अहमदजान थिरकवा

थिरकवा, अहमदजान : (१८९१ ? – १३ जानेवारी १९७६). प्रख्यात हिंदुस्थानी तबलावादक. त्यांचे जन्मवर्ष १८७४, १८७८ किंवा १८८२ असेही दर्शविले जाते. त्यांचा जन्म मुरादाबाद येथे झाला. ते तबल्यावर ‘थिरक–थिरक’ असे बोल अत्यंत द्रुतलयीत व स्वच्छ रीतीने वाजवत म्हणून उस्ताद कालेखाँनी त्यांना ‘थिरकवा’ (तिरखवा) हे नाव दिले. त्यांनी संगीतातील सुरुवातीचे धडे त्यांचे वडील व प्रसिद्ध सारंगीवादक उस्ताद हुसेनबक्ष, उस्ताद शेरखाँ व फैयाजखाँ यांच्याकडे घेतले. पुढे उस्ताद मुनीरखाँच्या हाताखाली सु. २५ वर्षे त्यांनी तबलावादनाचे विविध बारकावे व शैली आत्मसात केल्या. १९२८ च्या सुमारास त्यांना भास्करबुवा बखल्यांनी महाराष्ट्रात आणले. ते साधारणतः दहा वर्षे ‘गंधर्व नाटक मंडळी’ त होते. बालगंधर्वांच्या नाट्यपदांना थिरकवांच्या भावानुकूल व सुसंवादी साथीने सोन्याला सुगंध लाभावा तशी खुलावट येत असे. बालगंधर्वांनीच त्यांना महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवून दिली. काही काळ ते रामपूरच्या नबाबांच्या पदरी होते. लखनौच्या भातखंडे संगीत विद्यालयात ते तबलावादनाचे प्राध्यापक होते. १९७१ पासून त्यांनी ‘नॅशनल सेंटर ऑफ पर्‌फॉर्मिंग आर्ट्‌स’, मुंबई येथे तबल्याच्या प्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लखनौ येथे त्यांचे निधन झाले.

उस्ताद थिरकवांनी आपल्या भरदार, विविध लयकारीच्या आणि दिल्ली, पूरब, अजराडा, फरुखाबाद या विविध घराण्यांच्या वादनशैलींच्या तबल्या–डग्ग्याच्या एकसंध खुबसुरत वादनामुळे तबल्याला मैफलीत गवयाप्रमाणे मध्यवर्ती स्थान प्राप्त करून दिले. अनेक श्रेष्ठ व नामवंत गायक–वादक नर्तकांना त्यांनी अप्रतिम साथसंगत केली. स्वतंत्र तबलावादनाच्या रंगतदार मैफली करण्याचा त्यांनी पायंडा पाडला व त्यायोगे तबला या वाद्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांच्या शिष्यपरिवारात जगन्नाथबुवा पुरोहित, लालजी गोखले, निखिल घोष, नारायण जोशी इ. प्रसिद्ध आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमीचे हिंदुस्थानी वादनातील पारितोषिक (१९५४), राष्ट्रपती पारितोषिक, पद्मभूषण (१९७०) इ. मानसन्मान लाभले. त्यांच्या तबलावादनावरील लघुपटही प्रदर्शित झाला आहे.

मंगरूळकर, अरविंद