तानसेनाचे तत्कालीन व्यक्तिचित्र, १८८५–९०.

तानसेन : [१४९३ (?)–२६ एप्रिल १५८९]. एक श्रेष्ठ भारतीय गायक. संगीतक्षेत्रात अलौकिक अशा गणल्या गेलेल्या या कलावंताबद्दल जितके चमत्कार आणि दंतकथा प्रचलित आहेत, त्या मानाने त्याचे अधिकृत चरित्र असे कोठे नोंदले गेलेले नाही. त्याचे जन्मवर्ष १५०६, १५२६, किंवा १५३१–३२ असेही दर्शविले जाते. तानसेनचे मूळ नाव रामतनू किंवा तन्नामित्र असे होते. ग्वाल्हेरजवळ बेहट या गावी त्याचा जन्म झाला. त्याचे वडील मकरंद पांडे हे गौड ब्राम्हण, संस्कृत पंडित व उत्तम गायक होते. त्यांच्यामुळे त्याला लहान वयातच गाण्याची गोडी लागली. तानसेनची ग्रहणशक्ती पाहून वृंदावनचे संत स्वामी हरिदास यांनी तानसेनला गाणे शिकवले. आरंभी ग्वाल्हेर येथे दरबारात राहिल्यावर आणि गायक म्हणून प्रतिष्ठा प्राप्त केल्यावर तो रीवा नरेश, रामचंद्र बाघेला यांच्या दरबारांत गायक म्हणून राहिला. तेथून १५६२ च्या सुमारास तानसेन अकबर बादशाहाच्या दरबारात आला. अकबरच्या दरबारात येण्यापूर्वीच सर्वोत्कृष्ट गायक म्हणून त्याची ख्याती पसरलेली होती. अकबराने त्याला विशेष सन्मान देऊन संगीतसम्राट तानसेन म्हणून गौरविले आणि आपल्या दरबारी नवरत्नांमध्ये त्यास स्थान दिले. पुढे तानसेन हा संगीतक्षेत्रातील एक अद्‌भूत चमत्कार म्हणून ख्याती पावला. तानसेन हा धृपद गायक होता. शिवाय त्याने स्वतः रचलेली अनेक धृपदेही प्रसिद्ध आहेत. रागकल्पद्रुम या ग्रंथात तानसेनने रचलेली अनेक धृपदे आढळतात. त्याने व्रज भाषेत आपली पद्यरचना केली.

तानसेनला दोन बायका असून सुरतसेन, सरतसेन, सरस्वती ही हिंदू पत्नीची मुले आणि तानरंगखाँ व बिलासखाँ ही हुसेनीनामक मुस्लिम उपपत्नीची मुले असे समजले जाते. सरस्वतीचा विवाह मिश्रीसिंग (नौबतखाँ) नावाच्या बीनकाराबरोबर झाला आणि मुलीकडूनचात्याचा बीनकारांचा वंश ‘सेनिया’ म्हणून प्रसिद्धीस आला. मुलाकडूनची सेनिया परंपरा रामपूरची असून हे कलावंत धृपद गायक होते. तानसेनने स्वतः अनेक नवीन रागांची निर्मिती केली असून ‘मियाँ की तोडी’, ‘मियाँ की मल्हार’, ‘दरबारी कानडा’, ‘मियाँ की सारंग’ वगैरे राग तानसेनची निर्मिती म्हणून मानले जातात. दीपक राग गाऊन अग्नी प्रज्वलित करणे, मल्हार गाऊन पाऊस पाडणे, तोडी गाऊन हरणे बोलावणे, बैजू बावराशी स्पर्धा, ‘तानारिरि’ चा प्रसंग वगैरे अनेक चमत्कृतीपूर्ण आख्यायिका तानसेनच्या जीवनाशी जोडल्या जातात. सुप्रसिद्ध वैष्णव संत गोविंदस्वामी यांच्या बरोबरच्या आख्यायिकाही प्रचलित आहेत. संत सूरदास आणि पंडित जगन्नाथराम हेदेखील तानसेनच्या सहवासात आले होते असे मानले जाते. संगीताच्या दृष्टीने तानसेनची धृपद गायकी ही ‘गौडी’, ‘गोहरबानी’ म्हणून समजली जाते. संगीत सार  व रागमाला  हे दोन ग्रंथ त्याच्या नावांवर दाखवले जातात. अबुल फज्लने अकबरनाम्यात तानसेनाचे वर्णन ‘असा कलावंत हजार वर्षांत झाला नाही’, असे केले आहे. तानसेनाची समाधी ग्वाल्हेर येथे मुहंमद घौस या अवलियाच्या दर्ग्याजवळ दाखवली जाते. त्या ठिकाणी दर वर्षी तानसेनच्या पुण्यतिथीला मोठा जलसा भरवला जातो व त्यात अनेक नामवंत गायक आपली सेवा रुजू करतात.

आठवले, वि. रा.