विलायत हुसेनखाँ

विलायत हुसेनखाँ : (सु १८९६-१८ मे १९६२). प्रख्यात गायक. हिंदुस्थानी कंठसंगीतपद्धतीतील आग्रा या प्रमुख घराण्याचे एक अर्ध्व्यू. आग्रा येथे जन्म. तानसेनाचे समकालीन हाजी सुजनखाँ (धृपदगायक, नोहारबानी) यांच्यापासूनच विलायत हुसेनखाँ यांची वंशावळी दाखवली जाते. गग्गेर खुदाबक्ष (१८००-६०) हे आग्रा घराण्याचे आद्य संस्थापक विलायत हुसेनखाँचे पणजोबा होत. विलायत हुसेनखाँ हे सहा वर्षाचे असतानाच त्यांचे वडील नथ्थनखाँ यांचे निधन झाले. त्यानंतर विलायत हुसेनखाँ त्यांचे बंधू महंमदखाँ व अब्दुल्लाखाँ, चुलत आजोबा गुलाम अब्बास इत्यादींकडे गाणे शिकले. शिवाय आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक उस्ताद फैय्याझखाँ यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.

विलायत हुसेनखाँ यांची गायकी मर्दानी, शास्त्रशुद्ध आणि लयीच्या खेळांत रमणारी होती. प्रचलित व अप्रचलित अशा दोन्ही प्रकारच्या रागांची कुशल गायकी त्यांच्या आग्रा घराण्यात रूढ होती. तीत धृपदधमार, ख्याल, तराना, ठुमरी या प्रकारांतील विविध बंदिशींचा लक्षणीय भरणा होता. आग्रा घराण्याचे शिक्षण सर्वांगीण असल्याच्या खुणा या गायकीत सर्वत्र आढळतात.

विद्वान गायक म्हणून विलायत हुसेनखाँ यांचा जितका लोकिक आहे, तितकाच तो प्रभावी गुरू म्हणूनही आहे. अनेक ख्यातनाम गायक त्यांच्या शिष्यवर्गात अंतर्भूत आहेत. उदा., श्रीमतीबाई नार्वेकर, इंदिरा वाडकर, मेनका शिरोडकर, सरस्वतीबाई फातरफेकर, जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गजाननराव जोशी, राम मराठे वगैरे.

विलायत हुसेनखाँ यांची तिसरी महत्त्वाची कामगिरी म्हणजे ‘प्राणपिया’ या चोपण नावाने त्यांनी केलेल्या बंदिशी ही होय. अनेक परिचित-अपरिचित रागांत त्यांच्या रचना असून साधी ठसठशीत शब्दयोजना, रागरूपाचे बारकावे टिपणारी बांधणी, लयीच्या डौलदार क्रीडा या गुणांमुळे त्यांच्या बंदिशी गायकप्रिय ठरल्या आहेत. संगीतज्ञोंके संस्करण हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक वाचनीय व महत्त्वाचे आहे. दिल्ली आकाशवाणी केंद्रावर ते काही काळ नोकरीस होते. दिल्ली येथेच त्यांचे निधन झाले.

रानडे, अशोक दा.