हार्पसिकॉर्ड : पाश्चिमात्य संगीतात वाजविले जाणारे काहीसे जुने वाद्य. हे वाद्य दिसायला साधारण पियानोसारखेच दिसते.हार्मोनियम किंवा पियानोप्रमाणे दिसणाऱ्या स्वरपट्ट्यांवर आघात करून या वाद्यातून स्वरनिर्मिती केली जाते. खरेतर हार्पसिकॉर्ड हे एक वाद्यकुल असून त्यात व्हर्जिनल्स, म्युसेलर, स्पिनेट अशा अनेक तत्सम वाद्यांचा समावेश होतो.

हार्पसिकॉर्ड या प्रकारातील वाद्ये प्रबोधन व बरोक या काळात यूरोपमध्ये विशेषत्वाने वापरली जात असत. प्रबोधन कालखंड हा संगीत, नाट्य, साहित्य, शिल्पकला, वास्तुकला यांच्या प्रगतीचा काळ मानला जातो. या काळात या सर्व क्षेत्रांत अनेक नवीन प्रवाह रूढ झाले. साधारणपणे अठराव्या शतकाच्या अखेरीस या वाद्याचा वापर काही प्रमाणात पुन्हा सुरू झालेला दिसतो.

फ्लेमिश हार्पसिकॉर्ड

हार्पसिकॉर्ड या वाद्याचा शोध मध्य युगाच्या उत्तरार्धात लागला असावा. आंद्रे रकर्स (१५७९–१६४५ ?) या कारागिराने या वाद्याची प्रथम निर्मिती केली. पुढे पास्काल तास्कँ (१७२३–९३) या फ्रेंच कारागिराने त्यात अनेक तांत्रिक बदल केले. सर्वसाधारणपणे सोळाव्या शतकात इटलीमध्ये कमी वजनाच्या आणि खालच्या स्वरात वाजविल्या जाणाऱ्या वाद्यांची निर्मिती होत होती. पुढे या वाद्याचा आकार वाढत गेला आणि त्यात अनेक सुधारणाही होत गेल्या. स्वरांची सुस्पष्ट निर्मिती व्हावी आणि स्वरांचा आवाका (रेंज) अधिक मिळावा, यांसाठी त्यात अनेक तांत्रिक बदल होत गेले. सुरुवातीच्या वाद्यामध्ये दोन स्वरपट्ट्यांचा (की बोर्ड) वापरही करण्यात येत असे. अठराव्या शतकात इटलीपाठोपाठ इतर यूरोपीय देशांतही हार्पसिकॉर्ड या वाद्याची निर्मिती होऊ लागली. मात्र या शतकाच्या अखेरीस हार्पसिकॉर्ड या वाद्याची जागा पियानो या आधुनिक वाद्याने घेतली. त्यानंतर या वाद्याचा उपयोग ऑपेरामध्ये साथीचे वाद्य म्हणून मर्यादित स्वरूपात होऊ लागला.

हार्पसिकॉर्ड हे वाद्य वाजविताना वादक आपल्या बोटांनी स्वरपट्टीची कळ दाबतो. त्यामुळे तिला जोडलेल्या लाकडी पट्टीच्या साहाय्याने त्या स्वराच्या तारेवर आघात होतो आणि त्यातून स्वरनिर्मिती होते. या वाद्यकुलातील वाद्ये लहान-मोठ्या आकाराची असली, तरी त्यांची मूलभूत रचना आणि कार्यपद्धती सारखीच असते.

हार्पसिकॉर्ड या वाद्याचे सर्व भाग म्हणजे स्वरपट्टी, त्या पट्ट्यांना जोडणाऱ्या लाकडी पट्ट्या, ज्यांवर आघात होऊन स्वरनिर्मिती होते, त्या धातूच्या तारा एका लाकडी खोक्यात चपखलपणे बसविलेल्या असतात. काही वाद्यांना स्वरपट्टी झाकण्यासाठी लाकडी झाकणाची सोयही असते. विसाव्या शतकात काही यूरोपियन संगीतकारांनी पियानो-तंत्रज्ञान वापरून हार्पसिकॉर्ड वाद्यरचनेत काही बदल केले. त्यामध्ये त्यांनी अधिक जाड तारांचा आणि धातूच्या चौकटीचा वापर केला.

सुरुवातीच्या हार्पसिकॉर्ड वाद्यांच्या स्वरांचा आवाका मर्यादित होता. फक्त तीन किंवा चार सप्तकेच त्यात वाजविली जाऊ शकत होती पण; पुढे वाद्यरचनेत झालेल्या सुधारणांमुळे त्यावर पाच किंवा अधिक सप्तके वाजविण्याची सुविधा निर्माण झाली.

हार्पसिकॉर्ड संगीत रचनाकारांमध्ये विल्यम बर्ड (१५४० ?–१६२३), डोमेनिको स्कारलात्ती (१६८५–१७५७) आणि विख्यात जर्मन संगीतकार योहान झेबास्टिआन बाख (१६८५–१७५०) यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

कुलकर्णी, रागेश्री अजित