आधुनिक क्लॅरिनेटक्लॅरिनेट : पाश्चात्त्य वाद्यवृंदातील सुषिर वाद्यांचा गट पुरा करणाऱ्या चार वाद्यांपैकी हे एक वाद्य होय. क्लॅरिनेट हे नाव clarinetto या मूळ इटालियन शब्दावरून आले आहे. फ्ल्यूट, ओबो व बसून ही इतर तीन वाद्ये होत. खुद्द क्लॅरिनेट वाद्यसमूहातही वेगवेगळ्या पल्ल्यानंतर (उदा., बेस, ॲल्टो इ.) अनेक क्लॅरिनेटांचा समावेश होतो.  सर्वसाधारणतः दंडगोलाच्या आकाराच्या नळीच्या तोंडाशी एकेरी जिव्हाळी लावलेल्या या वाद्याचे नियंत्रण ओठांनी करता येते.

न्यूरेंबर्ग येथील देनर (१६५५–१७०७) हा या वाद्याचा आद्य शोधक. या वाद्याला सतराव्या शतकाच्या शेवटी शेवटी प्रतिष्ठा प्राप्त झाली.विशेषेकरून सुप्रसिद्ध मॅनहाइम वाद्यवृंदातील वादकांमुळे या वाद्याच्या  सांगीतिक शक्यतांची मोट्सार्टला जाणीव झाली आणि त्याने काँचेर्टो व क्विंटेट पद्धतीच्या रचना या वाद्यासाठी लिहिल्या. त्यामुळे आणि वेबरच्या ‘काँचेर्टस्टुक’मुळे क्लॅरिनेट सुप्रतिष्ठित झाले. प्रसिद्ध जर्मन संगीतज्ञ वॅगनर (१८१३–१८८३) याने आपल्या संगीतिकांसाठी क्लॅरिनेटचा चांगला उपयोग करून घेतल्याने या वाद्यास वाद्यावृंदात कायमचे महत्त्वाचे असे स्थान प्राप्त झाले.

आजचे प्रख्यात क्लॅरिनेटवादक म्हणून बेनी गुडमन, रेजिनाल्ड केल, जॅक ब्रायमर, जेरवास द पेये इत्यादींचा निर्देश करता येईल.

मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)