दब्यूसी, आशील–क्लोद : (२२ ऑगस्ट १८६२–२५ मार्च १९१८). प्रख्यात फ्रेंच संगीतरचनाकार. पियानो हे त्याचे आवडते वाद्य. त्याचा जन्म पॅरिसनजीक सें झेर्मे अँ ले येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्याला शालेय शिक्षण फारसे लाभले नाही. तथापि वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्याने पियानोवादनातील आपले प्रावीण्य प्रकट केले. १८७३ मध्ये त्याने ‘पॅरिस काँझर्व्हेटरी’ मध्ये प्रवेश घेतला व तिथे पियानोवादनाचा व संगीतरचनांचा अभ्यास केला. १८८० च्या सुमारास नद्येझ्‌द फॉन मेक या संगीतप्रेमी सधन स्त्रीचा त्याला आश्रय लाभला. १८८४ मध्ये L’enfant Prodigne (इं. शी. द प्रॉडिगल चाइल्ड) या ‘कँताता’ रचनेबद्दल त्याला ‘ग्रां प्री दी रोम’ हे पारितोषिक मिळाले. शोपँ, व्हागनर, चायकॉव्हस्की यांच्या संगीतरचना, मालार्मेप्रभृतींच्या प्रतीकवादी कविता आणि मॉनेप्रणीत दृक्‌प्रत्ययवादी चित्रकला यांसारख्या विविध संस्कारांनी त्याचे संगीत समृद्ध झाले. त्याच्या संगीतरचना अठराव्या–एकोणिसाव्या शतकांतील सांगीतिक परंपरांपासून प्रकर्षाने वेगळ्या उठून दिसतात. La Mer (१९०५) ही वाद्यवृंदरचना, Suite bergamasque (१८९०–१९०५), इमेजीस (१९०५–०७) व प्रेल्यूड्‌स (१९१०–१३) या पियानोरचना आणि Pelleas et Melisande (१९०२) ही संगीतिका या त्याच्या काही प्रख्यात संगीतकृती होत. ‘चेंबर’ संगीतप्रकारातही त्याने काही रचना केल्या. बॉस्कोक, स्ट्राव्हिन्स्की यांसारख्या उत्तरकालीन संगीतकारांवर त्याचा प्रभाव दिसून येतो. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Lockspeiser, Edward, Debussy : His Life and Mind, 2. Vols., New York, 1962, 1965.

 मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)