श्टॉकहाउझेन, कार्लहाइंट्‌स : (२२ ऑगस्ट १९२८- ). जर्मन संगीतरचनाकार. इलेक्ट्रॉनिक आणि श्रेणी संगीतरचनांचा एक निर्माता व सिद्धांतवादी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या श्टॉकहाउझेनचा प्रभाव विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुरोगामी संगीत-रचनाकारांवर पडला. त्याचा जन्म सामान्य कुटुंबात झीमॉन श्टॉकहाउझेन आणि गेट्नट स्ट्नप या दांपत्यापोटी जर्मनीतील कॉल्न शहरानजीकच्या मोद्राथ या खेड्यात झाला. त्याचे वडील शिक्षक होते. बालपणीच तो पियानो व व्हायोलिन वाजविण्यास शिकला. १९४५ मध्ये त्याने शेतावरही काम केले. खेड्यातील नृत्यांच्या जलशांतून तो पियानो वाजवीत असे.त्याने कॉल्न व बॉन विदयापीठांतील ‘ नॅशनल म्यूझिक कॉन्झर्व्हेटरी ’मध्ये संगीताचे शिक्षण घेतले (१९४७५१). पुढे तो पॅरिसला गेला श्टॉकहाउझेन"(१९५२). तिथे त्याने ऑलीव्ह्ये मेस्यां आणि दार्युएस मीयो या संगीतरचनाकारांच्या हाताखाली अध्ययन केले (१९५२-५३). तत्पूर्वी त्याचा डोरिस आन्द्रेई श्टॉकहाउझेन या युवतीशी विवाह झाला होता (१९५१). त्यांना एक मुलगा व तीन मुली झाल्या. कॉल्न येथे परत आल्यानंतर प. जर्मनीतील सुप्रसिद्ध नभोवाणी केंद्रात इलेक्ट्रॉनिक म्यूझिक स्टुडिओत त्याने काम पतकरले. तिथे त्याची पुढे कला संचालकपदी नियुक्ती झाली (१९६३७७). या काळात त्याचा Elektronische Studien I (१९५३ इं. भा. इलेक्ट्रॉनिक स्टडी) हा ध्वनितरंगावरील गंथ प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्याचा इलेक्ट्रॉनिक संगीतविषयक दुसरा भाग प्रकाशित झाला (१९५४). त्याने बॉन विदयापीठात १९५४-५६ च्या दरम्यान ध्वनिविज्ञान, ध्वनिविचार आणि अवगमन सिद्धांत यांचा अभ्यास केला. त्याला तत्त्वज्ञानाची जोड देऊन त्याने आपल्या संगीतरचना सिद्ध केल्या. कालांतराने संगीताचे आध्यात्मिक कार्य व विश्वाच्या स्वरूपाविषयी गूढवादी भूमिका यांमुळे त्याच्या संगीतरचनांनी एक निराळेच वैशिष्ट्यपूर्ण वळण घेतले. काही काळ त्याने Die Reihe या संगीत नियतकालिकाचे संपादन केले (१९५४). डार्मस्टॅट येथील ‘ इन्स्टिट्यूट ऑफ समर स्कूल ’मध्ये त्याने व्याख्याने दिली. तिथे त्याने संगीतरचना शिकविल्या. तसेच कॉल्न येथे कार्यशाळा आयोजित केल्या (१९६३). यूरोप आणि उत्तर अमेरिकेत अभ्यागत व्याख्याता म्हणून त्याने दौरे करून संगीतसभा घेतल्या, व्याख्याने दिली. त्याने १९७१-७७ च्या दरम्यान ‘ स्टेट ॲकॅडेमी फॉर म्यूझिक ’(कॉल्न) येथे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. त्याचे संगीतातील प्रयोग आणि अध्यापन या वयातही चालू आहे. ‘ श्टॉकहाउझेन ’हा वार्षिक अभ्यासकम संगीतरचनाकार आणि अर्थबोधनकार यांसाठी कूर्टन येथे १९९८ मध्ये सुरू करण्यात आला. त्याने ध्वनीचे परिमाण, ध्वनिरोह (उच्च-नीचता), त्याची तीव्रता, कालावधी, स्वरविशेषत्व आणि अवकाशातील स्थिती यांची एक उपपत्ती विकसित केली. ती पूर्णतः स्वयंनिर्मित असून कोणत्याही प्रभावापासून अलिप्त होती तथापि वादयसंगीताला सरावलेल्या बहुसंख्य श्रोतृवृंदाला इलेक्ट्रॉनिक संगीतरचना अद्यापि भावत नाहीत.

प्रयोगशील आधुनिक संगीतरचनाकार म्हणून श्टॉकहाउझेन हा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आघाडीवर राहिला. पारंपरिक, पाश्चात्त्य संगीतरचनांपेक्षा श्टॉकहाउझेनची संगीतरचना वेगळी असून ती वेगळ्या कलासूत्रांची सूचक आहे. त्याच्या म्हणून २९६ संगीतरचना प्रसिद्घ झाल्या आहेत. त्यांपैकी काही आगळ्यावेगळ्या संगीतरचना पुढीलप्रमाणे : (१) क्रॉस-प्ले (१९४९)  शोएनबर्गच्या ‘ सिरिॲलिझम ’या विख्यात स्वरसंघटनातत्त्वास लय व ध्वनिगरिमा या संगीतांगांना लावण्याचा वेगळा यत्न. (२) काउंटरपॉइंट (१९५३)  दहा वादक सिरिॲलिस्ट पद्धतीने सहभागी. (३) स्टडीज (१९५४)  ध्वनिमुद्रणकक्षात निर्माण केलेले कृत्रिम ध्वनी वापरून केलेली रचना. (४)साँग ऑफ द यंग मेन (१९५६)  गाते आवाज व संश्लेषित ध्वनी. शिवाय संगीत व भाषा यांच्या एकत्र अवताराची नवी समीकरणे साधण्याचा प्रयत्न. (५) ग्रूप्स (१९५८)-  तीन वादयवृंद एका वेळेस वापरून मुख्यतः अवकाशतत्त्व धुंडाळण्याचा दोन मार्गांनी प्रयास : (अ) दोन वादयवृंद आपापले आविष्कार एकाच वेळी करत राहतात, वा एकमेकांकडे आपापले आविष्कार प्रक्षेपित करतात. (आ) एकाच ध्वनीचे सखोल विश्लेषण करून सूक्ष्म ध्वनिभेदांवर आधारित संगीतालेख-रचना. हे मग निरनिराळ्या समूहांकडून ध्वनित. (६) कॉन्टॅक्ट्स (१९६०)  पियानो, आघातवादये व ध्वनिमुद्रित फीत यांच्या संयोगातून इथे दोन वेगळी माध्यमे एकत्र आणली, शिवाय वादकांनी इलेक्ट्रॉनिक ध्वनींचे अनुकरण करावे, हे रचनासूत्र पायाभूत मानले. (७) मोमेंट्स (१९६२)  विविध ध्वनि-उगम एकत्र आणून, शिवाय त्यांच्या ध्वनिरंगांत वा स्वनरंगांत खेळ व्हावा अशी योजना. (८) मिक्श्चर (१९६५)  वादयवृंदांचे ध्वनी इलेक्ट्रॉनिक सामगीने रूपांतरित व्हावेत, अशी कल्पना कार्यकारी. (९)टेलिम्यूझिक (१९६६)  सर्वसाधारणत: घटकांची मांडणी द्विध्रूवात्म केली जाईल व त्यांच्या दरम्यान आपण राहून रचना करावयाची असे एक सूत्र कार्यकारी. (१०) अँथम (समूहगीत) वा हिम्स (स्तोत्रे किंवा सूक्ते) (१९६७). (११) फॉम द सेव्हन डेज (१९६८)  संगीत सादर करणाऱ्यांच्या अंत:प्रेरणांना आवाहन करीत करीत रचना सिद्ध व्हावी, या उद्देशाने गद्यकाव्यांचा रचनांत समावेश. (१२) मंत्र (१९७०)  दोन पियानो व इलेक्ट्रॉनिक संगीत वापरणारी गूढवादी रचना. (१३) ॲडोरेशन (१९७४)  नृत्य-. (१४) Musik in Bauch (१९७५)  सहा आघातवादय-वादक एकत्र आणून संगीताच्या भौतिक व मानसिक शक्तींचा शोध घेण्याचा घाट घालणारी रचना.

लाइट (१९७७) ही त्याची सर्वोत्कृष्ट रचना आध्यात्मिकता आणि गूढवाद यांनी भारलेली आहे. त्याच्या सर्व संगीतरचनांचा अल्बम प्रसिद्ध झाला असून (१९९१), त्याचे समग साहित्य Texte Zur Musik या शीर्षकाने दहा खंडांत प्रकाशित झाले आहे (१९८४-९१).

त्याला अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी यूनेस्को पिकासो मेडल (१९९२), पोलर म्यूझिक पाइझ (२००१), जर्मन म्यूझिक पब्लिशर्स अवार्ड (२००२) वगैरे प्रतिष्ठेचे होत. यांशिवाय तो रॉयल ॲकॅडेमी ऑफ म्यूझिक (लंडन), रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी (अकड), Der Kunste (बर्लिन), अमेरिकन ॲकॅडेमी अँड इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स वगैरेंचा सन्मान्य सभासद होता. बर्लिन युनिव्हर्सिटी (बर्लिन), क्वीन्स युनिव्हर्सिटी, बेलफास्ट (२००४) वगैरेंनी त्यास सन्माननीय डॉक्टरेट देऊन सन्मानित केले.

रानडे, अशोक दा.