आग्रा घराणे : अभिजात संगीतातील आग्रा घराणे मुळात ग्वाल्हेर घराण्यामधून निघालेले आहे. या घराण्याचे एक पूर्वज गग्गे खुदाबक्ष यांना ग्वाल्हेर घराण्यातील नथ्थन पीरबक्ष यांची चांगली तालीम मिळालेली होती. अशा प्रकारे या दोन घराण्यांमध्ये जरी जन्यजनकसंबंध असला, तरी त्यांमध्ये कालांतराने पुष्कळ भिन्नताही निर्माण झाली. जुन्या काळी आग्रा घराण्यातील गायकांना ⇨धृपद-घमार गायनाची पक्की तालीम प्रथम मिळालेली आहे. त्यामुळे या घराण्याला धृपद व ⇨ख्याल या गायनप्रकारांच्या सीमेवरील घराणे म्हणता येईल. चालू पिढीच्या दृष्टीने आग्रा घराण्यातील उत्तमोत्तम गुणांची एकत्रित आठवण फैयाझखाँमुळेच होते.

या घराण्यातील गायकांचा स्वर प्राय: ढाला (बऱ्याच कमी उंचीचा) असतो. पण धृपदाच्या चांगल्या तालमीमुळे आणि स्वरसाधनेमुळे तो कसदार आणि खर्जातही श्रवणीय असतो . प्रत्यक्ष चीज सूरू करण्यापूर्वी ‘नोम्‌तोम्’ करून रागाचे स्वरूप गायक पूर्णपणाने विशद करतो. नोमतोमीमध्ये चिजेची अक्षरे नसतात, तर स्वरांच्या केवळ आधारासाठी ‘रीदत तोम्, ता रन…’ इ अक्षरे घेतात. बीनाच्या जोडकामाप्रमाणे वाटणाऱ्या अशा गंभीर नोमतोमीत रागाची बढत दमदारपणे होते. त्यानंतर होरी घमारचे गायन सुरू होते, तेव्हा विविध लयबंधानी नटलेली बोलतान सुरू होते. या घराण्यात ताल-लयींचा पक्केपणा व विविधता हे एक खास वैशिष्ट्य आहे. यानंतरचे ख्याल गायन हेही रागदृष्ट्या अत्यंत शुद्ध असते. आग्रा घराण्यातील ख्यालामध्ये ललित्यापेक्षा गांभीर्य व जोरकसपणा यांचाच प्रयत्य अधिक येतो . स्वरसंगतींमधील वैधम्याचा आविष्कार, छोट्या-छोट्या बोलउपजा आणि ‘अचरक’ ताना ही आग्रा घराण्यात विशेषत्वाने दिसतात. चिजेमधील काही अक्षरबंधांवर रमून, उपजा घेऊन जोरदार हिशेबी तिहायांनी (म्हणजे तीनंदा तोंड म्हणून) समेवर येणे, ही या घराण्यातील एक लक्षणीय क्रीडा आहे. स्वर ढाला असल्याकारणाने आलापगेय असे मंद्रमध्यसप्तकांतील राग हे गायक उत्तम प्रकारे वठवितात. गग्गे खुद्दाबक्ष, नथ्थखाँ, बाबलीबाई, फैयाझखाँ, विलायत हुसेनखाँ, आता हुसेनखाँ, शराफत हुसेनखाँ, लताफत हुसेनखाँ, खादिक हुसेनखाँ, जगन्ननाथबुवा पुरोहित, रातंजनकर, रत्‍नकांत रामनाथकर, इ. मंडळी या घराण्यातील प्रसिद्ध गायक होत.

संदर्भ : १. देशपांडे आ. ह. घरंदाज गायकी, मुंबई १९६१.

           २. मारूलकर, ना.र. संगीतातील घराणी, पुणे, १९६२

मंगरूळूकर, अरविंद