खाँसाहेबबडे गुलामअलीखाँ : (१९०१-२३ एप्रिल १९६८). अखिल भारतीय कीर्तीचे प्रख्यात गायक. जन्म लाहोर येथे. त्यांचे घराणे गायक-वादकांचे असून ते मूळ कसून (जि.लाहोर) गावचे राहणारे. ⇨पतियाळा घराण्याच्या आकर्षक व विविध अंगानी परिपूर्ण अशा गायकीच्या परिचय भारतात सर्वत्र करून देण्यात बडे गुलामअलीखाँचा वाटा फार मोठा आहे. त्यांचे वडील अलीवक्ष व चुलते कालेखाँ हे दोघेही पतियाळा घराण्याचे प्रसिध्द गायक फतेअली यांचे शिष्य. खाँसाहेब अलीबक्ष गात दिलरूबा उत्तम तऱ्हेने वाजवीत. बडे गुलामअलीखाँ व त्यांचे कनिष्ठ बंधू बरकत अलीखाँ हे दोघे वडिलांजवळच संगीताचे पहिले पाठ शिकले. गुलामअलीखाँ यांचा आवाज फार गोड व ग्रहणशक्ती फार तीव्र असल्यामुळे ते वयाच्या विसाव्या वर्षापासूनच उत्तम तऱ्हेने गाऊ लागले. पण स्वतंत्र मैफली करून, गायक म्हणून १९२७ नंतरच त्यांना किर्ती मिळू लागली. पंजाबमधील तसेच कलकत्ता येथील संगीत परिषदांत १९४०-४२ पर्यंत त्यांनी चांगलेच नाव कमाविले. १९४४ साली भरलेल्या ‘विक्रम संगीत परिषदे’त त्यांनी आपल्या कलेने मुंबईकरांना थक्क करून सोडले. देशाच्या फाळणीनंतर ते मुंबईत येऊन राहिले. ख्याल, ठुमऱ्यायात, भजने इ. प्रकार सारख्याच समर्थपणाने व गोडव्याने गाणारे सर्वढंगी व अद्वितीय गायक म्हणून त्यांची कीर्ती सर्व देशभर पसरली. विशेषतः पंजाबी ढंगाचे ⇨ठुमरी गायक म्हणून त्यांचा खास लौकीक होता ‘सवरंग’ या टोपणनावाने त्यांनी अनेक ख्याल व ठुमऱ्या रचल्या. आवाजाचा लगाव, सुरेलपणा व भरदारपणा, गायकीतील सौंदर्य व लोच, तरल कल्पकता, नावीन्य, विविधता आणि भावना-प्राधान्य ही त्यांच्या गायनाची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये होती. १९५७ साली त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले. संगीत नाटक अकादमीने त्यांनी पारितोषिक बहाल केले व भारत सरकारने त्यांनी ‘पद्मभषण’ हा किताब देऊन गौरविले. १९६१ साली अर्धांगवायूने ते आजारी पडले आणि पुढे सात वर्षानी हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : देवधर, बी.आर, थोर संगीतकार, मुंबई, १९७३.

देवधर, बा. र.