हायडन, फ्रांट्स योझेफ :(३१ मार्च १७३२–३१ मे १८०९). श्रेष्ठ ऑस्ट्रियन संगीतरचनाकार. ‘आधुनिक सिंफनीचा जनक’ म्हणूनही त्याचा यूरोपियन संगीत जगतात उल्लेख केला जातो. त्याचा जन्म सामान्य कुटुंबात रोराऊ (लोअर ऑस्ट्रिया) या गावी झाला. वयाच्या आठव्या वर्षी बालगायक म्हणून व्हिएन्नामधील सेंट स्टीफन्स कॅथीड्रलच्या गायक मंडळात त्याने स्थान मिळविले. तेथेच त्याने संगीताचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले आणि संगीताचे ज्ञान अथक प्रयत्नाने संपादन केले. पुढे त्याने इटालियन ऑपेरा संगीतकार आणि गायक निक्कोला पोर्पोरा(१६८६–१७६८) यांच्याकडे ऑपेरा संगीताचा अभ्यास केला. त्यानंतर व्हिएन्नातील तत्कालीन संगीतकारांशी त्याचा परिचय झाला. या काळात त्याने काही स्ट्रिंग क्वार्टेट्स, कीबोर्ड सोनाटा लिहिले. बोहीमिया येथील अल्पकालीन खाजगी नोकरीत असताना त्याने पहिली सिंफनी लिहिली (१७५९). एस्टरहॅझी या हंगेरियन राजेशाही घराण्यात संगीतकार म्हणूनतो नोकरीस लागला. तेथे प्रथम तो उपसंचालक होता. प्रिन्स पॉलच्यामृत्यूनंतर (१७६२) निकोलसने त्यास संगीत संचालक केले. तो १७९० पर्यंत या राजघराण्यात नोकरीस होता. त्याच्या हाताखाली बारा संगीत-कारांचा वाद्यवृंद आणि गायकांचा एक समूह होता. दर आठवड्याला दोन संगीतिका (ऑपेरा) आणि दोन संगीत जलसे (कन्सर्ट्स) सादर करणे, तसेच रविवारच्या मॅसची प्रार्थना तयार करणे, ही कामे त्यास करावीलागत. यामुळे त्याची निर्मितिक्षमता वाढली आणि त्यास स्वयंसिद्धता प्राप्तझाली. १७६०–९० या काळात त्याने ४० सिंफनी, ९ संगीतिका, तंतूवाद्य (बॅरिटोन) इत्यादींबरोबर पहिली मॅस संगीतरचना लिहिली. काहींचे रंगभूमीवर सादरीकरणही केले. यामुळे त्याचा नावलौकिक वाढला. तो खासगी नोकरी करीत असतानाच त्याचा ऑस्ट्रियन संगीतरचनाकार व्होल्फ्गांग मोट्सार्ट या महान संगीतकाराशी परिचय झाला (१७८१). परिणामतः त्याचा प्रभाव हायडनवर पडला. किंबहुना दोघांचा परस्परांवर प्रभाव होता.

 

१७९१ मध्ये प्रिन्स निकोलसचा मृत्यू झाला. ह्यानंतरच्या काळातत्याने स्वतंत्रपणे मोट्सार्टच्या तोडीची संगीतरचना केली व फार मोठ्या संख्येने सिंफनी व इतर संगीतप्रकार रचून सादर केले. इंग्लंडमधील वाद्यवृंदाचा व्यवस्थापक जे. पी. सॉलमन याने हायडनला निमंत्रित केल्यावरून तो इंग्लंडला गेला. तेथे त्याने काही सिंफनी व संगीतजलसे रंगभूमीवर सादर केले. त्याचे संगीतक्षेत्रातील कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉक्टरेट (Doctor Honoris causa) ही सन्मान्य पदवी त्यास प्रदान केली (१७९२). इंग्लंडच्या वास्तव्यात त्याने सर्वोत्कृष्ट बारा सिंफनी सादर केल्या आणि पियानो ट्रायोज व पियानोसोनाटा यांचीही रचना केली. मायदेशी परतल्यानंतर तो व्हिएन्नात स्थायिक झाला. तत्कालीन विख्यात जर्मन संगीतकार लूट्व्हिख बेथोव्हन याने त्याचे शिष्यत्व पतकरले. हायडनने १७९७ मध्ये ‘कैसर-स्तुति-स्तोत्र’ तसेच द क्रिएशन व द सिझन्स या धार्मिक संगीतिका रचल्या. त्याच्या संगीतरचना विपुल व वैविध्यपूर्ण आहेत. १०६ सिंफनी (रचनाकाल सु. १७५५–९५), ७८ स्ट्रिंग क्वार्टेट्स, १२५ बॅरिटोन ट्रायोज, ५२ कीबोर्ड सोनाटा, ५० पियानो सोनाटा, ३० पियानो ट्रायोज, १३ ऑपेरा, १२ मॅस इ. संगीतकृती त्याने रचल्या. त्याच्या प्रख्यात संगीतकृतीं पैकी फेअरवेल सिंफनी, द सरप्राइज सिंफनी, द मिलिटरी सिंफनी, क्लॉक सिंफनी वगैरे काही महत्त्वाच्या होत. त्याच्या संगीतकृती अभिजात संगीतातील आधुनिक युगाच्या स्वयंप्रेरित सांगीतिक रचना होत.

 

व्हिएन्ना येथे अल्पशा आजाराने त्याचे निधन झाले.

 

पहा : सिंफनी.

 

संदर्भ : 1. Geiringer, K. Haydn : A Creative Life in Music, 1963.

             2. Gotwals, Vernon, Trans., Joseph Haydn : Eighteenth Century Gentleman and Genius, London, 1963.

              3. London, H. C. R. Ed. The Collected Correspondence and London Notebook of Joseph Haydn, London, 1959.  

मोदी, सोराब (इं.) देशपांडे, सु. र. (म.)