सनई : तोंडाने फुंकून वाजविण्याचे भारतातील एक सुषिर वाद्य. वाद्यगटातील सनईला सुर्ना, नाई, शहनाई इ. अनेक पर्यायी नावे असून, सनईसदृश वादयेही भारतात अनेक ठिकाणी प्रचलित आहेत. उत्तर भारतात ‘ शहनाई ’ म्हणून हे वाद्य ओळखले जाते. दाक्षिणात्य संगीतातील ‘ नादस्वरम् ’ हे वाद्य सनईसारखेच असते. सनई भारतात मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांतून विशेषत: इराणमधून आली, असे एक मत आहे. इराणी ‘ सुर्ना ’ हे वाद्य भारतात येऊन त्याचे रूपांतर सनईत झाले, असेही म्हणतात. कालांतराने शहनाई व सनई ही दोन्ही नावे महाराष्ट्रात प्रचलित झाली. पूर्वीच्या काळात ‘ सुरू-नाई ’ नावाचे सनईसदृश मंगोलियन वाद्य प्रचारात होते. संगीतसार गंथात ‘ सुनारी ’ नामक वाद्याचे जे वर्णन आहे, ते सध्याच्या सुंदरी वाद्याचे असावे. सुंदरी म्हणजे लहान सनई म्हणता येईल. ‘ नाई ’ हे तोंडात जिभली असलेले प्राचीन काळातील इराणी वाद्य होते. त्याला सहा रंधे असत. इराणचा शहा एका नाईवादकाच्या कौशल्याने संतुष्ट झाला, त्यावेळेपासून या वाद्याला शहा-नाई > शहानाई > शहनाई > सनई असे नाव रूढ झाले. तर काहींच्या मते सुनादीचे सुनाई > सनाई, सनई असे नाव रूढ झाले. संगीत पारिजातक या ग्रंथात यास सुनादी म्हटले आहे; तथापि सनई या वाद्याचे पूर्वरूप मध्ययुगीन भारतातील ‘ मधुकरी ’ या संस्कृत नावाच्या वाद्यात आढळन येते. ‘ महुरी ’ हा याचाच अपभंश असावा. महुरी हे लोकवाद्य शेतकरी, गवळी इ. लोकांमध्ये प्रचलित आहे.

सनई : आधुनिक प्रकार.

सनईचे जिभाळ, पावी, नळी आणि अन्नस असे चार मुख्य भाग आढळतात. सनई वाद्याची नळी सु. ६० ते ९० सेंमी. लांबीची खैर, शिसवी वा चंदनाच्या लाकडाची गोलाकार व आतून पोकळ असते. हे वादयाचे प्रधान अंग असून, तिचा उपयोग नाद घुमविण्यासाठी होतो. ती सरळ लांबीची असून एका टोकाला बारीक व दुसऱ्या टोकाकडे जरा रूंदावत जाते. बारीक टोकाकडून ती फुंकरली जाते. नळीच्या रूंद टोकाला आवाज फेकण्यासाठी घंटाकार कर्णा असतो. त्याला पावी किंवा पाई म्हणतात. ती बहुधा धातूची बनविलेली असते. दुसऱ्या वाजविण्याच्या टोकाला, देवनळाच्या लाकडाच्या कांडीत घट्ट बसविलेली पण काढती- घालती अशी ताडाच्या पानांची द्विदल दोन थडथडण्याऱ्या पत्तींची जिव्हाळी (जिभाळ) असते. उत्तर भारतात ती देवनळ किंवा नरकट नावाच्या झाडाच्या नळ्यांपासून बनवितात. जिव्हाळी बसविण्यासाठी मुखरंधावर एक हस्तिदंती वा शिंपेची, भोकाची चकती बसविलेली असते. या टोपणवजा चकतीला शेंबी म्हणतात. त्याच्या खाली नळीवर आठ वादनरंधे व चार नियमनरंधे असतात. ह्याच्या वादनातील वैशिष्टय म्हणजे यावर बासरी वगैरे इतर वादयांप्रमाणे दोन्ही हातांच्या बोटांनी रंधांची उघडझाप करून जसे स्वर काढता येतात, तसेच एकाच रंधस्थानावर कमीजास्त फुंकीनेही भिन्न स्वर काढता येतात. सनईच्या नळीची वरची सात रंधे वाजविण्यासाठी वापरतात. बाकीची मोकळी ठेवतात वा मेणाने बंद करतात. सनईच्या शेवटच्या छिद्रापासून थोडया अंतरावर खोबणीत एक कर्णाच्या आकारासारखे धातूचे भांडे बसवितात, त्याला अन्नस म्हणतात. ओठ व जीभ यांच्या सुयोग्य वापराने, तसेच बोटांच्या कौशल्यपूर्ण उपयोगाने या वादयातून स्वरविलासाच्या अनेक नादमधुर छटा निर्माण करता येतात. त्यामुळे सनईवादन अत्यंत श्रवणीय होते. नळीतील हवेचा दाबही नियंत्रित करावयाचा असल्याने खूप परिश्रमांनी साध्य होणारी ही अवघड वादनकला आहे. शास्त्रीय गायकीमधील श्रूती, स्वर, मूर्च्छना यांसारखे सर्व प्रकार सनईमधून निघू शकतात. सनई ही श्रूती किंवा सूर या दुसऱ्या वादयाच्या जोडीने वाजविली जाते. श्रूतिवाद्याला दोन वा तीन रंधे असतात. सनईवादन चालू असता, फुंक अखंड ठेवून त्याच्यातून आधारस्वर सतत गुंजत ठेवतात. सनईबरोबर तालासाठी दोन लहान नगारे, चौघडा वा खारदक हे वादय घेतात. ते दोन्ही हातांत घेतलेल्या छडयांनी वाजवितात.

सार्वजनिक समारंभ, मिरवणुका, विवाहादी शुभप्रसंगी वाजविले जाणारे सनई हे मंगलवाद्य असून, त्याचे स्वतंत्र वादनही प्रभावी होते. पूर्वी महाराष्ट्रात राजे-महाराजांचे प्रासाद व देवळांतून सनई-चौघडा वाजविण्याची प्रथा होती. त्याकरिता राजप्रासाद व मंदिरांसमोर नगारखाना ही वास्तू बांधलेली अनेक मोठया मंदिरांतून आढळते, तर उत्तर भारतात सनई हे दरबारी वाद्य होते. प्रभाती व सायंकाळी ते दरबारात वाजविले जाई. भारतरत्न उस्ताद ⇨ बिस्मिल्लखाँ हे भारतीय कीर्तीचे श्रेष्ठ सनईवादक होत. त्यांनी या जुन्या पारंपरिक लोकवाद्याला अभिजात संगीतवाद्याचा दर्जा व जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्याच घराण्यातील त्यांचे पिताजी खाँसाहेब पैगंबरबक्ष, मामा अलिबक्ष, बंधू शमसुद्दीनखाँ, चिरंजीव नझिमखाँ हेही उत्तम सनईवादक होते. अन्य सनईवादकांत बिलायेतू, गायकवाड, देवळणकर, जाधव, नंदलाल इत्यादींचा निर्देश करता येईल.

संदर्भ : १. खाडिलकर, वसंत माधव, श्री गंधर्व वेद : गायन-वादन-नर्तन, संगीत ज्ञानकोष, पुणे, १९८२.

२. तारळेकर, ग. ह. भारतीय वाद्यांचा इतिहास, पुणे, १९७३.

मुजुमदार, आबासाहेब