जोव्हान्नी पॅलेस्ट्रीना: सोळाव्या शतकातील एका प्रतिमाचित्रावरून.पॅलेस्ट्रीना, जोव्हान्नी : (सु. १५२५ –२ फेब्रुवारी १५९४). प्रसिद्ध इटालियन संगीतरचनाकार. पूर्ण नाव जोव्हान्नी प्येरल्वीजी दा पॅलेस्ट्रीना. पॅलेस्ट्रीना हे त्याचे जन्मगाव. त्याचा त्याने स्वतःच्या नावात अंतर्भाव केला. तो वयाच्या अठराव्या वर्षी स्वतःच्या गावातील चर्चमध्ये ऑर्गनवादक व पुढे गायकसमूहाचा शिक्षक झाला. नंतर १५५४मध्ये त्याने पोपला अनेक ‘मास’ संगीतरचना अर्पण केल्या. सेंट फिलिप नेरी या ⇨ऑरेटोरिओच्या प्रारंभकाचा संगीतनिर्देशक म्हणूनही त्याने काम केले. साथसंगतीशिवाय सादर होणाऱ्या समूहगायनाच्या ‘कॉन्ट्रॅपुन्ट’ पद्धतीने रचना करणारा संगीतकार म्हणून तो प्रसिद्ध होता. पॅलेस्ट्रीनाच्या नावे पाश्चिमात्य संगीतात एक संगीतशैली ओळखली जाते. सतराव्या शतकाच्या प्रारंभी या शैलीचा निर्देश अभिजात म्हणून होऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी तिचे पुनरुज्जीवन झाले. आज काउंटरपॉइंटच्या तत्त्वाच्या अभ्यासात पॅलेस्ट्रीना शैलीचा अभ्यास महत्वाचा मानला जातो. रोम येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ: 1. Coates, Henry, Palestrina, New York, 1949.

2. Roche, Jerome, Palestrina, 1971.

रानडे, अशोक