उरःशूल: हृद्स्नायूंना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे छातीत तीव्र वेदना ज्या अवस्थेत होतात, तिला उरःशूल किंवा हृदयशूल (हृच्छूल) असे म्हणतात. हृदयरोहिणी (हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी वाहिनी) अथवा तिच्या शाखांमध्ये विकृती उत्पन्न झाल्यास हृद्स्ना‌यूंना रक्तामार्फत मिळणारा ऑक्सिजन कमी पडल्यामुळे उरःशूल होतो.

प्राकृत (स्वाभाविक) स्थितीमध्ये शारीरिक श्रम अथवा मानसिक क्षोभाच्या वेळी हृद्स्नायूंना अधिक रक्तपुरवठा होण्याची जरूरी असते. अशा वेळी हृद्‌राेहिणी प्रसारित होते व त्यामुळे हृद्‌यस्नायूंना अधिक रक्तपुरवठा होऊ शकतो परंतु हृद्‌रोहिणी विकारामुळे त्या रोहिणीचे योग्य असे प्रसरण न झाल्यामुळे जरूर तेवढा रक्तपुरवठा हृद्‌स्नायूंना होत नाही, म्हणून उरःशूल उद्भवतो.

उतार वयात हृद्‌रोहिणीच्या भित्ती जाड झाल्यामुळे तिची प्रसरणक्षमता कमी होते. तसेच हृद्‌रोहिणीच्या उगमस्थानी म्हणजे महारोहिणीच्या (हृदयापासून निघणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीच्या) भित्तीमध्ये विकृती झाल्यामुळे हृद्‌रोहिणीचे तोंड आकसून जाते त्याचा परिणाम म्हणूनही हृद्‌रोहिणीत पुरेसे रक्त जाऊ शकत नाही. उपदंश, अवटू ग्रंथीचे [घशापाशी असणाऱ्या अंतःस्रावी ग्रंथीचे, → अवटु ग्रंथि] विकार, मधुमेह, रोहिणी भित्तिस्तराचा अपकर्ष (ऱ्हास) वगैरे विकारांत हृद्‌रोहिणीची प्रसरणक्षमता कमी झाल्यामुळेही उरःशूल संभवतो.

हृद्‌रोहिणी व तिच्या शाखांच्या भित्ती जाड होत गेल्या म्हणजे काही काळानंतर तिच्यातून जाणारा रक्तप्रवाह पूर्णपणे बंद पडतो. त्यामुळे त्या शाखेमार्फत रक्तपुरवठा होत असलेल्या हृद्‌स्नायूंचा अभिकोथ (रक्तप्रवाह बंद पडल्याने मृत्यू) होतो. त्या अवस्थेतही अतितीव्र उरःशूल होतो [→ हृद्‌रोहिणी विकार].

लक्षणे: साधारणपणे वयाच्या पन्नासाव्या वर्षांनंतर हा विकार होतो. छातीच्या मध्यभागी उरोस्थीच्या (छातीच्या पुढल्या हाडाच्या) खाली एकाएकी तीव्र वेदना होतात. तेथून त्या वेदना सर्व छातीभर पसरतात. तीव्र प्रकारात त्या वेदना डाव्या (क्वचित उजव्या) दंडाच्या आतल्या बाजूकडून खाली करंगळीपर्यंत जाणवतात. वरच्या बाजूस मानेकडे, खालच्या जबड्याकडे किंवा क्वचित पाठीकडेही गेल्यासारख्या वाटतात. पोटाच्या शिंपेमध्ये (शिंपल्यासारख्या बंदिस्त भागामध्ये) किंवा उरोस्थीच्या वरच्या कडेपाशीही त्या वेदना जाणवतात. छातीवर दडपण आल्यासारखे, आवळल्यासारखे किंवा आग झाल्यासारखे वाटते. श्वासोच्छ्वा‌स वा छातीच्या आणि दंडाच्या हालचालींमुळे वेदनांवर परिणाम होत नाही. काही वेळा ढेकर आल्यानंतर वेदना कमी पडतात.

उरःशूलाच्या वेदना अशा विविध ठिकाणी जाणवतात त्याचे कारण असे सांगण्यात येते की, उरःशूल ही एक प्रतिक्षेपी क्रिया (शरीराच्या एका भागामध्ये उत्पन्न झालेल्या आवेगामुळे इतरत्र झालेली प्रतिक्रिया) आहे. त्यामुळे एरव्ही वेदनारहित असलेल्या अशा दुसऱ्या काही विकारांमुळे उरःशूल विविध ठिकाणी जाणवतो. उदा., पचनज व्रण (जठरात वा लहान आतड्यात होणारा व्रण, अल्सर) व जठरशोथ (जठराची दाहयुक्त सूज) असल्यास उरःशूल पोटाच्या शिंपेकडे आणि पृष्ठवंश संधिविकारात (पाठीच्या कण्याच्या संधींच्या विकारात) पाठीकडे जाणवतो.

रोग्याचा चेहरा घाबरल्यासारखा दिसून त्याला एकदम घाम सुटतो. त्याला मृत्यू जवळ आल्याची भावना होते. नाडी जलद चालते रक्तदाब वाढतो. काही वेळा उरःशूल रात्री वा आडवे झाल्यानंतर होतो. स्वस्थ बसल्याबरोबर वेदना कमी पडतात वा थांबतात. मात्र हृद्‌स्नायूच्या अभिकोथामुळे होणारा उरःशूल असा थांबत नाही.

निदान : अशा तऱ्हेच्याच परंतु इतक्या तीव्र नसलेल्या वेदना तरुण व घाबरट व्यक्तींमध्ये होतात त्या प्रकाराला मिथ्या हृद्‌शूल असे नाव असून त्याचा शारीरिक श्रम अथवा मानसिक क्षोभ यांच्याशी काही संबंध नसतो.

ग्रसिकेचा (घशापासून जठरापर्यंत जाणाऱ्या अन्ननलिकेच्या भागाचा) संकोच आणि मध्यपटलाच्या (जठर ज्या पोकळीत असते ती व छातीची पोकळी वेगळे करणार्‍या स्नायूच्या पटलाच्या) डाव्या बाजूच्या वर्ध्मामुळे [पोकळीतील इंद्रिय अथवा त्याचा काही भाग पोकळीच्या भित्तीच्या बाहेर पडण्यामुळे, → अंतर्गळ] उरःशूला सारखीच लक्षणे होतात. क्ष-किरण परीक्षेने त्यांचे निदान निश्चित करता येते. विद्युत हृद्‌लेखाचीही (हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे उत्पन्न होणाऱ्या विद्युत् प्रवाहाच्या आलेखरूप नोंदीचीही) निदानाला मदत होते. शारीरिक श्रम कमी केल्याबरोबर उरःशूल थांबतो ही गोष्ट पूर्ववृत्तावरून निश्चित करता येते. तसेच नायट्राइटा सारखी औषधे दिली असता उरःशूल त्वरित थांबतो या गोष्टीचीही निदानाला मदत होते.

चिकित्सा: उरःशूलावर ताबडतोबीचा उपाय म्हणजे नायट्राइटे या औषधांचा उपयोग करणे. या औषधांचे अनेक प्रकार आहेत. जिभेखाली ठेवण्याच्या प्रकाराने अथवा हुंगण्याच्या प्रकाराने उरःशूल त्वरित थांबतो. पोटात घेण्याच्या गोळ्यांचा परिणाम उशिरा सुरू होत असला तरी अधिक काळ टिकतो.

हृद्‌रोहिणी विकार नाहीसा करण्याचे साधन अजून उपलब्ध झालेले नाही. दिवसातून पुष्कळ वेळ विश्रांती घेणे, शामक (क्षोभ कमी करणारी) औषधे नियमितपणे घेणे, तंबाखू वर्ज्य करणे वगैरे गोष्टींचा परिणाम चांगला होतो.

हृद्‌रोहिणीला तंत्रिका (मज्जातंतू) पुरवठा करणाऱ्या अनुकंपी तंत्रिकांचा [→ तंत्रिका तंत्र] छेद करण्याची एक शस्त्रक्रिया अलीकडे करतात. तीमुळे उरःशूल कमी होतो तसेच हृद्‌स्नायूंना दुसऱ्या एखाद्या रोहिणीमार्फत रक्तपुरवठा करण्यासाठी शस्त्रक्रिया करतात.

ढमढेरे, वा. रा. कापडी, रा. सी.

आयुर्वेदीय चिकित्सा : हृदयात वातविकृती होऊन शूल उत्पन्न होतो. हा हृदयदेशात उत्पन्न होऊन डाव्या बाजूकडे जात असतो व जीव घुसमटतो. नारायण तेल दशमुळाच्या काढ्यात घालून त्याचा बस्ती द्यावा. हेमगर्भ, चिंतामणिरस किंवा राजवल्लभ मधात व आल्याच्या रसात सारखा चाटवावा. नारायण तेलाचा अभ्यंगही करावा. महाळुंगाचा रस कोमट पाण्यात गरम करून त्याचा एक चमचा व राजवल्लभाचे चाटण क्रमाने चालू द्यावे. रस न मिळाल्यास पिकलेले कवठ, मुसुंब्याचा रस, आमसुलाचे किंवा पाड आलेल्या आंब्याचे पन्हे ही कोमट करून यांचा एक चमचा रस व वरील औषध चाटवावे. थोड्याच वेळात शूल कमी होतो. शूल पुन्हा सुरू होऊ नये याकरिता राजवल्लभ किंवा चिंतामणिरस (हीरकयुक्त) वा मृगशृंगभस्म दुपारी जेवण झाल्याबरोबर वरील अनुपानातून सेवन करीत जावे. वातज हृद्राेगामधील सर्व आहारविहार द्यावा.

जोशी, वेणीमाधवशास्त्री