष्कारात मानवी वर्तन आणि मानवेतर प्राण्यांचे वर्तन यांतील साधर्म्यसूत्रे मांडणारा एक निबंधही त्यांनी लिहिला होताच. प्राणिमानसशास्त्र आणि तुलनात्मक मानसशास्त्र या शाखांचा विकास झाला, त्यात माणसाचे माणूसपण प्रेरणांच्या पातळीवर काही वेगळे आहे की नाही, या प्रश्नांची चर्चा करणे शक्य झाले. या क्षेत्रातील अभ्यास सर्व शाखांना केंद्रस्थानी ठरतो. कारण वेगवेगळ्या पातळीवर वर्तनाचा उलगडा होण्यासाठी तो उपयुक्त आहे. ⇨ विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८), फ्रॉइड, ए. एच्. मॅस्लो (१९०८–७०) यांच्या कार्याभोवती त्या त्या काळात पुष्कळ वैचारिक ऊहापोह व संशोधन झाले आहे. प्रेरणांची वर्गीकरणे प्राथमिक-दुय्यम किंवा जन्म-जात-संपादित अशीही केली जातात. माणसामध्ये संपादित प्रेरणांचे प्रभाव आणि परस्परप्रभाव, प्रेरणांचे स्तर यांच्यामुळे वर्तनात अतिशय गुंतागुंत आणि काही वेळा तर अंतर्विरोध निर्माण होतात. [⟶ सहजप्रेरणा]. शारीरिक फेरफार, भाषिक पातळीवरील विचार आणि कृती या सर्वच गोष्टींची या क्षेत्रात उपस्थिती असल्याने संशोधनाचा व्याप अतिशय मोठा आहे. त्यात उपयोजनाचे प्रश्नही तातडीचे आहेत. [⟶ प्रेरणा – १ ].

प्रेरणांच्या अभ्यासाशी निगडित असणारा मानसशास्त्रीय अभ्यासाचा दुसरा भाग म्हणजे भावना. भाव, भावना, भावस्थिती, भावांतरण, भावसंक्रमण असे अनेक घटनाविशेष त्यात आढळून येतात. त्यातही भावनांचे शारीरिक अधिष्ठान स्वायत्त मज्जासंस्था, अंतःस्रावी ग्रंथी आणि मेंदू यांच्या कार्यात आढळून येते. त्यामुळे अनुभवतः कितीही तरल वाटणारी छटा कुठे ना कुठे शरीरातील जैवरासायनिक अथवा विद्युत्‌रासायनिक बदलांशी जोडली जातेच. यामुळे वैज्ञानिक पद्धतीने उलगडा करण्याच्या बाबतीत मानसशास्त्रज्ञांचा आत्मविश्वास पुष्कळच वाढल्याचे दिसते. भावनांचा अनुभव आणि आकलन यांच्या संबंधात आकलन आधी की भावना आधी या प्रकारचा वाद मानसशास्त्रात झाला. परंतु आधी भावना आणि मग आकलन ही कल्पना मागे पडून विद्युत्‌वेगाने घडणाऱ्‍या आकलनक्रियेस प्राथमिकता मिळालेली आहे. [⟶ चित्तवृत्ति व स्वभावधर्म भाव मनोभाव स्थिरभाव].

संवेदन-आकलन यांच्या क्षणरूपाप्रमाणेच काळाच्या मितीवर घडणाऱ्‍यात आकलनात्मक क्रिया-प्रक्रिया मानसशास्त्राच्या केंद्रवर्ती अभ्यासविषयाचा भाग आहेत. अध्ययन, स्मरण, विचार, संकल्पन यांची रूपे स्पष्ट करणे त्यांचे नियामक घटक शोधणे आणि सिद्धांतांची स्थापना करणे हे कार्य मानसशास्त्रात अविरत चालू राहिले आहे. त्यात ⇨ हेरमान एबिंगहाउस (१८५०–१९०९), ई. एल्. थॉर्नडाइक (१८७४ – १९४८), कलर, पाव्हलॉव्ह, वॉटसन, ⇨ क्लार्क हल (१८८४–१९५२) इत्यादींपासून सुरू होणारी एक दीर्घ नामावली आहे. परंतु उच्चतर मानसिक प्रक्रिया प्रयोगशाळेच्या वातावरणातून गेल्या काही वर्षांत बाहेर काढून अभ्यासल्या जाऊ लागल्या आहेत. मानवी वर्तनाचे प्रत्यक्ष जीवनातील निरीक्षण आणि प्रयोगशाळेत सर्व नियंत्रणाखाली केलेले निरीक्षम यांतील तफावत मिटवण्याच्या दिशेने आज प्रयत्न सुरू झालेले दिसतात. आरंभीच्या काळात प्राणिवर्तनाला धरून मांडलेले सिद्धांत मानवी वर्तनाला जसेच्या तसे लावता येणार नाहीत आणि ते पुरेसेही ठरणार नाहीत, याकडे लक्ष गेल्यानंतर या प्रयत्नांना विशेष उठाव मिळाला. [⟶ बुद्धिमत्ता विचारप्रक्रिया संकल्पना स्मृतिवविस्मृति ज्ञानसंपादन].


मानवी क्षमता आणि व्यक्तिमत्त्व हाही मानसशास्त्राच्या अभ्यासविषयात मोडणारा एक महत्त्वाचा विषय. सामान्य विचारातून मिळालेली ही देणगी म्हणता येईल. माणसाबद्दल एऱ्‍हवी केलेला विचार, संपूर्ण व्यक्तीचे वर्णन करणारी वैशिष्ट्ये वापरून केला जात असे. त्यात अंगचे गुण आणि एकूण वागणूक यांना स्थान होते. यांचे शास्त्रीय विश्लेषणही सुरू झाले. क्षमतांच्या अभ्यासात वेदक-कारक क्षमता, सांवेदनिक क्षमता, बौद्धिक क्षमता, कलात्मक क्षमता इ. क्षमतांच्या स्वरूपाची व मापनपद्धतींची चर्चा विसाव्या शतकाच्या पहिल्या वीस वर्षांतच सुरू झाली. त्यात युद्धकाळातील निवडीसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रातील निवडीबाबत उद्‌भवलेल्या गरजांमधून क्षमतांच्या मापनाच्या आधारे काही वर्गीकरण करण्याची सुरुवात झाली. क्षमतांच्या अभ्यासातून पुढे आलेले मुख्य तत्त्व म्हणजे व्यक्तिभेदाचे आकलन. हे तत्त्व म्हणजे ‘हाताची पाची बोटे सारखी नसतात’या विधानाचे सांख्यिक विवेचन होय त्याचप्रमाणे वैज्ञानिक पद्धतीतून प्राप्त होणारी नेमकी दृष्टी विविध क्षेत्रांत वापरण्याचे एक उदाहरणही म्हणता येईल. हजारो व्यक्तींचे मापन करून मिळणारे क्षमतांचे वितरण म्हणजे सरासरीच्या आसपास बहुसंख्य आणि दोन्ही दिशांनी जलद उतरून अपवादात्मक अल्पसंख्या अशी सर्वसामान्य घंटाकृती आलेखाची रचना मिळते. सरासरी ही सामान्यत्वाची पातळी धरून अनेक संख्याशास्त्रीय वितरणे मिळवता येतात. क्षमतामापनामध्ये संख्याशास्त्रीय संकल्पना, प्रक्रिया आणि निकष वापरले जातात आणि संभाव्यतेचा सिद्धांत या मापनामध्ये पायाभूत मानला जातो [⟶ क्षमता]. व्यक्तिमत्त्व म्हणजे माणसाचे एक व्यक्ती म्हणून असणारे खास असे वेगळेपण. व्यक्तिमत्त्व हा शब्द व्यवहारात दुसऱ्‍यावर छाप पाडणारी शरीरयष्टी आणि वर्तनशैली या अर्थाने वापरला जातो परंतु मानसशास्त्रीय परिभाषेत प्रत्येकालाच व्यक्तिमत्त्व असते. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे मूल्यकल्पना, अभिवृत्ती, सर्वसामान्य गुणविशेष, सवयीआणि विशिष्ट प्रतिक्रिया या सर्वांची एक रचना. प्रत्येक व्यक्ती अनुवंश आणि परिस्थिती यांतून घडत असते आणि स्वतःच्या निर्णयाने आणि प्रयत्नाने काही वैशिष्ट्ये संपादन करून घेत असते. व्यक्तिमत्त्वाची घडण, वर्गीकरण आणि वर्तनातील नियामक कार्य हे मानसशास्त्रात केंद्रवर्ती धरावे ही भूमिका सर्व मानसशास्त्रज्ञ मान्य करत नाहीत. वर्तनातील उद्दीपकप्रतिक्रियांच्या जोड्या म्हणजे वर्तनाच्या आकलनातील मूलघटक मानणे पुरेसे आहे हे मत एकीकडे, तर व्यक्तिमत्त्व या पातळीवरून होणारे नियंत्रण या जोडीतून व्यक्त होऊ शकत नाही हे मत दुसरीकडे, असा हा भूमिकांचाच फरक आहे.

व्यक्तिमत्त्वाची वर्गीकरणे अगदी ग्रीकांच्या काळापासून होत आलेली आहेत. ‘मनुष्यस्वभाव’ जरी विविध प्रकारे प्रत्ययाला येत असला, तरी त्याचे काही ठराविक मर्यादित ‘घाट’ शारीरिक लक्षणांनी, शरीरप्रकृतीच्या वैशिष्ट्यांनी किंवा व्यक्तिमत्त्वगुणांच्या वैशिष्ट्यांनी सांगण्याचे प्रयत्न ॲरिस्टॉटल, क्रेअपेलीन, युंग, आयझेंक या अभ्यासकांनी केलेले दिसतात. अर्थात प्रत्येकाची त्याबाबतची धारणा मात्र भिन्नभिन्न आहे. [⟶ व्यक्तिमत्त्व].

अशा प्रकारे मानसशास्त्राचा केंद्रवर्ती अभ्यासविषय विविध अंगांनी वर्तन व अनुभव यांचा उलगडा करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींनी निश्चित केलेला आहे. प्राणिवर्तन आणि वर्तनविकृती हेही अभ्यासविषय बनले व मानसशास्त्राचा त्याही दिशेने शाखाविकास झाला. माणसाच्या वर्तनविकृती अगदी प्राचीन काळापासूनच ज्ञात आहेत. त्यांचे अर्थ आणि त्यांवरील उपचार या गोष्टीही तितक्याच पुरातन आहेत. परंतु शरीरविज्ञान, वैद्यक आणि आधुनिक मानसशास्त्राने स्वीकारलेला वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या समन्वयातून मनोविकृतीची चिकित्सा, निदान, उपचार आणि प्रतिबंध यांची निर्मिती झाली. मानसशास्त्राचा समाजोपयोगी आणि मानवतावादी आविष्कार या क्षेत्रात प्रकर्षाने जाणवण्याइतका झालेला आहे. अन्य क्षेत्रातील उपयोजन दुसऱ्‍या महायुद्धानंतर सर्व जगभर विशेष वाढलेले दिसते. मानवी जीवनाच्या बदलत्या संदर्भात व्यक्तिजीवनाचे सर्वच आधार एका पुनर्रचनेच्या प्रक्रियेत हलत, बदलत आहेत. अशा वेळी विकृतीचे प्रमाण वाढताना दिसते आणि तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेऊन सर्वसामान्य आयुष्यातील प्रश्न सोडवण्याची गरज व तयारी याही गोष्टी वाढतात. कोणत्या समाजात हे किती प्रमाणात होईल ते त्या समाजाच्या विशिष्ट ऐतिहासिक अवस्थेवर अवलंबून असते. परंतु हे जगभर घडत आहे एवढे नक्की.

मानसशास्त्राचा इतिहास : वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यापूर्वी आणि नंतर, असे या इतिहासाचे दोन भाग पडतात. परंतु पूर्वीच्या काळातच या नव्या काळातील ‘विकासाची’बीजे होती, असेही दिसून येते. तत्त्वचर्चा आणि तत्त्वज्ञानातील नीतिचिंतनाचा विषय म्हणून आत्मतत्त्व सर्वच शाखांमध्ये पहावयास मिळते. ग्रीक तत्त्वज्ञत्रयी–सॉक्रेटीस, प्लेटो, ॲरिस्टॉटल–यांच्याप्रमाणेच एंपेडोक्लीझ, हिपॉक्रॉटीझ, ⇨ हेराक्लायटस यांनीही वर्तन, अनुभव, वर्तन-नियंत्रण, आत्मतत्त्व यांविषयी सिद्धांत मांडले होते. भारतीय, चिनी तसेच जपानमधील ⇨ झेन पंथ या तत्त्वज्ञान प्रणालींनीही मानवी जीवनाचा अर्थ लावताना विश्व आणि मानव, अंतिम साध्य, जीवितहेतू इत्यादींसंबंधी विवेचन केलेले दिसते. तत्त्वज्ञानातील हे विवेचन प्रामुख्याने आत्मप्रत्यय, साक्षात्कार, तात्त्विक सुसंगती या निकषांनी नियंत्रित झाले होते. त्यात आत्मोन्नती ही अनुभवाची बाब होती. ‘तो’ अनुभव ज्याला आला त्याला त्याची अवर्णनीयताच कळते व अभिव्यक्तीच्या सर्व साधनांच्या मर्यादेपलीकडे ही अवस्था, हा अनुभूतीचा प्रांत असतो हे त्या विचारातील गृहीत होते. या गृहीतापासून जे जे ‘मार्ग’ पौर्वात्य तत्त्वज्ञानात निघाले ते ध्येयाकडे अंगुलिनिर्देश करणारे परंतु कोण कोठे पोचेल याचे सूत्र अंतःप्रेरणेच्या, कृपेच्या, गुरूपदेशाच्या हाती ठेवणारे होते. मौखिक परंपरा आणि ज्ञानाची व्यक्तिसापेक्षता यांमुळे ज्ञानसंपादन, अध्यापन या सर्व बाबतींत एकाच एका चाकोरीला मान्यता नव्हती. तरीही गुरू या श्रेष्ठतर व्यक्तीकडून शिष्यवर्ग ज्ञान मिळवत असल्याने त्यात अधि कारकल्पनेला आणि उतरंडीला महत्त्व होते सार्वत्रिकता, मापनीयता, प्रत्यंतर दाखवून करावयाची सिद्धता या गोष्टी व्यक्तिनिरपेक्ष मानलेल्या नव्हत्या. अंतिम सत्य ‘नेति नेति’ असे नकारात्मक तरी मांडले होते किंवा गूढ व साक्षात्कारगम्य मानले होते. इहवादी परंपरांचा उत्कर्ष आणि सामाजिक शक्ती येथे साधल्या नाहीत. त्यामुळे जपानी, चिनी, भारतीय मानसशास्त्र म्हणजे एकदम कन्फ्यूशस, लाव्‌ज (लाओत्स), पतंजली यांच्याइतके मागे जावे लागते. त्यातून प्रचलिताचे अर्थ लावणारी, स्वतःच्या संदर्भापासून प्रवाही होऊ शकेल अशी सिद्धांताची रचना झाली नाही.


आजचे आधुनिक मानसशास्त्र निर्माण झाले ते प्रबोधनाच्या युगानंतरच्या यूरोपातील तत्त्वचिंतनापासून. ‘आय डाउट, देअरफोर आय् एम्’ असे म्हणून ⇨ रने देकार्तने (१५९६–१६५०) सतराव्या शतकातच अधिकारवादी कल्पनेला सुरुंग लावला. पंधराव्या–सोळाव्या शतकातील कला व विज्ञान यांची प्रगती सतराव्या शतकात वैचारिक क्षेत्रातही तीव्र झाली आणि मानवी बुद्धीची मूर्त रूपेही दिसू लागली. देकार्तने मांडलेला अंतःसिद्ध कल्पनांचा (इनेट आयडियाज) सिद्धांत आणि ⇨ विवेकवाद आजही वेगळ्या रूपात टिकून आहे. पद्धतीच्या विकासात ⇨जॉन लॉक (१६३२–१७१४) यांचा ⇨ अनुभववाद हा पुरावा आणि सिद्धता यांची सैद्धांतिक बैठक बनून राहिला. मुळात एकमेकांच्या विरोधात आलेले हे सिद्धांत पुढे अधिक व्यापक वैज्ञानिक दृष्टिकोनात सामावले गेले. हॉब्ज, लॉक, बर्क्ली, ह्यूम, स्पिनोझा, लायप्निट्झ, कांट या सर्व विचारवंतांच्या परंपरेतून विश्लेषणाच्या चौकटी प्राप्त झाल्या. ‘अनुभव’ ह्या सर्वसमावेशक संज्ञेला विश्लेषणातून अनुभवाचे विविध स्तर आणि अनुभवांतील मूर्त व अमूर्त घटक यांच्या आधारे ‘अनुभवसंज्ञे’स नेमकेपणा आला. ⇨ फ्रान्सिस बेकन (१५६१–१६२६) व ⇨जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६–७३) यांचे पद्धतीच्या विकासातील योगदान फारच महत्त्वाचे आहे. जे. एस्. मिल आणि जी.टी. फेक्नर हे समकालीन आहेत, हेही येथे लक्षात घेण्याजोगे आहे. एकोणिसाव्या शतकातील भौतिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे मापनाचे, नोंदीचे क्षेत्रविस्तृत बनत गेले. कॅमेरा (१८४०), ध्वनिमुद्रण यंत्रे (१८७८), चलचित्रण कॅमेरा (१८९५) ही उपकरणे उपयुक्त ठरू लागली. औद्योगिक क्रांती, साम्राज्यविस्तार, तंत्रविज्ञान यांच्या रेट्याने जग लहान होत होते. स्वतःविषयी माणसाला आश्चर्य, कौतुक आणि भीतीही वाटावी असेच या चारपाच शतकांचे दर्शन होते. स्वतःच्या संस्कृतीपेक्षा वेगळी संस्कृती असणारे समूह एकमेकांसमोर उभे ठाकत होते आणि व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचे संदर्भही केवळ प्रादेशिक राहू शकत नव्हते. या इतिहासाने मानसशास्त्राच्या वैज्ञानिक विकासाला जशी गती दिली तसेच आव्हानही दिले आणि विविध संप्रदायांची मानसशास्त्रातील निर्मिती याच प्रक्रियेचे दर्शन आपल्याला घडविते. संप्रदायात अभिनिवेश असतो. स्वतःचा सिद्धांत सार्वत्रिक आणि एकमेव मानण्याकडे कल असतो परंतु संप्रदायांबरोबरच एक सर्वसमावेशक मध्यम मार्गही निर्माण होतो, तसा तो मानसशास्त्रातही गेल्या सव्वाशे वर्षांत निर्माण झाला.

घटकवादी -रचनावादी प्रणाली : व्हुंट, टिचनर यांनी प्रायोगिक अभ्यासाचा हेतू ‘चेतन अनुभवाच्या संरचनेचे आकलन’ असा मानला होता. ‘बोधावस्था’ हा अभ्यासविषय म्हणजे एक गुंफण वा रचना आहे. त्याचे मूलघटक निर्धारित करणे हे संशोधनाचे काम आहे, अशी ही भूमिका आहे. घटक आणि त्यांचे संबंध (एलिमेंट्स अँड रिलेशनशिप्स) या चौकटीत बोधात्मक अनुभवाची व्यवस्था लावता आली की एक ‘निखळ’वा विशुद्ध मानसशास्त्र रचता येईल, अशी शुद्धतावादी कल्पना त्यामागे आहे. प्राणी, बालक, विकृत व्यक्ती हे त्या ‘खऱ्या’ मानसशास्त्राच्या अभ्यासाचे विषय नव्हेत तसेच विशुद्ध मानसशास्त्राचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न म्हणजे सवंगपणा आहे, असे टिचनर यांचे मत होते. [⟶ रचनालक्षी मानसशास्त्र].

प्रक्रियावादी विचार : रचना ही केवळ रचना म्हणून न अभ्यासता ती कार्यदृष्ट्याही समजावून घेणे यालाच केंद्रस्थान द्यायला हवे, हा विचार व्हुंटच्या अमेरिकन विद्यार्थ्यांनीच मांडायला सुरुवात केली. वर्तन म्हणजे रचनावाद मानतो त्याप्रमाणे स्थिर घटना नाही. त्यात प्रक्रिया अंतर्भूत असतात आणि या प्रक्रिया म्हणजे त्या त्या घटकरचनांची कार्ये होत. रचनेनुसार कार्य घडत असते हा जीवशास्त्रातील विचार या ठिकाणी सरळ अंगीकारलेला दिसेल. प्रक्रियांचे वस्तुनिष्ठ वर्णन करणे आणि त्यांच्या अभ्यासासाठी नियामक परिवर्तकांची निश्चिती करणे हा आणि मग ही परिवर्तने कोणत्या घटकरचनांच्या गुण-प्रमाणभेदामुळे घडतात ते अभ्यासणे अशी विचारांची संगती या संप्रदायाने आणली. त्यानुसार यूरोपात ⇨ डेव्हिड काट्झ (१८८४–१९५३) व एडगर रूबिन (१८८६– ) यांनी संवेदनाचा एबिंगहाउस व म्यूलरने स्मृतिप्रक्रियेचा, ओस्वाल्ट क्यूल्पे व वॅट यांनी विचारप्रक्रियेचा अभ्यास केला. अमेरिका आज मानसशास्त्रातील वैचारिक व संशोधनात्मक बाजूचे नेतृत्व करत आहे. तेथे हा संप्रदाय विशेष रुळला. ⇨ जॉन ड्यूई (१८५९–१९५२), जे. आर्. अँजेल (१८६६–१९४९), आर्. एम्. यर्कीझ (१८७६–१९५६), क्लार्क हल व के. डब्ल्यू. स्पेन्स (१९०७–६७), बी. एफ्. स्कीनर (१९०४– ), बरलाईन आदी मानसशास्त्रज्ञ यांच्याकडे याचे नेतृत्व जाते. प्रायोगिक संकल्पना, आराखडा, प्रत्यक्ष कृती व वैचारिक देवाणघेवाण हे अमेरिकन मानसशास्त्राच्या विकासातील मुख्य घटक म्हणता येतील. अन्य भौतिक शास्त्रां तील तंत्रविज्ञानाचा वापर प्रयोगांसाठी करण्यातही अमेरिका आघाडीवर राहिली. इलेक्ट्रॉनिक्सचा विकास होताच नियंत्रणाचे कार्य त्यामार्फत सुरू झालेले दिसते. [⟶ प्रक्रियावादी मानसशास्त्र].

साहचर्यवाद : मानसिक जीवनातील घटकांची जोडणी व सातत्य यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न म्हणून साहचर्यवाद लक्षात घेणे जरूरीचे आहे. ब्रिटिश अनुभववादी विचारवंत हे साहचर्याचे तत्त्व सांगत होतेच. दोन उद्दीपकांमध्ये तसेच उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांमध्ये, उभयतांचे सहअस्तित्व, अनुक्रमत्व, साधर्म्य, विरोध इत्यादींमुळे बंध निर्माण होतात आणि त्या बंधांची निर्मिती होणे हेच अध्ययनाचे तसेच स्मरणाचे मर्म होय. त्यांच्या नियमांचे आकलन झाल्यास व्यक्तीच्या वर्तनाला विशिष्ट प्रकारे ‘घडवता’येईल, हा विचार साहचर्यवादी संप्रदायात अनुस्यूत होता. याचे मूळ ज्ञानप्रक्रियेविषयीच्या तत्त्वविचारात असल्यामुळे इतर अनेक ‘वादां’नी साहचर्य ही संकल्पना आपापल्या विचारप्रणालीत वापरलेली दिसेल. एबिंगहाउसच्या प्रयोगात वर्तनपातळीवर आणि थॉर्नडाइक यांच्या विश्लेषणात सैद्धांतिक पातळीवर ‘साहचर्य’ही संज्ञा स्पष्टपणे वापरण्यात आली. [⟶ साहचर्यवाद].

वर्तनवाद : कोणतीही प्रतिक्रिया उद्दीपकावर अवलंबून असते. R = f (S) हे वर्तनवादाचे आधारसूत्र होय. या विचारप्रणालीने अमेरिकन मानसशास्त्राच्या विकासात बिनीचे स्थान मिळवले. वस्तुनिष्ठेचा आत्यंतिक आग्रह, या सूत्रातूनच आधुनिक मानसशास्त्राची प्रमेये सुटणार हा दुर्दम्य विश्वास आणि इतर संप्रदायांशी प्रतिवाद करण्याचा लढाऊ पवित्रा हे वर्तनवादाचे विशेष म्हणून सांगता येतील. ‘इच्छाशक्ती’सारख्या संज्ञेपेक्षा ‘प्रतिक्षेप’ही संज्ञा अधिक शास्त्रीय होय, व्यवहारापेक्षा प्रयोगशाळा अधिक विश्वासार्ह होय, व्यक्तिगत मर्मदृष्टीपेक्षा संख्याधिष्ठित मापन आणि विवरण अधिक यथार्थ होय, अशी वर्तनवादाची इतर सूत्रे सांगता येतील. वर्तनाचे मूळघटक म्हणून प्रथम शारीरिक उलाढाल त्यांनी स्वीकारली तीही व्यक्तीने निवेदन केलेली नव्हे, तर उपकरणांद्वारे टिपलेली, रासायनिक विश्लेषणात दिसणारी व कोणालाही तपासता येईल अशी. सार्वत्रिक नियम सांगताना ‘अन्य घटक स्थिर असताना ……..’ या काटेकोरपणाचा वापर, R = f (S) – प्रतिक्रिया = f (उद्दीपक मूल्ये) किंवा, प्रतिक्रिया उद्दीपकमूल्यांवर अवलंबून असतात – याचे विवरण जास्तीत जास्त क्षेत्रात करून दाखवण्याचा आग्रह. ह्या रेट्यामुळे वर्तनवादाची विसाव्या शतकात बरीच घोडदौड झाली आणि अध्ययन, अध्यापन, वर्तनविकृती, उपचार आदी क्षेत्रांमध्ये संशोधनाचा विस्तार अफाट वाढला.

 वर्तनवादाचे वारंवार इतर विचारवंतांचे नापसंतीचे अभिप्राय व्यक्त होत होते आणि अनेकदा स्वप्ने, स्वत्व, उत्कट अनुभूती हे आमचे विषयच नव्हेत असे म्हणण्याची वेळ वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांवर आली होती. त्यासाठी ‘उंदीरशास्त्र’ (रॅटोलॉजी) असे हिणवूनही घ्यावे लागले होते. फ्रॉइडच्या मनोविश्लेषणवादाचा प्रतिस्पर्धी पवित्राही तितकाच लढाऊ ठरत होता आणि सामान्य माणसाला ज्या पातळीवर जे प्रश्न पडत होते, त्याची उत्तरे स्वतःच्या चौकटीत देण्याची त्या पक्षाची तयारी होती. या पार्श्वभूमीवर R = f (S) यात सुधारणा करणे अपरिहार्य होते आणि R = f (S, O) असे म्हणून (‘O’ म्हणजे व्यक्तिविशेष – यात शारीरिक, मानसिक दोन्ही येतात) तो बदल झालाही. प्रायोगिक परिवर्तकांमध्ये स्वंतत्र आणि अवलंबी परिवर्तकांप्रमाणेच मध्यस्थ परिवर्तकांचाही समावेश करून वर्तनवाद अधिक लवचिक बनला. इतका, की वर्तनवाद मान्य नसणारेही विश्लेषणाची R = f (S, O) ही चौकट स्वीकारायला तयार झाले. विद्यापीठीय पातळीवर हे सूत्र मानसशास्त्राच्या अभ्यासात सर्वत्र समाविष्ट झाले तथापि ते सर्वमान्य झालेच असे मात्र नव्हे.


व्यूहवाद : घटकवाद अथवा वर्तनवाद मानवी अनुभव व वर्तन यांचे विश्लेषण करून अंतिम पातळीवर उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांची अनिवर्तनीय एकके (इर्‌रिड्यूसिबल यूनिट्स) निर्माण करतात. त्याला विरोध करणारा हा संप्रदाय व्यूहवाद अथवा समष्टिवाद म्हणून ओळखला जातो. समष्टिवाद्यांनी अनुभूत पातळीला महत्त्व दिले. व्यक्ती जाणीवपूर्वक वागतात, त्यावेळी त्यांना येणारा प्रत्यय संघाताचा अथवा समष्टीचा असतो. त्याऐवजी जे न जाणवणारे सूक्ष्मतर भौतिक विशेष आहेत, त्यांना विश्लेषण घटक बनवणारे मानसशास्त्र कृत्रिम आणि कृतक बनते, असा त्यांचा आक्षेप होता. हा संप्रदाय जर्मनीत वाढला. त्याचा मुख्य प्रभाव संवेदन, मर्मग्राही अध्ययन, विचार या क्षेत्रांत राहिला, तरी आज या संप्रदायाची प्रगती उपचारपद्धतीपर्यंतही झालेली आहे. कॉफ्का, कलर, व्हेर्थायमर, ल्यूइन, डंकर, कॅटोना हे सर्व या संप्रदायाचे निर्माते व पुरस्कर्ते होत.

मनोविश्लेषणवाद : स्वतःची एक स्वतंत्र तार्किक चौकट उभारून विश्लेषणाची एक पूर्ण पर्यायी प्रणाली ⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६–१९३९) यांनी मांडली आणि काहीशा अभिनिवेशाने पुरस्कारली. वैज्ञानिक दृष्टीचा अंगीकार करून इतर नैसर्गिक शास्त्रांच्या पंक्तीला जाऊन बसवण्यासाठी चाललेली धडपड त्यांच्या काळात पहिली पावले टाकत होती. विकृत वर्तनाची चिकित्सा करताकरता प्राप्त झालेली मर्मदृष्टी व्यापक करून मनोविश्लेषणवाद तयार झाला. त्याला संप्रदाय म्हणण्यापेक्षा एका स्वतंत्र शाखेचाच दर्जा प्राप्त झाला. कोणत्याही अनुकरणाच्या भरीस न पडता परंतु प्रत्ययक्षम अशी रचना हे फ्रॉइड यांच्या स्वयंप्रज्ञेचे श्रेष्ठ रूप होते, शिवाय प्रयोगांवर आधारलेले मानसशास्त्र ज्या प्रांतांना स्पर्शही करत नव्हते, करू इच्छित नव्हते, त्यात फ्रॉइड यांनीमनःपूर्वक संचार केला, त्यातील घटनांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न केला. आधुनिक काळाचे आव्हान पेलताना फ्रॉइड व त्यांचे अनुयायी अगदी प्राचीन व आर्ष मनोजीवनापर्यंत जाऊन पोहोचले, ही एक आणखी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद केली पाहिजे. या वैशिष्ट्यांमुळे या संप्रदायाला वेगळा सामाजिक प्रतिसाद मिळाला [⟶ मनोविश्लेषण].

प्रयोजनवाद : वर्तनाकडे पाहताना त्याची उद्दिष्टे अथवा हेतू जाणून घेतले, तरच त्याचे मर्म उलगडेल, हे प्रयोजनवादाच्या भूमिकेचे मूळ विधान म्हणता येईल. वर्तनाची दिशा हेतूंमुळे निश्चित होते. हे हेतू फक्त मानवी पातळीवर दिसतात असे नाही, तर मानवेतर प्राण्यांचे वर्तनही विशिष्ट दिशांनी जात असते. या प्राण्यांच्या अभ्यासातून जीवितहेतू समजावून घेता येतात, त्यांचे मानवी पातळीवर होणारे आविष्कारही लक्षात घेता येतात, हे विल्यम मॅक्डूगल यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या विश्लेषणात उत्क्रांतिवादाला विशेष स्थान होते. वर्तनवादाने मानलेल्या हेतुशून्यतेचा त्यांनी कडाडून प्रतिवाद केला आणि मानवी पातळीवर नैतिक वर्तन व चारित्र्य यांचेही विश्लेषण केले. [⟶ प्रयोजनवादी मानसशास्त्र].

मानवत्वलक्षी (ह्यूमॅनिस्टिक) संप्रदाय : हा संप्रदाय वैज्ञानिक बैठक मानणाऱ्या संप्रदायांपैकी सर्वांत अलीकडचा संप्रदाय होय. वर्तनवादाच्या मर्यादा, मनोविश्लेषणवादाची विकृतीला प्राधान्य देण्याची भूमिका आणि दोन महायुद्धांच्या संहारक अनुभवांनी पालटून गेलेला मानवसमाज या तिन्हींच्या एकत्रित परिणामामुळे मानवतावादाचा पुरस्कार करणारे, सुदृढ जीवनाचे पथदर्शन घडवणारे मानसशास्त्र हवेसे वाटू लागले होते. कुर्ट गोल्डस्टाइन आणि अब्राहम मॅस्लो हे दोघे या संप्रदायाचे प्रमुख विचारवंत होत. त्यांचे लक्ष मानवाच्या स्वयंप्रेरणेवर होते. ही प्रेरणा स्वतःच्या उन्नतीची, स्वतःच्या आंतरिक अव्यक्त क्षमतांच्या प्रकटीकरणाची आहे, असेही त्यांचे मत आहे. माणसाच्या गरजा काही प्रमाणात प्राण्यांशी समकक्ष असल्या, माणसाचे वर्तन अनेक प्रकारे विचलित होत असले, तरी माणसाचे माणूसपण संस्कृतीच्या शोधात, स्थापनेत आणि सुधारणेत आहे. हे शक्य करणारे माणूसपण हाच मानसशास्त्राचा अभ्यासविषय होय असे हे मत आहे आणि त्यावर आधारित संशोधन पुष्कळ प्रमाणात चालू आहे. [⟶ साकल्य मानसशास्त्रे].

अतिव्यक्तिक (ट्रान्सपर्सनल) मानसशास्त्र : मानवत्वलक्षी मानसशास्त्राचे पुढचे पाऊल म्हणजे अतिव्यक्तिक मानसशास्त्र. विसाव्या शतकातील (पाश्चात्त्य) संस्कृती मनुष्याच्या ‘गरजां’च्या तृप्तीच्या विचारात गढून गेली. मानवाच्या आध्यात्मिक अंगाची उपेक्षा झाली व त्या संस्कृतीशी व तिच्या मुळाशी असलेल्या गृहीतांशी मानसशास्त्रही निगडित होऊन बसले व त्यामुळे संकुचित राहिले, या जाणिवेतून अतिव्यक्तिक मानसशास्त्र आकार घेत आहे. विश्वाचे स्वरूप, मानवाचे स्वरूप, मानवाचे विश्वातील स्थान, शरीर आणि मन यांचा संबंध, मानवाची चेतना (कॉन्शसनेस), असामान्य अशा मानसिक अवस्था इ. विषयींच्या काही विशिष्ट कल्पना गृहीत धरून आजवर मानसशास्त्राची बहुतांश वाटचाल झाली. उदा., मानव हा गरजांच्या तृप्तीसाठी धडपडत असतो त्यासाठी परिसराचा अथवा आसमंताचा साधन म्हणून उपयोग करून घेत असतो आसमंताशी अनुकूलन हेच त्याचे उद्दिष्ट असते असामान्य अथवा सामान्येतर अशा मानसिक अवस्था काहीशा विकृति-मूलक असतात बाह्य ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्याद्वाराच सर्वज्ञान व क्रिया संभवतात वगैरे कल्पना गृहीत धरल्या गेल्या. त्यामुळे मानसशास्त्रीय संशोधन विशिष्ट समस्यांभोवतीच केंद्रित राहिले आणि विशिष्ट पद्धतीच उपयोगात आणल्या गेल्या, अशी टीका आता अनेक मानसशास्त्रज्ञ करू लागले आहेत.

प्रयोगप्रधान पद्धती व तंत्रे वापरून माणसाच्या आध्यात्मिक अंगाचाही अभ्यास करण्यात आला पाहिजे. तो करणे अगदी शक्य आहे आणि तो केल्यास विज्ञान व आध्यात्मिक परंपरा ही दोन्हीही समृद्ध होतील, असे त्यांचे म्हणणे आहे. माणसाला येणारे उत्तुंग अनुभव, आंतरिक विकासासाठीचे मार्ग, विविध रीत्या निर्माण होणाऱ्‍या सामान्येतर अशा मानसिक अवस्था (आल्टर्ड स्टेट्स ऑफ कॉन्शसनेस), गूढानुभूती, अतींद्रिय संवेदन इ. ज्या गोष्टी हिंदू, बौद्ध, सूफी, ताओ, ख्रिस्ती इ. गूढवादी परंपरेत आहेत त्यांचे विज्ञान बनवणे शक्य आहे, असे अनेक मानसशास्त्रज्ञ म्हणू लागले आहेत. ज्यो कामियानी मस्तिष्क विद्युत्‌लहरी आलेख घेऊन चार्ल्स टार्ट, ह्यूस्टन, स्टॅन्ली क्रिपनर, ग्रीन वगैरेंनी ‘शारीरिक परिणामज्ञान’ ‘(बायो-फिडबॅक) तंत्र वापरून सामान्येतर मानसिक अवस्थांचा केलेला अभ्यास उदाहरणादाखल देता येईल, या विचारसरणीचे मुखपत्र म्हणून जर्नल ऑफ ट्रान्सपसर्नल सायकॉलॉजी हे नियतकालिकही सुरू करण्यात आले आहे.

मानसशास्त्राचे क्षेत्रविभाग : मानसशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या समस्यांमध्ये विशेष आस्थापूर्वक रस घेतल्यामुळे व त्यांचा सखोल आणि तपशीलवार अभ्यास होत गेल्यामुळे मानसशास्त्राच्या अनेक शाखा अस्तित्वात आल्या आहेत. जणू काय ‘अनेक मानसशास्त्रे’च या विविध शाखीय मनुष्याच्या वर्तनाचा व अनुभवाचा अभ्यास सांगोपांग तसेच विविध दृष्टिकोनांतून होण्यास साहाय्यभूत ठरली आहेत. मानसशास्त्राची ही उपक्षेत्रे वा शाखा म्हणजे : (१) शरीरशास्त्रीय अथवा जैव मानसशास्त्र (२) तुलनात्मक मानसशास्त्र (३) विकासात्मक वा बालमानसशास्त्र (४) विकास मानसशास्त्र (५) शालेय व शैक्षणिक मानसशास्त्र (६) सामाजिक मानसशास्त्र (७) चिकित्सालयीन मानसशास्त्र (८) सल्ला–मार्गदर्शनपर मानसशास्त्र (९) औद्योगिक मानसशास्त्र (१०) व्यक्तिमत्त्व – मानसशास्त्र (११) प्रायोगिक मानसशास्त्र (१२) मानसमापनशास्त्र (१३) अस्तित्ववादी मानसशास्त्र (१४) विनिमयात्मक विश्लेषण इत्यादी.

(१) शरीरशास्त्रीय अथवा जैव मानसशास्त्र (फिजिऑलॉजिकल ऑर बायोसायकॉलॉजी) : प्रायोगिक मानसशास्त्राचीच ही एक उपशाखा आहे. तिच्यात वर्तनाची प्रेरणात्मकता, संवेदने, स्मृती, भावना, प्रतिक्षेपी व ऐच्छिक क्रिया वगैरेंची शारीरिक बाजू अभ्यासली जाते. प्रतिक्षेपी (रिफ्लेक्स) प्रतिक्रियांचा पृष्ठरज्जूंशी असलेला संबंध संवेदने, स्मृती, विचार, जाणीवपूर्वक क्रिया वगैरेंचा मेंदूपृष्ठाच्या क्षेत्रांशी असलेला संबंध भावनांचा मध्यमेंदूशी, स्वायत्त (ऑटोनॉमिक) तंत्रिका तंत्राशी, अंतःस्रावी ग्रंथींशी आणि मोठ्या मेंदूशी असलेला संबंध शरीरशास्त्रीय मानसशास्त्र स्पष्ट करते. [⟶ शारीरक्रिया मानसशास्त्र].


(२) तुलनात्मक मानसशास्त्र : काही अंशी हीदेखील प्रायोगिक मानसशास्त्राचीच उपशाखा आहे. भिन्नभिन्न जातींच्या प्राण्यांचे शारीरिक परिपक्वन, त्यांच्या सहजप्रवृत्ती, त्यांची शिकण्याची प्रक्रिया, त्यांची संवेदनक्षमता, स्मृतिक्षमता व संकल्पनात्मक विचारक्षमता यांचा अभ्यास करणे एकाच जातीच्या प्राण्यांमध्येदेखील दिसून येणाऱ्‍या व्यक्तिभिन्नतेची कारणे शोधून काढणे त्या त्या जातीच्या प्राण्यांचे सामाजिक जीवन अभ्यासणे कधी कधी विकृत स्वरूपाचे ही वर्तन प्राणी करतात त्याची कारणे निश्चित करणे आणि या सर्व बाबतींत मनुष्यजातीशी तुलना करणे हे तुलनात्मक मानसशास्त्राचे कार्य होय. प्राण्यांचा असा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यामुळे मनुष्याच्या प्रेरणांचे, मनोव्यापारांचे आणि वर्तनप्रकारांचे मूलगामी विवेचन शक्य होते. प्राण्यांचा हा संशोधनात्मक अभ्यास पद्धतशीर निरीक्षण आणि शक्यतो प्रयोग करून केला जातो. [⟶ तुलनात्मक मानसशास्त्र].

(३)विकासात्मक वा बालमानसशास्त्र : जन्मानंतरच्या पहिल्या काही महिन्यांत मुलांच्या प्रतिक्रियांमध्ये संयोजन आणि जटिलता यांचा अभाव असतो. त्यांची संवेदने, त्यांच्या भावना, त्यांच्या संकल्पना, इतरांच्या संबंधात त्यांचे वर्तन वगैरेही जटिल नसतात पण मासप्रतिमास त्यांच्या मज्जसंस्थेचा परिपक्वनात्मक विकास होत जातो शिवाय, त्यांचे अनुभवाने शिकणेही चालू असते. परिणामी वर्तन आणि मानसिक जीवन उत्तरोत्तर जटिल होत जाते. वर्तनाच्या आणि मानसिक व सामाजिक जीवनाच्या या उत्तरोत्तर अवस्थांचा अभ्यास म्हणजे विकासात्मक मानसशास्त्र होय. अर्थातच बालमानसशास्त्र हा विकासात्मक मानसशास्त्राचाच एक विभाग होय. तथापि विकासात्मक मानसशास्त्रामध्ये गर्भावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्य, वार्धक्य या अवस्थांचाही शारीरिक-मानसिक दृष्ट्या अभ्यास करण्यात येतो. त्या त्या अवस्थेतील विकासास पोषक तसेच बाधक ठरणारे घटक, त्या त्या अवस्थेत घडून येणारे बदल व त्यामुळे अनुकूलनाच्या बाबतीत सर्वसाधारणपणे ज्या समस्या निर्माण होत असतात त्यांचा अभ्यास करणे, हे विकासात्मक मानसशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट होय. लहान मुलांची माता-पित्यांनी टिपून ठेवलेली निरीक्षणे विविध प्रसंग निवडून बालकांच्या वर्तनाचे –बोलण्यावागण्याचे-निरीक्षण बालकांना प्रश्न विचारणे तसेच कृतिचाचण्या देणे किशोरांच्या, प्रौढांच्या तसेच वृद्धांच्या मुलाखती इ. पद्धती व तंत्रे विकासात्मक मानसशास्त्रातील संशोधनासाठी वापरली जातात. [⟶ बालमानसशास्त्र विकासात्मक मानसशास्त्र].

(४) विकास (जेनेटिक) मानसशास्त्र : विकास मानसशास्त्र ही मानवी वर्तनलक्षणांचा उगम व विकास यांचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची शाखा होय. सुरुवातीला या विषयाच्या अभ्यासक्षेत्रामध्ये वर्तनाचा जातिविकास (फायलोजेनेसिस), वर्तनाची आनुवंशिकता (इन्हेरिटन्स) व व्यक्तीच्या जन्मानंतरचा विकास (ऑन्टोजेनेसिस) अशा तीन उपक्षेत्रांचा समावेश होत होता. आता तुलनात्मक मानसशास्त्र जातिविकासाचा अभ्यास करते. विकासात्मक (डेव्हलपमेंटल) मानसशास्त्रात व्यक्तीच्या जन्मानंतरच्या विकासाचा अभ्यास होतो. परंतु वर्तनाची आनुवंशिकता हे अजूनही पूर्णपणे न उलगडलेले संशोधनक्षेत्र आहे. त्याचा मानसशास्त्राच्या शाखेमध्ये पूर्ण विकास झालेला नाही. या संसोधनक्षेत्राला आता वर्तन-आनुवंशिकी (बिहेव्हिअर जेनेटिक्स) हे नाव देण्यात आले आहे.

व्यक्तीच्या वर्तनामध्ये दृश्यमान होणारी जी गुणलक्षणे असतात त्यांना सरूपविधा (फेनोटाईप) म्हणतात आणि ती आनुवंशिकतेने मिळणाऱ्‍याजनुकविधांद्वारे (जेनोटाईप) मिळतात. त्यांचे स्वरूप विशिष्ट गुणलक्षणांमध्ये विकास होण्याची सुप्तशक्ती असे असते. ह्या जनुकविधा शरीरपेशींमधील रंगसूत्रांवरील जनुके (जीन्‌स) आहेत. कोणत्या जनुकामधून कोणत्या गुणलक्षणाचा विकास होतो ते शोधणे हा वर्तन-आनुवंशिकीचा प्रधान हेतू आहे. त्यासाठी कोणती गुणलक्षणे आनुवंशिकतेने प्राप्त होत असतात व वर्तनाच्या दृश्यमान गुणलक्षणांच्या विकासामध्ये आनुवंशिकतेचा भाग किती, याचा अभ्यास करण्यासाठी एकच गुणलक्षण किंवा गुणलक्षणसमूह अनेक पिढ्यांमध्ये दिसून येणाऱ्‍यावंशावळींचा (पेडिग्री) अभ्यास, नात्यातील व्यक्तींच्या गुणलक्षणांचा सहसंबंध, एकबीजजन्य व द्विबीजजन्य जुळ्या मुलांमधील सहसंबंध, दत्तक घरे (फोस्टर होम्स) त्याचप्रमाणे निरनिराळ्या कुटुंबांमध्ये किंवा सांस्कृतिक पर्यावरणांमध्ये वाढलेल्या जुळ्या सहोदरांचा अभ्यास वगैरे संशोधनपद्धती वापरतात. यामध्ये आता प्रायोगिक आनुवंशिकी या नावाच्या संशोधन पद्धतीची भर पडली आहे. आण्विक विकीकरण, सूक्ष्मतरंग वगैरेंच्या साहाय्याने जनुकांमध्ये फेरबदल घडवून आणून त्याचा वर्तनाच्या विकासावर काय परिणाम होतो, याचा प्रायोगिक रीतीने अभ्यास केला जातो. हा अभ्यास सध्या फळांवरील ड्रॉसोफिला ही माशी व तत्सम प्राण्यांपुरताच मर्यादित आहे. पण वर्तन- आनुवंशिकी शास्त्रज्ञांची आकांक्षा आहे, की या विज्ञानामुळे नजिकच्या भविष्याकाळात जनुकां मध्ये इच्छित फेरफार करून आपल्याला पाहिजे तशा गुणलक्षणांनी युक्त नवी पिढी जन्माला घालता येईल. [⟶ विकास मानसशास्त्र].

 (५) शालेय व शैक्षणिक मानसशास्त्र : शालेय विद्यार्थ्यांना बुद्धी, अभियोग्यता इत्यादींच्या चाचण्या देऊन त्यांना विषय निवडण्याच्या दृष्टीने सल्ला देणे वैयक्तिक अशा मानसिक स्वरूपाच्या समस्यांबाबत त्यांना मार्गदर्शन करणे व्यवसाय निवडण्याच्या दृष्टीने सल्ला देणे इत्यादींचा अंतर्भाव शालेय मानसशास्त्रात होतो.

शैक्षणिक मानसशास्त्रातही वरील गोष्टी येऊ शकतात परंतु शैक्षणिक मानसशास्त्राचे क्षेत्र याहून अधिक व्यापक आहे. विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता वाढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक असते त्यांचे वय व मानसिक विकास लक्षात घेऊन अध्यापनाची पद्धती कशी असावी, कोणते विषय शिकवावेत व कोणत्या क्रमाने शिकवावेत विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यास वा आरोग्यास कसे जपावे शाळा-महाविद्यालये ही सामाजिक परिसराचाच भाग होत हे लक्षात घेऊन शिक्षणामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करावा हुषार मुलांचा गट निराळा करून त्यांना शिकवावे काय इ. व्यापक स्वरूपाच्या प्रश्नांचा विचार शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये होतो. [⟶ शैक्षणिक मानसशास्त्र].

(६) सामाजिक मानसशास्त्र : माणूस हा पशुपक्ष्यांप्रमाणेच देहधारी जीव (ऑर्‌गॅनिझम) होय. तोही जीवनपरिसराशी मुकाबला करण्यात व अनुकूलन साधण्यात गुंतलेला असतो. परंतु माणसाचा जीवनपरिसर केवळ भौतिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिकही असतो. कुटुंबीय, समवयस्क, सहाध्यायी, शिक्षक, शेजारी, व्यवसायबंधू इत्यादींच्या संपर्कात व सहवासात व्यक्ती वावरत आणि जगत असते. तिच्या व इतरांच्यामध्ये आंतरक्रिया चालत असतात. एकमेकांविषयी आकर्षण, नावड, दुरावा, दुष्टावा, सहकार्य, स्पर्धा आणि संघर्ष इतरांचा दबाववा प्रभाव ही त्या आंतरक्रियेची काही रूपे होत. अशा या आंतर्व्यक्तिक (इंटरपर्सनल) घटना व्यक्तींचा जीवनपट विणत असतात.


ह्या सामाजिक परिसरातील जीवनाकडे बारकाईने पाहिले, की दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात : एक म्हणजे, प्रत्येक जणाला विशिष्ट समाजाचा व त्या समाजातील कुटुंब, जनपद, संघ, संस्था इ. समूहांचा घटक म्हणून काही एक स्थान असते व त्या त्या स्थानानुसार विशिष्ट भूमिका पार पाडाव्या लागत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे, प्रत्येक समाजाची व त्यातील उपसमाजाची काही एक संस्कृती असते. त्या त्या समाजातील लोकांना महत्त्वाची वाटणारी मूल्ये (व्हॅल्यूज) त्यांचा भिन्नभिन्न वस्तूंकडे, प्राण्यांकडे वगैरे पहाण्याचा दृष्टिकोन जग, जन्म, मृत्यू इत्यादींविषयीच्या त्यांच्या समजुती (बीलीफ्स) त्यांचे रीतिरिवाज, विधिनिषेध, त्यांची रहाणी, करणी इ. गोष्टी मिळून त्यांची विशिष्ट अशी संस्कृती बनलेली असते. या सांस्कृतिक वातावरणात मुलांचे संगोपन, त्यांच्या प्रेरणांचे संस्करण, त्यांच्या अभिवृत्तींची निर्मिती, त्यांचे सामाजिकीकरण त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. व्यक्तीच्या वर्तनाचे यथार्थ व पूर्ण स्पष्टीकरण तिच्या जीवनाचा हा सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेतल्यावाचून देता येत नाही. हा संदर्भ नजरेसमोर ठेवून माणसाच्या वर्तनाचा व मानसिक जीवनाचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय. [⟶ सामाजिक मानसशास्त्र].

(७) चिकित्सालयीन मानसशास्त्र : सर्वसाधारण वर्तनाहून निराळे अपसामान्य असे वर्तन मनोविकृतीचे द्योतक समजले जाते. मनोविकृती सौम्य किंवा गंभीर स्वरूपाची असू शकते. अनामिक अथवा अकारण चिंता, अवाजवी भय, पछाडणारे विचार, अकारण थकवा, अवयवांमध्ये दोष नसताही त्यांची विक्रिया (डिस्‌फंक्शन) ही सौम्य मनोविकृतीची अथवा मनोमज्जाविकृतीची लक्षणे होत. वास्तवाची विपरीत जाणीव, आत्मगुरूता दुर्भ्रम, पीडन दुर्भ्रम, उद्दीपन व अवसाद यांचा अतिरेक इ. लक्षणे गंभीर मनोविकृतीची निदर्शक होत. समाजविरोधी वर्तन, व्यसनासक्ती, लैंगिक अपमार्गण हेही अपसामान्य वर्तनात मोडते. अशा वर्तनविकृतींचे मानसशास्त्रीय निदान, त्यांच्यावर मानसिक चिकित्सा (सायकोथेरपी), मनोरुग्णांचे पुनर्वसन तसेच वर्तनविकृतींविषयक संशोधन यांचा समावेश चिकित्सालयीन मानसशास्त्रात होतो. विकृतींचे निदान व त्यांवर चिकित्सा करणारे मानसशास्त्रज्ञ मानसोपचारज्ञ म्हणून संबोधिले जातात. जे मानसोपचारज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांचा सिद्धांत स्वीकारतात व फ्रॉइड यांच्या पद्धतीनुसार रुग्णाचे मनोविश्लेषण करतात त्यांना मनोविश्लेषक ही संज्ञा आहे. काही मानसोपचारज्ञ इतर तंत्रांचा-उदा., सूचन, संमोहन–सूचन, वर्तनाची अनुकूलनद्वारा पुनर्घडण इ.–अवलंब करतात. ह्या दोन्ही प्रकारच्या मानसोपचारज्ञांपैकी बहुतेकांनी प्रथम वैद्यकीय पदवी संपादन करून नंतर मनोविकृतीचे निदान व मानसोपचार यांचे प्रशिक्षण घेतलेले असते. वैद्यकीय उपचार सांगण्याचा, करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच असतो.

 हल्ली, काहीजण चिकित्सालयाबाहेरच्या क्षेत्रातदेखील कार्य करतात. उदा., वैवाहिक जीवनातील, व्यावसायिक जीवनातील तसेच सामान्य सामाजिक जीवनातील ताणतणाव आंतर्व्यक्तिक संबंधांबाबतच्या समस्या अतिरेकी सवयी व व्यसने लहान मुलांच्या बाबतीत उत्पन्न होणाऱ्‍या समस्या मंदबुद्धी बालकांच्या संबंधात मानसिक तसेच सामाजिक दृष्ट्या उभे राहणारे प्रश्न शस्त्रक्रियेनंतर व्यक्तीचे पुनर्वसन इ. विविध क्षेत्रांमध्ये ते लोकांच्या उपयोगी पडत आहेत.

चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांपैकी काहींनी अगोदर मानसशास्त्राची पदवी घेऊन नंतर मनोविकृतिनिदान, चिकित्सा आणि प्रतिबंधक व परिहारात्मक उपायांसंबंधीचे संशोधन करण्याचे खास प्रशिक्षण घेतलेले असते. त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे मनोविकृतीचा प्रकार निश्चित करणे व तिचे कारणनिदान करणे. त्यासाठी बुद्धिमापन कसोट्या, व्यक्तिमत्त्वगुण-कसोट्या व व्यक्तिमत्त्वमापनाची विविध तंत्रे यांचा उपयोग करावा लागतो आणि रुग्णांचा संपूर्ण पूर्वेतिहास त्याच्या व त्याच्याशी संबंधित असलेल्यांच्या मुलाखती घेऊन जाणून घ्यावा लागतो. [⟶ अपसामान्य मानसशास्त्र मानसचिकित्सा मानसिक आरोग्य].

(८) सल्ला-मार्गदर्शनपर मानसशास्त्र : चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांकडे अथवा मानसोपचारज्ञांकडे जाणाऱ्‍या लोकांच्या समस्यांहून ज्यांच्या समस्या कमी गंभीर असतात त्यांना मानसशास्त्रदृष्ट्या जो सल्ला, सूचना व मार्गदर्शन करण्यात येते, ते या सदरात मोडते. या क्षेत्रात कार्य करणारे मानसशास्त्रज्ञ शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना बुद्धिमापन कसोट्या, अभियोग्यता कसोट्या (ॲप्टिट्यूड टेस्ट्स), अभिरूची कसोट्या व व्यक्तिमत्त्व कसोट्या देतात आणि मग त्यांना व त्यांच्या पालकांना अभ्यासविषय तसेच व्यवसाय निवडण्याच्या बाबतीत सल्ला देतात. औद्योगिक क्षेत्रातही योग्य कर्मचाऱ्‍यांची व अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी मदत करतात. विद्यार्थ्यांना तसेच इतरांना लहान-सहान वैयक्तिक समस्यांच्या बाबतीतही मार्गदर्शन करतात. थोडीशी मानसिक चिकित्साही ते करू शकतात. [⟶ मानसिक कसोट्या मार्गदर्शन व सल्लामसलत].

(९) औद्योगिक मानसशास्त्र : औद्योगिक क्षेत्रामध्ये उपयुक्त ठरणारे असे मानसशास्त्रीय संशोधन आणि औद्योगिक समस्यांच्या बाबतीत मानसशास्त्रज्ञांकडून देण्यात येणारे साहाय्य यांस औद्योगिक मानसशास्त्र म्हणतात. औद्योगिक उत्पादनवाढीच्या दृष्टीने इष्ट ठरणारी कारखान्यांतर्गत भौतिक परिस्थिती हालचालींचा अपव्यय टळावा व त्या सुकर व्हाव्यात या दृष्टीने इष्ट अशी यंत्ररचना व यंत्रमांडणी कामाच्या व विश्रांतीच्या तासांची योग्य विभागणी उत्पादनवाढीबरोबरच कामगारांचा संतोष या दृष्टीने इष्ट अशी औद्योगिक संघटनेची संरचना व व्यवस्थापनपद्धती कर्मचारी व वरिष्ठ यांच्यातील संबंधाचा तसेच त्यांच्यातील संप्रेषणाचा (कम्युनिकेशन) इष्टानिष्टतेच्या दृष्टीने विचार कारखान्यातील अपघातांची कारणमीमांसा व त्यां वरील प्रतिबंधक उपाय, हे औद्योगिक मानसशास्त्रीय संशोधनाचे काही प्रमुख प्रश्न होत. [⟶ औद्योगिक मानसशास्त्र].

 औद्योगिक मानसशास्त्रज्ञ उद्योगधंद्यासाठी प्रत्यक्ष साहाय्यही करतात. ते म्हणजे लायक कर्मचाऱ्यांची तसेच अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी म्हणून बुद्धिमापन कसोट्या, अभियोग्यता कसोट्या, व्यक्तिमत्त्व कसोट्या देणे पर्यवेक्षकांना तसेच व्यवस्थापकांना नेतृत्वाचे प्रशिक्षण देणे कामगार व अधिकारी यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करणे ग्राहकांचा अभ्यास करून उत्पादकांना सल्ला देणे जाहिरातींची आकर्षकता वाढविणे इत्यादी. [⟶ व्यवस्थापनशास्त्र].

ह्या सर्व कार्यात औद्योगिक मानसशास्त्रज्ञव्यक्तींच्या गरजा व प्रेरणा, संवेदना, व्यक्तिव्यक्तींमधील आंतरक्रिया इत्यादींविषयीच्या प्रेरणा, संवेदना, व्यक्तिव्यक्तींमधील आंतरक्रिया इत्यादींविषयीच्या ज्ञानाचा उपयोग करून घेत असतात. त्यामुळे औद्योगिक मानसशास्त्र हे अनुप्रयुक्त मानसशास्त्र होय. [⟶ मानसशास्त्र, अनुप्रयुक्त].

(१०) व्यक्तिमत्त्व मानसशास्त्र (पर्सनॅलिटी सायकॉलॉजी) : खरे पहाता, प्रत्येक व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण असते. त्या त्या माणसाचे अनुभव, स्मृती, इच्छा, प्रेरणा, क्षमता, त्याची वर्तनवैशिष्ट्ये (ट्रेट्स), त्याच्या क्रियाप्रतिक्रिया ह्या सर्वांचे एकात्म असे आणि वैशिष्ट्यपूर्ण असे संघटन झालेले असते. त्यामुळेच तर प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे व्यक्तिमत्त्व असते. हे एकात्म संघटन व अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व कसे निर्माण होत असते, याचा अभ्यास व्यक्तिमत्त्व मानसशास्त्र करते. व्यक्तिमत्त्व मानसशास्त्राच्या विकासास विल्यम स्टर्न, ⇨ गॉर्डन ऑल्‌पोर्ट, गार्डनर मर्फी यांचा विशेष हातभार लागला आहे.


व्यक्तिमत्त्व मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे, की मानसशास्त्रात सर्वसाधारण माणसाच्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करणे योग्य नव्हे. जेव्हा संवेदन, स्मृती इत्यादींविषयी सामान्य तत्त्वे शोधून काढण्यासाठी प्रयोग करण्यात येतात, तेव्हा प्रयुक्त व्यक्तीकडे केवळ मनुष्यजातीचा एक नमुना या दृष्टीनेच पाहण्यात येत असते. अबोध स्तराचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ (मनोविश्लेषक) देखील असेच समजतात, की सर्वअर्भकांना समान अशा काही प्रेरणा तसेच मानसिक विकासाचे टप्पे असतात. परंतु प्रत्येक व्यक्ती ही अनन्यसाधारण असते या गोष्टीकडेही लक्ष दिले गेले पाहिजे तथापि ते पुरेसे दिले गेलेले नाही. संवेदन, स्मृती इ. मनोव्यापारांचा माणसांच्या क्रिया – प्रतिक्रियांचा, अबोध अशा मानसिक स्तरांचा वगैरे अभ्यास जरूर व्हावा परंतु सर्व मानसशास्त्रीय अभ्यास व संशोधन व्यक्तिमत्त्व हा केंद्रवर्ती विषय मानून व्हावयास हवे, अशी व्यक्तिमत्त्व मानसशास्त्राची भूमिका आहे.

(११) प्रायोगिक मानसशास्त्र : आपले वर्तन जैविक तसेच मानसिक गरजांनी प्रेरित होत असते परिसराच्या अर्थबोधाचा – संवेदनाचा – त्यावर परिणाम होत असतो त्यात अनुभवाने परिवर्तनही घडून येत असते सवयी आणि अभिवृत्ती बनत जातात. स्मृती आणि विचार या मानसिक प्रक्रियाही महत्त्वाच्या होत. या सर्वांशी कोणकोणते घटक संबंधित असतात हे प्रयोगांद्वारे निश्चित करणे, हे प्रायोगिक मानसशास्त्राचे उद्दिष्ट होय. एकोणिसाव्या शतकात शरारवैज्ञानिकांनी इंद्रिये व मज्जासंस्था यांचा संवेदनांच्या संदर्भात प्रयोगपूर्वक अभ्यास केला तेव्हापासून मानसशास्त्राला प्रायोगिक वळण लागले. [⟶ प्रायोगिक मानसशास्त्र].

(१२) मानसमापन मानसशास्त्र (सायकोमेट्रिक सायकॉलॉजी) : बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्वगुण, अभिवृत्ती इत्यादींचे मापन करण्यासाठी ज्या कसोट्या वापरल्या जात असतात त्यांचे परीक्षण करून मूल्यांकन करणे, नव्या नव्या मानसशास्त्रीय कसोट्या तयार करणे व अशा रीतीने शैक्षणिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्‍या मानसशास्त्रज्ञांना तसेच चिकित्सालयीन आणि सल्लागार मानसशास्त्रज्ञांना उपयोगी पडतील अशी (कसोट्यांच्या स्वरूपाची) साधने उपलब्ध करून देणे, ही ह्या कार्यास वाहिलेली शाखा होय.

(१३) अस्तित्ववादी (एक्झिस्टेंशिअल) मानसशास्त्र : अस्तित्ववादी मानसशास्त्र हे ⇨ सरेन किर्केगॉर, ⇨ कार्ल यास्पर्से झां पॉल सार्त्र,मार्टिन हायडेगर वगैरेंनी यूरोपामध्ये प्रवर्तित केलेल्या तत्त्वज्ञानाचा अमेरिकेतील मानसशास्त्राच्या क्षेत्रात किंबहुना मानसोपचाराच्या क्षेत्रात झालेला विस्तार आहे. अस्तित्ववादी मानसशास्त्राची वर्तनवाद किंवा मनोविश्लेषणाप्रमाणे परिपूर्ण व व्यवस्थित सिद्धांतमालिका नाही. मानसशास्त्रीय सिद्धांतापेक्षा हा विचारप्रवाह मानसोपचाराचा एक संप्रदाय म्हणूनच जास्त परिचित आहे.

अस्तित्ववादी मानसोपचाराचे आद्य प्रणेते रोलो मे, लुडविग ब्रिन्सवॅगर वगैरे मुळात फ्रॉइडच्या मनोविश्लेषण संप्रदायाचे अनुयायी होते परंतु ते फ्रॉइडप्रणीत आंतरिक नियतिवादावर नाखूष होते. वर्तनवादी पर्यावरणीय नियतिवादही त्यांना मान्य नव्हता. त्यांनी ⇨ नियतिवादाविरुद्ध झेंडा उभारला.

अस्तित्ववादी मानसशास्त्र मानवी अस्तित्वाचे महत्त्व गांभीर्याने स्वीकारते. माणसाचे स्वातंत्र्य निरपेक्ष आहे व तो कोण होणार ते त्याच्याच निर्णयावर अवलंबून आहे. मानवामध्ये अविवेकी पण बलशाली अशा मूलप्रेरणा आहेत आणि त्याने त्या ओळखून त्यांवर मात केली पाहिजे.

अस्तित्ववादाच्या मते मानवी अस्तित्व हे केंद्रीय सत्य आहे पण जगरहाटीत होरपळलेला माणूस हार खाऊन, नियतीला शरण जाऊन स्वतःचे स्वत्व गमावून बसला आहे व चिंताकुल व व्याकुळ झाला आहे. परंतु माणूस हा एकच प्राणी असा आहे, की ज्याला ‘जातस्य हि धृवो मृत्यु’हे सत्य समजू शकते. त्याला आपल्या स्थलकाल–संदर्भ–मर्यादेची जाणीव होऊन स्वतःचे निर्णयस्वातंत्र्य व त्याची जबाबदारी स्वीकारून तो आपले जीवन सार्थ व समृद्ध करू शकतो. फ्रॉइडप्रणीत मनोविश्लेषण त्याच्या स्वत्वाचे विच्छेदन करून त्याच्या दुबळेपणाची समस्या जास्तच गंभीर व क्रूर बनवते. यामुळे मनोविश्लेषणापेक्षा त्याला दिलासा, स्व-निर्णयाचे धैर्य प्राप्त होणे जास्त आवश्यक आहे.

जीवन ही एक सतत ‘घडत राहण्याची’ (बिकमिंग) प्रक्रिया आहे. व्यक्ती स्वतःचे निवडीचे व निर्णयाचे स्वातंत्र्य व त्यापासून येणारी जबाबदारी स्वीकारावयास तयार असली, तरच तिला जिवंत म्हणावयाचे. तिने स्वतःचे निर्णयस्वातंत्र्य टाळल्यास तिचे मानवी अस्तित्व संपते व ती ‘मुकी बिचारी कुणीही हका’असा अवमानव प्राणी, नियतीचे केवळ प्यादे बनते. माणसाला स्वतःच्या अनस्तित्वाची वा शून्यतेची (नथिंगनेस) होणारी जाण त्याच्यामध्ये चिंताकुलता व व्याकुळता उत्पन्न करते. ही चिंताकुलता फ्रॉइडने वर्णन केलेल्या चिंतेपेक्षा जास्त सखोल आणि मूलभूत स्वरूपाची आहे. भीतीप्रमाणे तिचे कारण सांगता येत नाही. माणसाने स्वतःच्या स्थलकाल–संदर्भातील मर्यादा स्वीकारून त्याला तोंड दिल्याशिवाय तरणोपाय नाही.

मानवाची सर्वांत सामान्य समस्या जगापासून आणि स्वतःपासून दुरावलेपणाची आहे. म्हणून अस्तित्ववादी मानसोपचारज्ञ मनोरुग्ण कोणत्या आरंभिक, मौलिक निर्णयामुळे विसमायोजित मनोरुग्ण बनला आहे त्याचा शोध करून, मुक्त साहचर्य, स्वप्नांचे अर्थघटन त्याचप्रमाणे मनोभावांतरणाचे (ट्रान्सफरन्स) अर्थघटन वगैरे साधनांचा उपयोग करून त्याला दिलासा देतो. स्वतःच्या निर्णयशक्तीचा आणि जबाबदारीचा स्वीकार करण्यास त्याला उद्युक्त करतो व त्यासाठी त्याला धैर्य देऊन त्याच्या जीवनात सार्थता, पुरुषार्थ आणण्याचा प्रयत्न करतो. [⟶ अस्तित्ववाद रूपविवेचनवाद].

(१४) विनिमयात्मक विश्लेषण (ट्रँझॅक्शनल ॲनॅलिसिस) : विनिमयात्मक विश्लेषण म्हणजे एरिक बर्न (१९१०–७०) यांनी सुरू केलेले समूह मानसोपचाराचे तंत्र व त्यामागील सिद्धांत यांचा समूह आहे. यामध्ये अनेक परस्परस्पर्शी मानसोपचार तंत्रांचे मिश्रण आहे. फ्रॉइडच्या मनोविश्लेषण सिद्धांताप्रमाणे या विश्लेषणात व्यक्तिमत्त्वाचे तीन घटक कल्पिलेले आहेत पण त्यांची स्वरूपे मात्र वेगळी आहेत. मनोविश्लेषण – मानसोपचार–तंत्राप्रमाणे अर्थघटन व विश्लेषणावर भर आहे. वर्तन मानसोपचाराप्रमाणे वैज्ञानिक काटेकोरपणा आणि संशोधनावर भर आहे. समष्टी मानसोपचाराप्रमाणे उपचाराच्या वेळची परिस्थिती (सेटिंग) तसेच ‘इथे व आत्ता’ (हिअर अँड नाउ) वर भर आहे. मूलगामी परिवर्तनवादी (रॅडिकल) मानसोपचाराप्रमाणे त्याचप्रमाणे टॉमस एस्. स्झास्झ यांच्या मते मनोविकृती हे वर्तनाच्या वर्गीकरणाला दिलेले केवळ नाव (लेबल) होय. त्याचप्रमाणे एलिसच्या बुद्धिप्रधान मनोवेगात्मक (रॅशनल ईमोटिव्ह) मानसोपचाराप्रमाणे विचारशक्ती व वास्तविकतेची कदर यांवर भर तर आहेच, पण व्यावहारिक उपागमसुद्धा(ॲप्रोच) आहे.


सर्व लोकांमध्ये ‘अहं’च्या तीन अवस्था किंवा रूपे असतात : (१) बालक : हे अपक्व असते, त्याला गंमत–जंमत, खेळ यांचे आकर्षण असते व तात्कालिक इच्छापूर्ती पाहिजे असते. (२) प्रौढ : हा विचारवंत, विवेकी, निवड करणारा, निर्णय घेणारा व शिक्षणक्षम असतो. वास्तविकतेचा अंदाज घेऊन तो पावले टाकतो. (३) पालक : जो निवडीची जबाबदारी घेतो व योग्यता–अयोग्यता पाहातो. वर्तनावर देखरेख ठेवतो. नीतिनियम, मानांक वगैरेंच्या कसोटीने वर्तनाचे मूल्यांकन करतो. त्याचप्रमाणे गैर वा अयोग्य वर्तनाबद्दल व्यक्तीला आतल्या आत दोष देतो, शिक्षा करतो.

‘अ’ व ‘ब’ ह्या व्यक्तींमधील सामाजिक देवाणघेवाण (सोशल इन्टरकोर्स) किंवा प्रतिक्रिया-विनिमयामध्ये (ट्रँझॅक्शन) ‘ब’ ला उद्देशून ‘अ’ शब्दात्मक प्रतिक्रिया करतो. बोलणे, सूर, हावभाव, भावनिक अभिव्यक्ती वगैरेंवरून त्याच्यामधला कोणता घटक ह्या प्रतिक्रियेच्या मुळाशी आहे ते समजू शकते. ‘ब’ त्याला उलट प्रतिक्रिया करतो. त्या प्रतिक्रियेमागील कोणता घटक ‘अ’ च्या कोणत्या घटकाला उद्देशून ही प्रतिक्रिया करत आहे ते समजू शकते. या क्रिया-प्रतिक्रिया किंवा हा विनिमय अ आणि ब यांच्यातील समान घटकातच होत असला, तर तो कुसमायोजनजनक नसतो परंतु तो विषम घटकी असला, तर मात्र त्यात कुसमायोजनाचा संभव असतो. एरिक बर्न कुसमायोजन (मालॲडजेस्टमेंट) हा शब्द वापरतो मनोविकृती किंवा मनोरोग हे शब्द वापरत नाही. कारण त्याच्या मते हे शब्द कुसमायोजनाची वर्गवारी करण्यासच उपयोगी पडतात. 

सामाजिक विनिमयामध्ये दर्शनी किंवा व्यक्त संदेशाबरोबर दुसरा कोणतातरी छुपा संदेश असू शकतो आणि त्याचे प्रतिक्रिया देणाऱ्याला भान असत नाही. अशा वेळी सामाजिक विनिमय जटिल होतो व ही जटिलता कमी-अधिक प्रमाणामध्ये असते. हे छुपे संदेश न बोललेले शब्द, हावभाव, आवाजाच्या स्वरामधील चढ-उतार वगैरेवरून ‘ब’ ओळखू शकतो व त्याची उलट प्रतिक्रिया बव्हंशी या छुप्या संदेशाला अनुसरूनच असते. त्यामुळे आंतरव्यक्तिक संबंध बिघडायला मदत होते.

समूह मानसोपचारामधे हे छुपे संदेश व्यक्त संदेशापासून अलग केले जातात. मानसोपचारज्ञ ते शब्दात व्यक्त करतो किंवा फळ्यावर आकृतीच्या मदतीने दाखवतो. व्यक्त संदेशापेक्षा ते कसे निराळे आहेत, त्यामुळे विनिमयाचा संदर्भ कसा बदलू शकतो, त्यांमागील धारणा कशा असतात वगैरेंचे तो विश्लेषण करतो. समूह मानसोपचाराच्या बैठकीमध्ये भाग घेणाऱ्‍या व्यक्तींमध्ये क्रिया-प्रतिक्रियात्मक विनिमय चालतो व मानसोपचारज्ञ त्याचे विश्लेषण व अर्थघटन करत जातो. यामध्ये प्रत्येकाला स्वतःमध्ये असलेल्या विसंगतीची जाणीव होते. त्याला सौम्य किंवा तीव्र धक्के बसतात व यामधून हळूहळू त्याच्या क्रिया-प्रतिक्रियांमध्ये व त्यांमागील घटकांमध्ये फेरबदल व्हायला लागतात. विसंगतींचे प्रमाण कमी होत जाते व पूरक क्रिया-प्रतिक्रियांचे प्रमाण वाढते. परिणामी मनोरुग्ण इतरांच्या दृष्टीने स्वतःकडे पाहावयास शिकतो व सरळ किंवा निरोगी सामाजिक विनिमय करण्यास समर्थ होतो. विनिमयात्मक विश्लेषणाचा प्रधान हेतू व्यक्तीचे सामाजिक संबंध व विनिमय सुधारण्याचा असतो. [⟶ विनिमयात्मक विश्लेषण].

मानसशास्त्रीय अभ्यासाच्या पद्धती : अनुभवनिष्ठता व वास्तवशरणता हे विज्ञानाचे वैशिष्ट्य होय. ज्यांच्या आधारे भाकित करणे शक्य होते तसेच घटनांवर एक प्रकारे नियंत्रण राखणे शक्य होते अशी सर्वसामान्य तत्त्वे वा नियम शोधून काढणे, हे विज्ञानाचे उद्दिष्ट असल्यामुळे स्वैर कल्पनांचे अथवा तर्काचे विज्ञानास वावडे असते. केवळ अंतःस्फुरित विचार, रूढ लौकिक समजुती, दंतकथांच्या स्वरूपाचा पुरावा व केवळ प्रसंगवशात केलेली निरीक्षणे यांवरही वैज्ञानिक भिस्त ठेवीत नाहीत.

संशोधनवृत्तीने प्रेरित होऊन अभ्यासार्थ घेतलेली एक एक समस्या स्पष्टपणे ठरवून घेणे तिच्यासंबंधात असा काही एक निश्चित गृहीतक करणे, की ज्याच्या यथार्थतेचा पडताळा घेता येईल त्या गृहीतकापासून निगमने करणे मग निरीक्षण व प्रयोगांद्वारे त्यांची साधारता – निराधारता तपासून ग्राह्य असा विगमनात्मक सामान्य नियम बांधणे त्याच्या आधारे पुनः निगमने करून त्यांची वास्तविकता तपासणे व त्या नियमांत आवश्यक ती सुधारणा करणे अशी चक्राकार वाटचाल ही विज्ञानाची सर्वसामान्य पद्धती असते. अशा तऱ्‍हेने निष्पन्न झालेल्या नियमांची संगती लावणे व त्यांची प्रणाली (सिस्टिम) बनवणे हे विज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट असते.

मापन (मेझरमेंट) हे विज्ञानाचे आणखी एक वैशिष्ट्य होय, असे पुष्कळदा मानले जाते. प्रतिष्ठा पावलेली भौतिक विज्ञाने मापनप्रधान आहेत, हे त्यांचे कारण होय परंतु विज्ञानासाठी मापन आवश्यकच आहे असे मात्र नाही. उदा., प्राणिविज्ञानातील प्राण्यांचे वर्गीकरण, त्यांची शरीररचना व त्यांच्या क्रिया यांविषयीचे ज्ञान तसे मापनाधिष्ठित नाही.

वर्तन आणि वर्तनाशी संबद्ध असलेल्या मानसिक प्रक्रियांच्या व घटकांच्या अभ्यासासाठी मानसशास्त्रज्ञ विविध पद्धतींचा अवलंब करतात आणि अभ्यासार्थ हाती घेतलेल्या समस्येशी संबद्ध अशी तथ्ये (फॅक्ट्स) उपलब्ध करून घेण्यासाठी अनेकविध तंत्रेही वापरतात.

संवेदन, स्मरणप्रक्रिया, विचारप्रक्रिया इत्यादींचे स्वरूप अभ्यासण्यासाठी अंतर्निरीक्षण पद्धतीचे साहाय्य घ्यावे लागते. व्यक्तिमत्त्वमापन, अभिवृत्तिमापन इत्यादींसाठी वापरल्या जाणाऱ्‍या प्रश्नावली आणि कसोट्यादेखील अंतर्निरीक्षणसापेक्ष अशाच असतात.

वर्तनाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतींचे अप्रायोगिक व प्रायोगिक असे दोन वर्ग पडतात. अप्रायोगिक पद्धतींच्या सदरात क्षेत्रीय निरीक्षण, सहभागपूर्वक निरीक्षण (पार्टिसिपंट ऑब्झर्व्हेशन), व्यक्तीचा विविधांगी विकास अभ्यासण्यासाठी वैकासिक निरीक्षण, सर्वेक्षण-पद्धती, व्यक्तिइतिहाससंकलन व मानसशास्त्रीय कसोट्यांचा समावेश असलेली चिकित्सालयीन पद्धती यांचा अंतर्भाव होतो. प्रयोगपद्धतीत विविक्षित प्रकारचे प्रसंग योजून, अर्थात विविक्षित घटक नियंत्रणाखाली ठेवून निरीक्षण करण्यात येते. [⟶ प्रयोग वैज्ञानिक पद्धति].

मानसशास्त्रीय कसोट्या : व्यक्तीचा बुद्धिमत्ता, अभियोग्यता, अभिवृत्ती, व्यक्तिमत्त्वगुण इत्यादींचे मापन करून तिच्या शैक्षणिक प्रगतीविषयी अंदाज बांधता यावा, तिला व्यवसायनिवडीबाबत सल्ला देता यावा, तिची इतर व्यक्तींशी तुलना करता यावी, विशिष्ट कामासाठी लायक व्यक्ती निवडता याव्यात इ. उद्दिष्टांनी प्रेरित होऊन मानसशास्त्रज्ञ अनेकविध कसोट्या म्हणजेच प्रमाणित स्वरूपाची साधने वापरतात. मानसशास्त्रीय कसोट्यांचा उपयोग वर्तनविषयक सर्वसामान्य तत्त्वे प्रस्थापित करण्याच्या कामीही करून घेता येतो. सिद्धी कसोट्या, बुद्धिमापन कसोट्या, अभियोग्यता कसोट्या, प्रश्नावलीरूप व्यक्तिमत्त्व कसोट्या, व्यक्तीच्या अंतरंगाचा शोध घेणाऱ्‍या प्रक्षेपण कसोट्या, ही मानसशास्त्रीय कसोट्यांची काही उदाहरणे होत.

अकोलकर, व.वि. बनारसे, श्यामला.

भारतीय मानसशास्त्र : भारतीय तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने भारतात वाढ झालेल्या मानसशास्त्रीय विचारप्रणालींचा अंतर्भाव ‘प्राचीन भारतीय मानसशास्त्र’या संज्ञेत करता येईल. प्राचीन भारतीय मानसशास्त्र हे बौद्ध, जैन, सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, मीमांसा–वेदान्त इ. भारतीय दर्शनशाखांतील विचारवंतांनी व तत्त्वज्ञान्यांनी वाढविले पण ते मुख्यतः तात्त्विक, चिंतनपर व स्वानुभवमंथनावर आधारलेले होते. [⟶ केवलाद्वैतवाद जैन दर्शन न्यायदर्शन पूर्वमीमांसा बौद्ध दर्शन योग दर्शन वैशेषिक दर्शन सांख्य दर्शन].


भारतातील आधुनिक मानसशास्त्रीय संशोधन : १९१४ मध्ये कलकत्ता विद्यापीठात प्रथमतः मानसशास्त्राचे पहिले अध्यासन तयार करण्यात आले आणि या पदावर एन्. एम्. सेनगुप्त यांची नेमणूक करण्यात आली. १९१६ मध्ये म्हैसूर विद्यापीठा त (महाराजा कॉलेजमध्ये) मानसशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा प्रथम निर्माण केली गेली. आज भारतामध्ये सु. ८० हून अधिक विद्यापीठांत मानसशास्त्र हा स्वतंत्र पदव्युत्तर विभाग म्हणून मान्य करण्यात आला आहे तसेच जवळजवळ २,५०० प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ आपापल्या शाखेत कार्य करीत असल्याचे दिसून येते. दरवर्षी सु. ५० प्रबंध मानसशास्त्रातील डॉक्टरेटसाठी मान्य होतात आणि अनुक्रमे ३०० आणि १,००० विद्यार्थी मानसशास्त्र विषयात एम्. ए. आणि बी. ए. किंवा तत्सम पदवी संपादन करताना दिसून येतात. भारतात सध्या मानसशास्त्र विषयासवाहिलेली सु. २० दर्जेदार नियतकालिके आहेत. त्यात महाराष्ट्रातील एकमेव नियतकालिक म्हणून मुंबईच्या बॉम्बे सायकॉलॉजिस्टचा निर्देश करता येईल. ‘इंडियन सायकॉलॉजिकल असोसिएशन’ ही भारतीय मानसशास्त्रज्ञांची सर्वमान्य राष्ट्रीय पातळीवरील व्यावसायिक संघटना आहे आणि तिचे सु. ६०० सभासद आहेत.

प्रारंभी ‘शैक्षणिक मानसशास्त्र’, ‘मनोमापन’, ‘प्रायोगिक मानसशास्त्र’ इ. विशिष्ट शाखांतच आणि तेही मर्यादित असेच संशोधन येथे होई पण दुसऱ्या महायुद्धानंतर संशोधनकार्यात मोठीच प्रगती होत गेली. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर तसेच एस्. एन्. डी. टी मुंबई या चार विद्यापीठांत स्वतंत्र मानसशास्त्र विभाग व सुसज्ज प्रयोगशाळा आहेत. कलकत्ता, म्हैसूर, मुंबई, मद्रास, पुणे, वॉल्टेअर, दिल्ली, चंडीगढ, मीरत, वाराणसी, बडोदा या विद्यापीठांत पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग आहेत. येथून बाहेर पडलेले प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ आज संरक्षण, उद्योग, रुग्णालये, व्यवस्थापन, कुटुंबकल्याण इ. विविध क्षेत्रांत कार्य करीत आहेत. स्वतंत्र व्यवसायक्षेत्रात अनेक चिकित्सामानसशास्त्रज्ञ, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ, व्यवस्थापन-मानसशास्त्रज्ञ यांचा समावेश होतो.

काही लक्षणीय संशोधन : मानसशास्त्रीय संशोधनात मुख्यतः दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळानंतर वाढ झाली. प्रायोगिक व तौलनिक मानसशास्त्र आणि तदनुषंगिक मनोमापनविज्ञानात भारतीय मानसशास्त्रज्ञांनी वेदन,स्मृती व अध्ययन, प्राण्यांचे सामाजिक वर्तन, रसायनांचा वर्तन – परिणाम तसेच मनोमापनविज्ञानाची क्षेत्रे यांत मोलाचे संशोधन केले. उदा., कोणत्याही भाषेतील शब्दसंग्रहाची स्मृती आपणास जोपासवयाची व वाढवावयाची असेल, तर निदान नाम वा विशेषणवाचक शब्दांचे बाबतीत तरी अध्ययनास चित्ररूपाची जोड असल्यास अधिक साहाय्य मिळते. तसेच पठण-उच्चारणादी कार्यक्रमाधारित अध्ययनपद्धती (प्रोग्राम्ड लर्निंग) शब्दाध्ययनास चांगलीच उपयुक्त व सहजशक्य असते असेही श्री. वा. काळे आणि ग्रॉसकाइट यांनी दाखवून दिले. अर्थरहित शब्द भाषादृष्ट्या अर्थरहित वाटले, तरी विशिष्ट व्यक्तींच्या दृष्टीने ते किंचित-ते-महादार्थयुक्त असतात, हे ग्लेझ आणि नोवल यांचे सूत्र वापरून धर्म, संस्कृती इ. भावविश्वातील अर्थ सूचित करणाऱ्‍या त्यांच्या गुणविशेषामुळेही या प्रकारच्या अर्थहीन अशा शब्दांचे अध्ययन अधिक त्वरित होऊ शकते, हेही कोठूरकरांसारख्या मानसशास्त्रज्ञांनी प्रयोगाच्या साहाय्याने दाखविले आहे. प्राणिमानसशास्त्र किंवा तौलनिक मानसशास्त्र या शाखेतील प्राण्यांतील आक्रमणप्रवृत्तीचे आणि श्रेष्ठ-कनिष्ठ संबंधाविषयीचे मूलभूत संशोधन, रासायनिक द्रव्याचा स्मृती आणि कारक कौशल्य – अध्ययन यांवर होणारा परिणाम या समस्यांवरही सिंग व सिन्हा यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. प्रायोगिक पद्धतीचा उपयोग करून संवेदन, भ्रम, स्वप्न, औद्योगिक कार्यकौशल्याचा काळ-गति-मितव्ययाचे नियम या दृष्टीने अभ्यास चालू आहे. तसेच मनोमापनशाखेत श्रेणीवर्धन (स्केलिंग), समुच्चयविश्लेषण वा समाजमिती (सोशिओमेट्री), कसोटी-रचना (टेस्ट-कन्स्ट्रक्शन) या समस्यांचे बाबतीत कुप्पुस्वामी, राधानाथ रथ, व्ही. कृष्णन्. राव. उदय परीख, विश्वनाथ मुकर्जी इ. मानसशास्त्रज्ञांनी अनेक दिशांनी संशोधन केले आहे.

‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ या केंद्र सरकारने स्थापिलेल्या संस्थेत देशातील अनेक मानसशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ एकत्र आणून भारतीय पातळीवर महत्त्वाचे संशोधनकार्य १९५९–६० च्या सुमारास सुरू झाले व ते शिवकुमार मित्र, मल्होत्रा इत्यादींच्या नेतृत्वाखाली आजतागायत चालू आहे. त्यांतील काही संशोधनाचा येथे थोडक्यात उल्लेख केला आहे : बालकांचा शैक्षणिक मनोविकास – अडीच ते पाच वयापर्यंत आणि साडेपाच ते अकरा वर्षांच्या कालावधीत कोणत्या महत्त्वाच्या टप्प्यांनी होत असतो –आणि तसा तो होत असताना बालक, पालक, शिक्षक तसेच शालेय, आर्थिक व सांस्कृतिक परिसर इ. नियामकांचा आणि त्यांच्यात होणाऱ्‍या परस्पर क्रियांचा त्यांच्यावर कोणता परिणाम होत असतो, याबाबतीत येथे अत्यंत उपयुक्त संशोधन झाले आहे. शिक्षणशास्त्र व मानसशास्त्र दृष्ट्या कोणते क्रमिक व शैक्षणिक वाङ्‌मय विद्यार्थ्यांच्या हातात देणे इष्ट आहे, शास्त्र व गणित या आधुनिक जीवनास उपयुक्त असलेल्या दोन विषयांचे शिक्षण देणाऱ्या शास्त्रशुद्ध पद्धती कोणत्या, या बाबतीतही वरील संस्थेतील आणि त्यांनी पुरस्कारिलेल्या मानसशास्त्रज्ञांनी बराच पुढाकार घेतला आहे. पेंडसे यांच्या नेतृत्वाने पुण्यात स्थापन झालेल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे मानसिक गुणवत्ता शोध व शिक्षण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे.

सामाजिक मानसशास्त्र हे अधिकाधिक प्रायोगिक बनलेले आहे. दुसऱ्‍या महायुद्धापूर्वी या शाखेत अभ्यासिले जावयाचे मुख्य विषय म्हणजे सामाजिक अभिवृत्ती, त्यांचे मापन आणि अभिवृत्तीत बदल होण्यामागील प्रमुख कारणे हे होते. तथापि १९२८ मध्ये बिहारमध्ये भूकंपामुळे जी प्रचंड हानी झाली, त्याविषयी काही भारतीय मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या लोकांच्या संकटकालीन अभिवृत्तींचा अभ्यास हा पुढे फेस्टींजरसारख्या ज्ञानरूप विसंवादा’ची (कॉग्निटिव्ह डिझोनन्स) उपपत्ती मांडणाऱ्या प्रख्यात पाश्चात्त्य मानसशास्त्रज्ञांना उपयोगी पडला. १९५० मध्ये प्रख्यात अमेरिकन समाजमनोवैज्ञानिक गार्डनर मर्फी भारतास भेट देऊन गेले. त्यावेळी त्यांच्या सक्रिय प्रोत्साहनाने भारतातील सामाजिक तणावांचाही येथील मानसशास्त्रज्ञांनी बराच शास्त्रीय अभ्यास केला. त्यानंतर भारतीय मानसशास्त्रज्ञांनी गुणारोपण प्रक्रिया (ॲट्रिब्यूशन), आक्रमणप्रवृत्ती, संप्रेक्षण, सामाजिक आचारात दिसून येणारे हिंसाचार, बलात्कार इ. सामाजिक वर्तनप्रकारांचा अधिक सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. परहितकेंद्री वर्तनाचे संशोधनही प्रायोगिक पद्धतीने मुंबई, अलाहाबाद, कानपूर इ. ठिकाणी चालू आहे. सामाजिक व औद्योगिक मानसशास्त्राचा अन्योन्यसंबंध मिळताजुळता आहे. उद्योग-संदर्भात आवश्यक असलेले नेतृत्व संपूर्ण हडेलहप्पीही नको वा संपूर्ण लोकशाहीही नको तर ते अधिकृत (ऑथोरिटेटिव्ह) व पोषक (नर्चरनल) हवे, असे मत जी. बी. पी. सिन्हा यांनी संशोधनाअंती मांडले आहे. बंगलोर, दिल्ली व चंडीगढ येथील संस्थांतील मानसशास्त्रज्ञही मनोविकृतींची अनेक जैविक, रासायनिक व वंशदायी कारणे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करताना दिसत आहेत. भारतामध्ये पाश्चात्त्य देशांपेक्षा मनोविकृतींचे प्रमाण कमी आहे, असा समज सर्वसाधारणपणे रूढ आहे पण या समजुतीस धक्का देण्याचे संशोधनाधारित कार्य गांगुली, विन्, नंदी, सुधीर कक्कर आदी संशोधकांनी केले आहे तसेच मानसिक स्वास्थ्याची प्रधान अंगे कोणती, अपघातप्रवणतेची भौतिक कारणे काय असावीत याचेही संशोधन गांगुली, विन् यांनी करून त्याबद्दल पारितोषिके मिळविली आहेत.

औद्योगिक मानसशास्त्रक्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या कामाविषयी दिसून येणारी आस्था – अनास्था प्रवृत्ती याचे मूळ कर्मचारी – पर्यवेक्षक यांच्या संबंधात कसे आढळते, याविषयीचे निदान दुर्गानन्द सिन्हा, एस्. के. बोस, हरीश गांगुली आदी मनोवैज्ञानिकांनी दाखविले आहे, तर औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी किंवा व्यवस्थापक यांच्या मनात असणाऱ्या चिंता, मानसिक तणाव इत्यादींचे स्वरूप निश्चित करणारे संशोधन सिन्हा, काळे आदींनी केले आहे आणि भारतीय नागरिक तुलनेने चिंतामुक्त वा तणावमुक्त असतात हा समज चुकीचा आहे, हेही दाखविले आहे. कर्मचारी आपल्या कामात कोणत्या गरजेला प्राधान्य देतात आणि कार्यविश्वातील गुणवत्ता कशी राखता येईल तसेच त्यासाठी इष्ट अशी औद्योगिक रचनापद्धती कोणती असावी, .याचा विचार सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट (मुंबई) येथील ओंकार गांगुलींसारख्या शास्त्रज्ञांनी केला असल्याचे दिसून येते. व्यक्तिमत्त्वाचे मानसशास्त्र, कलांचे मानसशास्त्र, खेळ व क्रीडा स्पर्धांचे मानसशास्त्र इ. इतर मानसशास्त्राच्या शाखा अशा आहेत, की त्यांमध्ये भारतीय मानसशास्त्रज्ञांनी कमीअधिक प्रमाणात संशोधनकार्य केले आहे.

काळे, श्री. वा.

संदर्भ : 1. Boring, E. G. and Others, The Foundations of Paychology, New York, 1948.

             2. Coopersmith, S. Frontiers of Psychological Research, San Francisco, 1966.

             3. Engle, T. L., Snellgrove, Louis, Psychology : Its Principles and Applications, Harcourt, 1979.

             4. Guthrie, R. V. Psychology, in the World today, Reading, Mass, 1968.

             5. Hilgard, E. R. Atkinson, R. C. Introduction to Psychology, New York, 1967.

             6. Lewis, D. J. Scientific Principles of Psychology, Englewood cliffs N. J., 1963.

             7. Marx, M. H. Theories in Consemporary Psychology, New York, 1963.

             8. Mitler, G. A. Psychology : The Science of Mental Life, New York, 1962.

             9. Morgan, C. T. King, B. A Introduction to Psychology, New York, 1966.

             10. Murphy. Gardner. An Historical Introduction ot Modern Psychology, New York, 1949.

             11. Newcomb, T. M. Ed. New Directions, in Psychology, 3 Vols., New York, 1962 – 67.

             12. Rangland, R. G. Saxon, Burt. Invitation to Psychology, Scott, Foresman, 1981.

             13. Russell, R. W. Ed., Frontires in Psychology, Chicago, 1964.

             14. Weinstein, Grace, People Study People : The Story of Psychology, Dutton, 1979.

             15. Whittaker, J. O. Introduction of Psychology, Philandelphia, 1965.