सारंगी : लोकप्रिय भारतीय तंतुवाद्य. ते गजाने वाजवितात. सु. २ फुट (०·६० मी.) लांबीचा लाकडाचा ठोकळा पोखरून हे वाद्य तयार करतात. त्याचे बूड (खालचा भाग) रुंद असून दांड्याकडे निमुळता आकार असतो. बुडाच्या लांबीनंतर मानेचा आकार तासलेला असतो व तोच पुढे रुंद दांडा होतो. बुडाला कटिमध्यही असतो, त्यामुळे गज फिरवण्यास वाव मिळतो. पोखरलेल्या बुडावर चामडे बसवितात. ह्या खालच्या भागाला मंथान व वरच्या भागाला छाती वा गळा असे नाव आहे. वरच्या दांड्याच्या टोकाला खुंट्यांसाठी चौकट-कोनाडा असतो. त्या पोकळ भागात प्रत्येक बाजूला दोन याप्रमाणे चार खुंट्या बसविलेल्या असतात. तातीच्या (तातूंच्या) व धातूच्या चार तारा तबकडीवरील पातळ घोडीवरून व नंतर मेरूवरून कोनाड्यातील खुंट्यांना गुंडाळतात. बैठकीच्या संगीतातील सारंगीला एक पितळेची व तीन तातीच्या तारा असतात. सारंगीत अनुध्वनीसाठी साधारण १५–२० तारा मुख्य तारांच्या खाली योजिलेल्या असतात. बाजूला बसविलेल्या लहान खुंट्यांना या तारा बांधलेल्या असतात. तारा पितळी व पोलादी असून त्या रागाला अनुसरून स्वरसप्तकात लावतात.

सारंगीचा एक प्रकारसारंगी हे वाद्य मींडकामासाठी विशेष अनुकूल आहे. ते गायनाच्या साथीसाठी जसे योजिले जाते, तसेच त्याचे स्वतंत्र वादनही केले जाते. सारंगीचा वरचा भाग खांद्याशी ठेवून व खालचा भाग मांडीवर घेऊन उजव्या हातात धरलेल्या गजाने तार वाजवितात व डाव्या हाताच्या बोटांनी तार बाजूच्या तारेकडे दाबून स्वर निर्माण करतात. गजाला घोड्याचे केस लावलेले असतात. सारंगी हे पूर्णतः देशी वाद्य म्हणता येईल. हरिपाल याने संगीत-सुधाकर (सु.११७५) या ग्रंथात देशी किन्नरीही ‘सारंगवीणा’ या नावाने ओळखली जात असल्याचे नमूद केले आहे. शार्ङ्गदेवाने (सु. १२१०–४७) संगीतरत्नाकर या ग्रंथात सारंगीचा निर्देश केला आहे. नारायण (सोळाव्या शतकाची अखेर) याने संगीतनारायण या ग्रंथात दिलेले सारंगीचे वर्णन साधारणपणे सध्याच्या प्रचलित सारंगीप्रमाणेच आहे. फक्त वाजविताना ती धरण्याच्या बाबतीत वेगळेपणा आहे. सारंगी या वाद्याचा जनक हकीम बकरात गौ असल्याचे निर्देश आढळतात तथापि मियाँ कल्लूखाँ याने सारंगी निर्माण केली, असेही एक मत आहे. सारंगीच्या मध्ययुगीन उल्लेखांवरून मुळात हे एक लोकवाद्य असावे व नंतर त्यात योग्य त्या सुधारणा करून अभिजात संगीतातील वाद्यांत त्याचा समावेश करण्यात आला असावा, असे दिसते.

सारंगी व सारिंदा ही वाद्ये पडदे नसलेल्या वीणांचे नमुने होत. सारिंदा हे सारंगीसदृश वाद्य फक्त लोकसंगीतातच आढळते. उत्तर भारतातील पहाडी प्रदेशात ते प्रचलित आहे. सारंगीपेक्षा अरुंद खोका आणि विचित्र आकाराचा चर्मयुक्त कोठा असलेल्या या वाद्याला तीन ताती वा केस लावलेले असतात व ते गजाने वाजवितात.बिहारमधील आदिवासींमध्ये सारिंदासारखेच वाद्य प्रचलित आहे, त्याला बनाम म्हणतात.

सारंगीसारखीच पण आकार व रचना यांत काहीसा भेद असलेली इतर लोकवाद्ये म्हणजे भोपळ्याची अलाबु सारंगी (अलाबु म्हणजे भोपळा, याच्या आधाराने बनविलेले तंतुवाद्य), साझसाझिंदा, चारतार, दोतार (मारवाडी व हिंदुस्थानी), चिकारा व तीड-ताड संयोगी ही आहेत.

अत्यंत मधुर, मानवी आवाजाशी मिळतेजुळते आणि सर्व गायनक्रियेची अनुरूप साथ करणारे हे वाद्य पूर्वी नाटक, नृत्य व नायकिणींच्या नाचगाण्याच्या साथीसाठी वापरात असल्यामुळे कमी प्रतीचे मानले जाई पण आजमितीस अभिजात संगीताच्या साथीमुळे व स्वतंत्र वादनामुळे त्याला प्रतिष्ठा लाभली आहे. बुंदुखाँ, मजीदखाँ, कादरबक्ष, गुलाम साबीर, मिर्झा महमूद अली, राम नारायण इ. काही प्रसिद्घ सारंगीवादक होत.

पहा: लोकवाद्ये लोकसंगीत वाद्य व वाद्यवर्गीकरण वीणा.

मुजुमदार, आबासाहेब इनामदार, श्री. दे.