मिलिपीड : (१) काळा मिलिपीड (टॅचिपोडोइयुलस नायगर), (२ ) सुमात्रेतील मिलिपीड (प्लॅटिर्‍हॅकस मिरँडस), (३) इयुलस प्रजातीतील मिलिपीड जाती.

मिलिपीड : आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघाच्या डिप्लोपोडा वर्गातील प्राणी या नावाने ओळखले जातात. यांचे शरीर दंडगोलाकार अळीसारखे असून ते खंडयुक्त असते. हे वायुश्वासी असून यांच्या शरीरावर पुष्कळ पाय असतात म्हणून यांना सहस्रपाद असेही म्हणतात. यांचा समावेश पूर्वी मीरिॲपोडा या वर्गाच्या एका गणात केला जात असे पण आता नवीन वर्गीकरण पद्धतीप्रमाणे यांचा समावेश डिफ्लोपोडा या स्वतंत्र वर्गात केला जातो.

मिलिपीड जगात सर्वत्र आढळतात. त्यातल्या त्यात उष्ण प्रदेशात ध्रृवीय प्रदेशापेक्षा हे जास्त आहेत. यांचे जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) कार्‌बॉनीफेरस (सु. ३५–३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात आढळले आहेत. यांपैकी काही जीवाश्मांची लांबी ३० सेंमी इतकी आहे भारतात डिप्लोपोडाच्या सु. ११५ जाती माहीत असून त्यांची विभागणी ५० प्रजातींत होते. यांची लांबी ०·२ मिमी. ते ३०० मिमी. पर्यंत व जाडी ५० मिमी. पर्यंत असू शकते. शरीराच्या पाचव्या खंडापासून अखेरपर्यंत प्रत्येक खंडावर पायांच्या दोन जोड्या असतात. यांच्या कोणत्याही पायावर विषारी नखर नसते. तरी सर्वसाधारणपणे शरीर दंडगोलाकार असले, तरी काही जातींच्या मिलिपिडांचे शरीर चपटे असते. शरीरावर कॅल्शियमयुक्त कवचाचे आवरण असते. जसजशी मिलिपिडाची वाढ होते, तसतशी ही कवचे कात टाकल्याप्रमाणे टाकली जातात. यानंतर नवीन कवच येण्यापूर्वी कातडे मऊ असते. या काळात मिलिपीड सांदीकपारीत लपून बसतात. कवचाखेरीज स्वसंरक्षणाकरिता मिलिपिडाच्या शरीरात काही दुर्गंधीयुक्त ग्रंथीही आहेत. शरीराच्या बाजूला असलेल्या रंध्रांतून या ग्रंथींचा स्राव द्रवाचा थेंब किंवा वायुरूपाने बाहेर फेकला जातो. या स्रावाचे घटक निरनिराळ्या जातीत निरनिराळे असतात. साधारणतः त्यात हायड्रोसायनिक अम्ल, आयोडीन व क्विनोन असते. याचा वास तिखट, झोंबणारा असतो व त्यामुळे कीटक मृत्यू पावतो. माणसाच्या कातडीशी या स्त्रावाचा संबंध आल्यास कातडीवर काळे डाग पडतात. कालांतराने कातडी निघून जाते पण तिच्याखालील जखम भरण्यास वेळ लागतो.  डोळ्यावर या स्त्रावाचा विपरीत परिणाम होतो. कुक्कुटपालन क्षेत्रात बऱ्याच कोंबड्या मिलिपिडाच्या दुर्गंधीयुक्त स्त्रावाशी संपर्क आल्याने आंधळ्या झाल्याचे आढळून आले आहे.

मिलिपिडाच्या डोक्यावर लघुशृंगिकांची (सांधेयुक्त स्पर्शेंद्रियांची) एक जोडी असते. डोक्याच्या दोन्ही बाजूंस एक किंवा जास्त अक्षिका (साधे, लहान डोळे) असतात. काही जातींत एकही अक्षिका आढळत नाही. जंभाची (अन्न धरण्यासाठी वा चावण्यासाठी असलेल्या उपांगांची) एकच जोडी असते. जंभिकांची (जंभामागील रूपांतरक्षम उपांगांची) एकच जोडी असते. जंभिकांच्या दुसऱ्या जोडीचे रूपांतर अधरोष्ठात (खालच्या ओठात) झालेले असते. गोमेत आढळणारे विषारी जबडे मिलिपिडात आढळत नाहीत.

मिलिपीड श्वासनलिकेद्वारे श्वसन करतात. या श्वासनलिकेचे रंध्र प्रत्येक खंडावर पायाजवळ असते. अन्ननलिका सरळ व लहान असते. ती अग्रांत्र (आतड्याचा पुढील भाग), मध्यांत्र व पश्च्यांत्र यांत विभागलेली असते. मुख अग्रभागी असते व त्यात लाला ग्रंथीचा स्त्राव जातो. उत्सर्जन (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी असलेल्या) नलिका पश्चांत्रात जातात. तंत्रिका रज्जू (मज्जारज्जू ) गुच्छिकायुक्त ज्यांच्यापासून तंत्रिका तंतू (मज्जातंतू) निघतात असून प्रत्येक खंडात दोन गुच्छिका असतात. डोक्याच्या भागात मेंदू असतो. दोन जनन ग्रंथी त्यांच्या वाहिन्यांच्या साहाय्याने प्रत्येक खंडाच्या बाजूस पायावरील रंध्राकडे जातात. हा भिन्नलिंगी प्राणी आहे.

मिलिपीड शाकाहारी प्राणी आहेत. कुजलेल्या वनस्पती खाऊन हे जगतात. हे दमट जागेत पालापाचोळ्याखाली किंवा लाकडाच्या भेगा फटींत लपून राहतात. कधीकधी उन्हाळ्यात ते जमिनीत पुरून घेतात. मादी जमिनीत २५ ते ५० अंड्यांचा झुबका घालते. या सर्व अंड्यावर माती असते. अंड्यांतून पिले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यांचे रक्षण करते. अंड्यातून बाहेर पडलेल्या डिंभास (अळीस) पायांच्या ३ जोड्या असतात व पायांमागे ४ खंड असून त्यांवर पाय नसतात. यानंतर हळूहळू जास्त खंड होतात व त्यांवर पायांच्या जोड्यांचा विकास होतो. अंडी घातल्यावर आणि पिले बाहेर आल्यावर प्रथम नर व नंतर मादी मरण पावतात. काही मिलिपिंडांच्या जातीत ही आयुमर्यादा २ ते ७ वर्षांपर्यंत असू शकते.

भारताच्या आढळणाऱ्या मिलिपिंडांच्या काही जाती पुढीलप्रमाणे असून त्यांना वाणी, पैसा, खरपुडी इ. स्थानिक नावे आहेत. आर्थोस्फीरा हेटेरोस्टिक्टा, आ. मॅग्ना, झेफ्रोनिया नायग्रिनोटा, झे. अल्टीकोला, कॉड्रोमॉर्फा सेव्हेरिनी, कॉ. मॅमीफेरा, स्ट्रेप्टोगोनोपस फिफ्सोनी व ट्रायगोनियुलस लुम्ब्रीसिनस. 

पहा : गोम मीरिॲपोडा. 

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol VI, New Delhi, 1962.

इनामदार, ना. भा. चाफेकर, मृणालिनी