शॅली, अँड्र्यू व्हिक्टॉर : ( ३० नोव्हेंबर, १९२६ –       ). पोलंडमध्ये जन्मलेले अमेरिकन अंतःस्रावशास्त्रज्ञ. अधोथॅलॅमसमध्ये (मस्तिष्क विवराच्या तळाशी असलेल्या करड्या रंगाच्या विशिष्ट पुंजामध्ये →तंत्रिका तंत्र) निर्माण होणाऱ्या ( हॉर्मोनांचे अलगीकरण, अभिज्ञान, संश्लेषण आणि निदानीय उपयोग तसेच हॉर्मोन निर्माण करणाऱ्या इतर ग्रंथींच्या कार्यावरील अधोथॅलॅमसामधील या हॉर्मोनांचे नियंत्रण यासंबंधी त्यांनी संशोधन केले. या कार्याबद्दल त्यांना १९७७ सालचे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक रॉझे गेयमॅं आणि ⇨रोझॅलीन सुसमान यॅलो   यांच्याबरोबर विभागून देण्यात आले.

शॅली यांचा जन्म विल्नो (व्हिल्निअस) येथे झाला. १९३९ मध्ये त्यांचे कुटुंब पोलंडमधून ब्रिटनला पळून गेले. मॅक्‌गिल विद्यापीठातून ते बी.एस्‌सी. आणि पीएच्‌.डी. झाले. पुढे ते ह्यूस्टन येथे साहाय्यक प्राध्यापक झाले. १९६२ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च (लंडन), ॲलन मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ सायकीॲट्री (माँट्रिऑल), बेलर विद्यापीठाचे वैद्यक महाविद्यालय (ह्यूस्टन) आणि अधोथॅलॅमसविषयक संशोधन प्रयोगशाळेखेरीज एंडोक्राइन अँड पॉलिपेप्टाइड लॅबोरेटरी, तुलेन विद्यापीठाचे वैद्यक महाविद्यालय आदी विविध संस्थांमध्ये त्यांनी काम केले.

शॅली आणि एम. सफ्रान यांनी १९५५ मध्ये अधोथॅलॅमसमधील द्रव्य प्रयोगाद्वारे प्रथमच निदर्शनास आणले. त्यांनी कॉर्टिकोट्रोपीन-रिलिझिंग फॅक्टरचा (RF) शोध जाहीर केला. पोर्सिन (डुकरातील) अधोथॅलॅमसातील पदार्थापासून थायराट्रोपीन-रिलिझिंग हॉर्मोन (TRH) अलग करण्यात १९६६ मध्ये त्यांना यश आले. १९६९ मध्ये त्यांनी या हॉर्मोनामधील तीन ॲमिनो अम्लांचा अचूक क्रम व त्याची संरचना निश्चित केली. 

थायरोट्रोपीन – रिलिझिंग हॉर्मोन (TRH) ⇨पोष ग्रंथीला थायरॉइड – स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (TSH) निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असते. TSH हॉर्मोन  ⇨ अवटू ग्रंथील इतर हॉर्मोने निर्माण करण्यास उद्युक्त करत असते आणि ही नंतरची हॉर्मोने शरीरात सर्व ठिकाणी चयापचयाच्या (शरीरात सतत चालणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींच्या) त्वरेवर गाढ परिणाम करतात. TRH या हॉर्मोनाचा साध्या संयुगात बदल होऊन ते निदानीय मूल्यमापनासाठी वापरता येते. या संयुगाचा वापर पोष ग्रंथीच्या हॉर्मोन स्रावामधील कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या अनेक अनिष्ट अवस्थांवरील उपचाराकरिता करतात.

मानवातील ल्युटिनायझिंग हॉर्मोन (LH) आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (FSH) हे मोकळे होण्यास पोर्सिन ल्युटिनायझिंग हॉर्मोन – रिलिझिंग हॉर्मोन (LH-RH) उत्तेजन देते, असे शॅली व त्यांच्या सहकाऱ्य़ांनी सिद्ध केले. १९७१ मध्ये त्यांनी LH-RHची संरचना स्पष्ट केली व ॲमिनो अम्ल संघटन निश्चित केले. तसेच ते कृत्रिम रीत्या तयार केले. शॅली यांच्या सहकाऱ्यांनी LH-RH या हॉर्मोनाचे निदानीय उपयोग स्पष्ट केले. पुरुष आणि स्त्रिया यांच्यामधील नपुंसकत्वाच्या/ वंध्यत्वाच्या काही प्रकारांवरील उपचारांकरिता या हॉर्मोनांचा वापर यशस्वी झालेला आहे.

इ.स. १९७७मध्ये शॅली यांनी मेक्सिकोमधील गॉनथालेथवार्सिना यांच्या सहकार्याने संशोधन केले. LH-RH हॉर्मोनाचे संदमन करणारे पदार्थ मानवातील LH आणि FSH यांच्या मोचनास प्रतिबंध करतात, असे त्यातून सिद्ध झाले. हे संदमक पदार्थ नवीन संततिनियमन पद्धतीचे मूलाधार ठरू शकतात. 

इ.स. १९७२ – ७८ या कालावधीत शॅली यांनी प्रोलॅक्टिन रिलिझ–इनहिबिटिंग फॅक्टरचा (PIF) शोध लावला. १९७३मध्ये गेयमँ यांनी ओव्हाइन सोमॅटोस्टॅटीन हॉर्मोनाचा शोध लावला. १९७५मध्ये शॅली यांनी पोर्सिन सोमॅटोस्टॅटीन अलग करून, त्याची संरचना ओव्हाइन सोमॅटोस्टॅटिनासारखीच असल्याचे दाखविले.

शॅली यांनी इंग्लंडमध्ये आर. हॉल, जी. एम. बेसर आणि एस. आर. ब्लूम यांच्याबरोबर विविध निदानीय अध्ययनांमध्ये भाग घेतला आणि त्यातूनच ग्रोथ (वृद्धी) हॉर्मोन (GH), थायरॉइड – स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (TSH), ग्लुकागॉन, इन्शुलीन आणि गॅस्ट्रिन यांच्या मोचनास सोमॅटोस्टॅटीन प्रतिबंध करते हे सिद्ध झाले. त्यांनी विविध विषयांवर लेखन केले तसेच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले.

सूर्यवंशी, वि. ल.