जयपूर घराणे : ख्पालगायनाचे एक मान्यवर घराणे. याची सुरुवात  उस्ताद ⇨ अल्लादियाखाँ (१८५५ — १९४६) यांच्यापासून झाली. जयपूर संस्थानातील उनियारा गावी त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांचे घराणे जयपूर ह्या नावानेच ओळखले जाते.

मूलतः धृपद-धमार गायकीची तालीम असलेल्या उस्ताद अल्लादियाखाँनी आपला आवाज काही कारणाने बिघडल्याने, त्यातूनही मांडता येईल अशी नवीन प्रभावी ख्यालगायकी निर्माण केली. या नव्या स्वरूपाची प्रेरणा त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे पूर्वसूरी बडे महम्मदखाँ यांचे अनौरस पुत्र मुबारक अली यांच्या गायनापासून मिळाली, असे ते स्वतःच सांगत असत.

या गायकीची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे नोंदविता येतील : अप्रचलित राग आणि प्रचलित ताल पण विलंबित लय यांचा नियमित वापर. तानक्रिया गुंतागुंतीची व प्रभावी बांधणीची. या घराण्याच्या एकंदर गायनात अधिसुदपणा असून त्यातून विलक्षण बौद्धिक प्रभाव दिसून येतो.

या घराण्यातील भास्करबुवा बखल्यांसारख्या श्रेष्ठ गायकांनीही उस्ताद अल्लादियाखाँ यांना गुरुस्थानी मानले होते. या घराण्याच्या इतर नामवंत गायकांत भल्लादियाखाँचे बंधू हैदरखाँ व पुत्र मंजीखाँ आणि भुर्जीखाँ, केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, लक्ष्मीबाई जाधव, मल्लिकार्जुन मन्सूर, निवृत्तीबुवा सरनाईक, किशोरी आमोणकर इत्यादींचा समावेश होतो.

संदर्भ : १. देशपांडे, वा. ह. घरंदाज गायकी, मुंबई, १९६१.

२. मारुलकर, ना. र. संगीतांतील घराणी, पुणे, १९६२.

देशपांडे, वामनराव