बासरी

बासरी : सुषिर वाद्यवर्गातील एक प्रमुख वाद्य. तोंडाने हवा फुंकून वाजविण्याच्या या दंडगोलाकार वाद्याचे अनेक प्रकार आहेत. वेणू, अलगूज, सातारा, वंशी, बन्सी, बन्सरी, पावा, पावरी, मुरली, कोळलू, कोळवी, कुळल, पिल्लनकुळल, पिल्लनग्रोवी, जोडपावो इ. विविध नावांनी या वाद्याचे वेगवेगळे प्रकार भारतात प्रदेशपरत्वे रूढ आहेत. हे प्रकार सामान्यतः बासरीची लांबी, छिद्रसंख्या तसेच वादनतंत्रे यांतील भिन्नतेमुळे पडले आहेत. बासरी हे प्राचीनतम वाद्य असून त्यास वैदिक वाङ्‌मयात ‘तूणव’, ‘नाडी’ अशा संज्ञा होत्या. हिंदू धर्मात श्रीकृष्णाच्या वेणूवादनासंबंधी अनेक आख्यायिका, चित्रे-शिल्पे प्रसिद्ध आहेत. प्राचीन काळी बौद्ध धार्मिक संगीतामध्येही या वाद्यास खास स्थान होते. सूत्रवाङ्‌यातूनतसेच जातककथांमधून तत्संबंधीचे उल्लेख आढळतात. अजिंठा, वेरूळ, अमरावती, खजुराहो, सांची येथील चित्र-शिल्पांतूनही बासरीचे दर्शन घडते. भारतीय दाक्षिणात्य संगीतपद्धतीमध्ये वीणा-वेणू-मृदंग ही वाद्यत्रयी प्रमुख मानली जात असे. प्राचीन काळी स्वरसप्तक ठरवण्यासाठी वेणू व वीणा ही दोन वाद्ये प्रमाणभूत मानली जात. पाश्चात्त्य संगीतातील फ्ल्यूट, रेकॉर्डर, फाइफ यांसारखी वाद्ये या प्रकारातीलच होत.

या वाद्याची रचना साधीच असते. त्यासाठी वेळूची दंडगोलाकार पोकळ नळी वापरतात. त्याऐवजी काही वेळा लाकडी वा धातूची नळीही वापरली जाते. तथापि बांबूची वा पितळी बासरी उत्तम मानली जाते. बासरीच्या प्रकारानुसार तिची लांबी १५ ते ६० सेंमी. च्या दरम्यान असते व मुखरंध्राबरोबरच स्वर निर्माण करण्यासाठी त्यावर सरळ रेषेत ठराविक अंतरावर सहा ते आठपर्यंत छिद्रे असतात. त्यात एका टोकाला बंद असलेली वा दोन्ही  टोकांना खुली असेलेली, असेही प्रकारभेद असतात. बंद टोकाच्या बासरीमध्ये जोराने फुंकल्यास वरच्या सप्तकातील पंचम मिळतो, तर खुल्या प्रकारात वरचा षड्ज वाजतो.

वादनपद्धतीनुसार टोकाकडून (१) उभे धरून वाजवण्याचे शिट्टीसारखे किंवा जिभली असलेले आणि (२) आडवे धरून वाजवण्याचे फुंकणीवजी नळीसारखे, असे मुख्य दोन प्रकार पडतात. नळीमधील हवेचा स्तंभ स्वररंध्रातून किंवा शिट्टीवजा तोंडातून चलित केला जातो आणि स्वर निर्माण होतो. दोन्ही हातांच्या बोटांनी वाजवण्यासाठी ६ ते ८ ध्वनिरंध्रे व शिवाय अष्टस्वर काढण्यासाठी, खालचा स्वर घेण्यासाठी अधिक भोके असतात आणि त्यांच्या उघडझापीने स्वरस्तंभाची लांबी कमीजास्त करून विविध स्वर काढले जातात. कोमल स्वर वाजवण्यासाठी पाश्चात्त्य वादनपद्धतीमध्ये ‘क्रॉस फिंगरिंग’ तंत्र वापरतात तर भारतीय पद्धतीत भोके अर्धी उघडून असे स्वर काढतात. क्रॉस फिंगरिंगमध्ये कोमल स्वर काढताना, बोटाखालील उघडे रंध्र सोडून त्याखालचे रंध्र बंद करतात. पाश्चात्त्य फ्ल्यूटला कळचाव्यांची जोड देण्यात आल्याने वादनतंत्रामध्येही आमूलाग्र क्रांती घडून आली आहे. १८३२ व १८४७ या वर्षी जर्मन फ्ल्यूटवादक टेओबाल्ट बम याने फ्ल्यूटच्या रचनेत बदल करून वादनतंत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या.

हे वाद्य गायन-वादनाच्या साथीमध्ये तद्वतच स्वतंत्र वादनासाठीही वापरले जाते. आधुनिक भारतीय वाद्यवृदांमध्ये या वाद्यास आता महत्त्वपूर्ण स्थान लाभले आहे. या वाद्याचा मधुर स्वर, स्वरांतराचा मानवी आवाजासारखा पल्ला यांसारख्या गुणांमुळे व्यावसायिकांपासून हौशी वादकांपर्यंत ते सर्वांचेच आवडते वाद्य ठरले आहे. यूरोपमध्ये शास्त्रीय संगीतात मोठमोठ्या संगीतरचनाकारांनी या वाद्याचा उपयोग करून घेतला आहे.

भारतामध्ये अलीकडच्या काळात नामवंत बासरीवादकांची एक परंपराच निर्माण झाली आहे. ⇨पन्नालाल घोष, टी. आर्. महालिंगम, देवेंद्र मुर्डेकर, बेडा देसाई, हरिप्रसाद चौरसिया, विजय राघवराव ही त्यांपैकी काही नावे होत.

संदर्भ :   1. Bate, Philip, The Flute, New York, 1969.

             2. Boehm, T. Trans. Miller, D.C. The Flute and Flute-Playing, New York, 1964.

गोंधळेकर, ज. द.