गीत : (साँग). अनेक संदर्भात अवतरणाऱ्या या संगीतप्रकारात गेयता हे सर्वसामान्य तत्त्व असते. पाश्चात्य संगीतपद्धतीत गीत प्रथमतः प्रार्थनामंदिराच्या आश्रयाने धार्मिक स्वरूपात अवतरले. सरंजामशाहीच्या काळात प्रार्थनामंदिरांच्या प्रभावातून बाहेर पडून ते भटक्या गायकांच्या द्वारे प्रसार पावले. या अवस्त लौकिक विषयांचाही समावेश त्याच्या आशयात होऊ लागला. सोळाव्या शतकानंतर शिष्टसंमत संगीतप्रकारांत त्याचा अधिकाधिक अंतर्भाव होऊ लागला. ते अधिक कौशल्यपूर्वक रचले जाऊ लागले व अधिक संस्कारितही होऊ लागले. रचना व गायन या बाबतींत गीताच्या अनेक शैली निर्माण होऊ लागल्या. केवळ गोड चालींपेक्षा शब्द व आशय यांना संवादी अशी स्वररचना करण्याकडे आता अधिक कल दिसून येतो.  लोकसंगीतात आढळणाऱ्या गीतांमध्ये अर्थात गेयता असतेच पण त्यांच्या बाबतीत दुसरीही लक्षणे महत्त्वाची ठरतात. पहा : लोकसंगीत सुगम शास्त्रीय संगीत.  रानडे, अशोक