चेलो: या वाद्याचे पूर्ण नाव ‘व्हायोलिनचेलो ’ होय. व्हायोलिनच्या वर्गातील हे तंतुवाद्य आहे. तंतुवाद्यवर्गातील व्हायोलिनमुळे सोप्रानो, व्हीयोलामुळे ऑक्टो, डबल बेसमुळे बेस आणि चेलोमुळे टेनर वर्गातील आवाज साधले जातात. व्हायोलिन आणि व्हीयोला हनुवटीखाली धरून वाजविली जातात तर चेलो हे वाद्य गुडघ्यांमध्ये धरून वाजविले जाते. वाद्यांचा इतिहास पाहता व्हायोल द गाम्बा हे वाद्य चेलोचे आद्यरूप असू शकेल.

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून या वाद्याच्या स्वरूपात कोणताही महत्त्वाचा बदल झाला नाही. आंतॉन्यो स्ट्राडीव्हारी (१६४४–१७३७) या प्रख्यात इटालियन वाद्यकाराने बनविलेल्या वाद्यांत चेलोच्या बनावटीचा आदर्श दिसतो. गेल्या दोन-तीनशे वर्षांत तारांची उच्चता वाढल्यामुळे त्यांचा ताण पेलण्यासाठी त्यांचा मजबूतपणा वाढविण्यात आला.

हायडन, ड्व्हॉर्झाक, बोक्केरीनी, चायकॉव्हस्की यांच्या चेलोसाठी लिहिलेल्या रचना प्रख्यात आहेत. आजच्या संगीतकारांत ब्लॉक, शस्तकॉव्ह्यिच, प्रकॉव्ह्येव्ह आणि ब्रिटन यांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. एमानूएल फॉयरमान, प्येर फूर्न्ये, पॉल तोर्तेलिए स्तिस्लाव्ह रोस्त्रोपोव्ह्यिच व पाब्लो कासाल्स हे प्रख्यात चेलोवादक होत.

मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)