इंदूर घराणे : संगीतातील एक घराणे. साधारणपणे विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या सुमारास ह्या घराण्याचे गायक मुंबईतील भेंडीबाजार ह्या विभागात राहत त्यावरून त्यांना ‘भेंडीबाजारवाले’ असे नाव प्राप्त झाले होते. त्यांची गायकी मेरखंड-पद्धतीची. ह्या गायकीत गणितागत पद्धतीने एखाद्या स्वरसंख्येचे जेवढे प्रकार होतील, तेवढे घेण्याची प्रवृत्ती आढळते. तथापि हे करीत असताना कलात्मकतेचे भान काही प्रमाणात हरवते, अशी टीका इंदूर घराण्याच्या गायकीवर केव्हा केव्हा केली जाते. आवाजातील चपलता, सुरेलपणा, स्वरविलासाची ओढ, त्यातही स्वरांचे वरचे खालचे सूक्ष्म कण लावण्याचे प्राबल्य ही ह्या घराण्याच्या गायकीची मुख्य वैशिष्ट्ये. स्वरविलासाच्या आवडीमुळे आलापचारीला विशेष वाव असलेल्या शुद्ध कल्याण, दरबारी, मालकंस, आसावरी, ललत अशांसारख्या रागांवरच इंदूर घराण्यातील गायकांचा अधिक भर असतो. आवाजातील चपलतेमुळे ह्या घराण्याच्या गायकांना जलद ताना घेणे आणि स्वरांच्या तिन्ही सप्तकांत सहजपणे फिरणे शक्य होते. ह्या घरण्यातील लयकारीची जाणीव मध्यरात्रीच्या चिजांमध्ये अधिक दिसते. बोलअंग आणि बोलतान इंदूर घराण्याच्या गायकीत नाही. तसेच ह्या घराण्यात ठुमरीही नाही. शाहमीरखाँ, नजीरखाँ, छज्जूखाँ, अंजनीबाई मालपेकर, शिवकुमार शुक्ल, अमीरखाँ, अमानत अलीखाँ, इ. गायक ह्या घराण्याचे आहेत.

संदर्भ : देशापांडे, वामन हरि, घरंदाज गायकी, मुंबई, १९६१.

कुलकर्णी, अ. र.