बेरल्योझ, ल्वी एक्तॉर: (११ डिसें. १८०३-८ मार्च १८६९). फ्रेच संगीतकार. ला कोत सॅं आंद्रे येथे जन्म. त्याचे वडील डॉक्टर होते.१८२० च्या सुमारास त्यानेही वैद्यकशास्त्राचा अभ्यास सुरू केला 

एक्तॉर बेर्‌ल्योझ

पण तो अर्धवटच सोडून देऊन तो संगीताकडे वळला. सुरूवातीस त्याने झां फ्रांखा लेस्यूअर या तत्कालीन ख्यातनाम ऑपेरारचनाकाराकडे संगीताचे धडे घेतले (१८२३).१८२६ पासून `पॅरिसकन्सर्व्हत्वार’ या संगीत विद्यालयात संगीतरचनेचे पद्वतशीर शिक्षण घेतले. तीन अयशस्वी प्रयत्नानंता त्याला १८३० मध्ये `प्रिक्सदी रोम’ हे पारितोषिक मिळाले. दरम्यानच्या काळात तो हॅरिएट स्मिथसन या आयरिश नटीच्या प्रेमात पडला. या प्रेमानुभवाची प्रेरणा त्याच्या सिंफनी फॅटॅस्टिक (१८३०)या पहिल्या महत्वाच्या संगीतकृतीमागे दिसते.`प्रोग्रॅम म्यूझिक'(संगीतरचनांची कथेशी वा तत्सदृश कल्पनांशी सांगड घालण्याची त्याची पद्वती या नावाने ओळखली जाते) या संगीत. प्रकारातील हा एक धीट, नावीन्यपूर्ण व क्रांतिकारक प्रयोग मानला जातो. पुढे त्याने हॅरियट स्मिथसनशी लग्न केले. तिच्या मृत्यू नंतर (१८५४) त्याने मारी रेसियो या गायिकेशी दुसरे लग्न केले. पॅरिसमध्ये १८३०-४० या दशकात त्याने हॅरल्ड इन इटली  (१८३४) व रोमीयो ॲड जूलिएट  (१८३९) ह्या सिंफनी-रचना, बेन्‌व्हेनूतो चेल्लीनी (१८३८) हा ऑपेरा, रेकियम मॅस (१८३७) अशा एकाहून एक संगीतकृती निर्मान केल्या. १८४२-४३ मध्ये त्याने जर्मनी, ऑस्ट्रिया, इंग्लड, रशिया इ. ठिकाणी संगीतसभा (कॉन्सर्ट्‌स) आयोजित केल्या. द डॅम्नेशन ऑफ फाउस्ट (१८४६) हा त्याचा उत्कृष्ट ऑपेरा त्याच्या हृयातीत अयशस्वी ठरला पण नंतर तो खूप गाजला. त्याचा द ट्र्रोजन्स (१८९०पुनर्निर्मिती १९९०) हा एक भव्य व नाट्यपूर्ण ऑपेरा होय. द चाइल्डहुड ऑफ खाइस्ट  (१८५४) या ⇨ऑरेटोरिओची  (स्थूलमानाने संगीतिकेसारखाचपण रंगभूषा वेशभूषा यांचा वापर न करता विविध पात्रांनी विविध प्रकारचे गायन सादर करण्याचा प्रकार) संहिताही त्याने लिहिली होती. तो पुढेही दीर्घकाळ लोकप्रिय ठरला.

तो फ्रेच स्वच्छंदतावादी सांगितिक चळवळीतील सर्वात महत्वाचा संगीतरचनाकार व संगीतशास्त्रज्ञ मानला जातो. वैयक्तिक जीवनीतही स्वच्छंदतावादावचे पूर्ण प्रतिबिंब पडलेल्या या संगीतकाराने आपल्या संगीतरचनामध्ये भव्यपणा, वाङ्मयीन कृतीपासून स्फूर्ती, स्वनरंगावर (टोन कलर) भर आणि `प्रोग्रॅमम्यूझिक’ सारख्या संगीतप्रकारात वर्णनात्मक आशय इ. विशेषांना प्राधान्य दिलेले आढळते. त्याने जवळजवळ पंचवीस वर्ष संगीतसमीक्षापर लेखन केले. स्वतःच्या आणि इतरांच्या संगीतकृतीचे त्याने निर्दर्शनेही केले. असे असले तरी,त्याच्या कार्याविषयी अजूनही मतभमद व्यक्त केले जातात. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

त्याच्या संगीतकृतींप्रमाणेच त्याच्या लेखनाचाही यूरोपीय संगीतविश्वावर दूरगामी परिणाम झाला. त्याचा त्रेते दॅंस्त्रुमॉंतांस्पॉं ए दॉर्केखास्पॉं मॉदने (१८४४ इं.मा. द ट्रीटाइज ऑन मॉडर्न इंस्टुरमेंटेशन अँड ऑर्केस्ट्रेशन) हा प्रबंध वाद्यवृंदीय संगीतरचनेवरील प्रमाणभूत ग्रंथ मानला जातो. त्याच्या ले स्वारे द लॉर्केस्र याने इव्हनिंग्ज विथ द ऑर्केस्ट्रा (१९५६) या नावाने केले आहे. त्याच्या आठवणींचा संग्रह मेम्वार्स हा त्याच्या पचशत १८७० मध्ये प्रसिद्ध झाला. रेशेल व एलेनर होम्झ यांनी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले व अर्नेस्ट न्यूमन यांनी पुनर्संपादन केले (१९३२). डेव्हिड केअर्न्झ यांनीही द मेम्वार्स ऑफ एक्तॉर बेर्‌ल्योझ (१९६९) या नावाने त्याचे भाषांतर केले आहे. त्याचा निवडक पत्रसंग्रही हम्फी सर्ल यांनी अनुवादित केला आहे (१९६६).

संदर्भ : 1. Barzun, Jacques, Berlloz and His Century: An Introduction to The Age of Romanticism , New York, 1956.

             2. Turner, Walter, Berlioz, His Life and Work, London, 1934.

रानडे, अशोक