कुमार गंधर्व : (८ एप्रिल १९२५). एक सर्जनशील संगीतकार व समर्थ गायक, सुळेभावी, जि. बेळगाव येथे जन्म. मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकाळी. ‘कुमार गंधर्व’ ही पदवी गुरुकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी दिली. वडीलही गायक. जन्मापासून रुजत असलेल्या संस्कारांमुळे वयाच्या सहाव्या वर्षी एकदम गाऊच लागले. १९३६ सालच्या

कुमार गंधर्व

अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. १९३६ पासून अकरा वर्षे मुंबई येथे बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण. १९४७ साली विवाह.नंतर क्षयाचा आजार आणि तेव्हापासून मध्य प्रदेशात देवासला वास्तव्य. 

कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास  हा नव्या–जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांच्या सर्जनतेची साक्ष देतात. त्यांचे प्रयोगशील मन सतत काहीतरी नवीन करण्याच्या उद्योगात असते.

देशपांडे, वामनराव