बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर : (७ सप्टेंबर १८४९ – ८ फेब्रुवारी १९२७). हिंदुस्थानी संगीतपरंपरेतील एक थोर, प्रतिभावंत गायक, मिरजजवळील बेगड ह्या गावी जन्म. घराणे भिक्षुकांचे. त्यांचे वडील रामभट,यांनी भिक्षुकी सोडून साताऱ्याचे बाळाजीबुवा यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले. आपल्या मुलानेही गाणे शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती. वयाच्या पाचव्या वर्षी बाळकृष्णाला त्याची मातोश्री निधन पावल्याने, इचलकरंजी येथील त्याचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले. बाळकृष्णाला भिक्षुकीची गोडी नसल्यामुळे गायन शिकण्यासाठी तो वयाच्या दहाव्या वर्षी घर सोडून बाहेर पडला. पुढे वडीलही वारले. फिरत फिरत तो धार येथे देवजीबुवांकडे गाणे शिकण्यास राहिला. तीन वर्षे त्यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर गुरुपत्नीच्या त्रासामुळे बाळकृष्ण धार सोडून गाणे शिकण्यासाठी ग्वाल्हेरला गेला. तेथील हस्सूखाँचे शिष्य वासुदेवराव जोशी यांच्याकडे तो गायन शिकण्यास गेला. प्रथम वासुदेवबुवांनी गाणे शिकवण्यास नकार दिला. पण पुढे एक वर्षाने बनारस येथे त्यांनी बाळकृष्णबुवांना शिकविण्याचे कबूल करून, पुढे सहा वर्षे चांगले शिक्षण दिले.

बाळकृष्णबुवा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आले. काही दिवस मुंबईस राहून ते सातारा-औंधकडे वळले. त्यांना दम्याचा विकार जडला. मिरज संस्थानचे अधिपति बाळासाहेब पटवर्धन यांनी औषध देऊन त्यांचा दमा पूर्णपणे बरा केला व दरबार-गवई म्हणून त्यांना मिरजेस नोकरीही दिली. तदनंतर दहा – बारा वर्षांनी ते श्रीमंत बाबासाहेब घोपरडे, इचलकरंजीकर यांच्याकडे जवळजवळ ३० वर्षे दरबार-गवई म्हणून राहिले. पं. बाळकृष्णबुवा अत्यंत भरतीदार व यशस्वी गायक होते. त्यांची गायकी साधी, निर्मळ, भारदस्त व सौंदर्यपूर्ण होती. खास ग्वाल्हेर गायकीचा प्रचार महाराष्ट्रात बाळकृष्णबुवांनीच केला. मिरज आणि इचलकरंजी येथे त्यांचेकडे पुष्कळ लोक शिकू लागले. बाळकृष्णबुवांच्या आधीही महाराष्ट्रात ख्याल गायकी रूढ होतीच पण तिच्या विस्तृत प्रमाणावरील प्रसाराचे श्रेय बाळकृष्णबुवांनाच दिले जाते. त्यांच्या दोन शिष्य-शाखा सर्वश्रुत आहेत. पहिल्या शाखेत पं. विष्णू दिगंबर पलुस्कर व त्यांच्या गांधर्व महाविद्यालयातून शिकून तयार झालेले विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव व शंकरराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर, वामनराव पाध्ये, प्रा. बा. र. देवधर इ. नामवंत गवयांचा समावेश होतो तर दुसऱ्या शाखेत मिराशीबुवा, अनंत मनोहर जोशी, त्यांचे चिरंजीव गजाननराव, तसेच शिष्य बापूराव गोखले व त्यांचे शिष्य राजारामबुवा पराडकर इ. प्रसिद्ध गवयांचा अंतर्भाव होतो. १९२५ मध्ये त्यांचे चिरंजीव तरुण, सिद्धहस्त गायक अण्णाबुवा मृत्यू पावले, या घटनेचा त्यांच्यावर जबरदस्त आघात होऊन पं. बाळकृष्णबुवा हे इचलकरंजी येथे मृत्यू पावले. संगीतातील ‘भीष्माचार्य’, ‘गायनाचार्य’ ह्या पदव्या रसिकांनी त्यांना स्वेच्छेने बहाल केल्या होत्या.

देवधर, बा. र.