गिटार : विद्युत्‌ ध्वनिवर्धक लावून जगात अनेक ठिकाणी वाजविले जाणारे हे पश्चिमी तंतुवाद्य ल्यूट प्रकारातील मेंडोलीनपासून निघाले, असे म्हणता येईल. फरक इतकाच, की याची पाठ अगदी सपाट किंवा अगदी थोडा बाक असलेली आढळते. त्याच्या बाजूंना व्हायोलिन वाद्याप्रमाणे वक्रता असते. सध्या प्रचलित

असलेल्या गिटार वाद्यास सहा तारा असून हे वाद्य बोटांनी तारा छेडून वाजविले जाते.

गिटार

स्पेनमध्ये या वाद्याचा उत्कर्ष झाला. १८३० च्या सुमारास याचा भरपूर प्रसार झाला होता. शास्त्रीय संगीतासाठी गिटारचा यशस्वी वापर करण्याचे श्रेय फ्रॅन्सिस्को सोर आणि तरेगा यांच्याकडे जाते. 

विसाव्या शतकात सेगोविआ या कलावंताने या वाद्याचा प्रवेश संगीताच्या सभागृहात करून दिला व संगीतरचनाकारही या वाद्यासाठी रचना करू लागल्याने या वाद्याचे पुनरुज्जीवन झाले. 

ज्यूलिअन ब्रीम, जॉन विल्यम्स, कार्लोस माँतोया, ख्रिस्तोफर पार्केनिंग यांच्यामुळे आज या वाद्याचा दर्जा वाढला आहे. जॅझ संगीतात कुशल गिटारवादक म्हणून चार्ली ख्रिश्चन, जांगो राईनहार्ट, चार्ली बर्ड, वेस मंगमरी यांचा उल्लेख करता येईल.

मोदी, सोराब (इं) रानडे, अशोक (म.)