ऑर्गन: पाश्चात्त्य संगीतातील सर्वांत गुंतागुंतीचे आणि महत्त्वाचे वाद्य. सु. सहाशे वर्षांपूर्वी गीयोम द माशो ह्याने ऑर्गनला वाद्यांचा राजा म्हटले. आजतागायत हा किताब त्याला लागू पडतो.

फुंकून वाजविण्याचे सिरिंक्स हे प्राचीन नलिकावाद्य ऑर्गनचे मूळ समजतात. हायड्रलस हे सार्वजनिक करमणुकीचे रोमनकालीन वाद्य ऑर्गनसारखे होते. पुढे चर्चमध्ये सामुदायिक प्रार्थनागायनासाठी मोठा ऑर्गन वापरात आला. यातील हवेचा पुरवठा करणारे भाते हलविण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागे. ऑर्गन तयार करणाऱ्या फ्लेमिश, डच, उत्तर जर्मन आणि इंग्लिश कारागिरांनी ऑर्गनबांधणीची कला उच्चावस्थेस पोचविली. ख्रिस्ती जगतात, विशेषतः यूरोपमध्ये, आज प्रत्येक चर्चमध्ये ऑर्गन असतो.

ऑर्गनला पियानोप्रमाणेच, पण अनेक स्वरफलक (की बोर्ड्स) असतात. त्यांपैकी दोन स्वरफलकांना हातपट्ट्या (मॅन्युअल्स) म्हणतात. ऑर्गनच्या पायथ्याशी पायफळी असते आणि मंद्रस्वरांसाठी तिचा उपयोग केला जातो. ऑर्गनमध्येही हार्मोनियमप्रमाणेच भात्यातून दबावाने निघणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे नाद निघतो. हवेचा प्रवाह भात्यातून निघून ध्वनिनलिकांत जात असतो. हातपट्ट्यांच्या दोन्ही बाजूंस ओढखुंट्या असतात. त्यांच्या साहाय्याने नादाच्या स्वरविशेषत्वास विविधता आणता येते व त्यावर नियंत्रणही ठेवता येते. मराठी नाट्यसृष्टीत ऑर्गन म्हणून ओळखले जाणारे वाद्य व खऱ्या ऑर्गनचे मर्यादित व लहान रूप होय. साधारणतः पंधराव्या शतकाच्या सुमारास ऑर्गनचा विकास पुरा झाला होता. त्यानंतर त्यात सुधारणा होत रहिल्या. आधुनिक ऑर्गनला सर्वसाधारणतः चार हातपट्ट्या, पायफळी इ. भाग असतात. स्वरविशेषत्वात विविधता आणण्यासाठी आणि हवेचा पुरवठा नियमित व नियंत्रित होण्यासाठी विजेचा उपयोग करून आज इलेक्ट्रिक ऑर्गन तयार केला जातो. लंडनच्या द रॉयल फेस्टिव्हल हॉलमधील ऑर्गनला ८,००० च्या वर ध्वनिनलिका आहेत. संगीत कार्यक्रमासाठी उपयोगात येणारा ऑर्गन बांधण्यास सु. एक लाख ऎंशी हजार रुपयांवर खर्च येतो.

भारतातील काही चर्चमधून व कॅथीड्रलमधून इंग्रजी बनावटीचे काही उत्तम ऑर्गन होते परंतु त्यांची निगा राखण्यासाठी आवश्यक त्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे ध्वनिनलिकांचा ऑर्गन भारतातुन आता हळूहळू नाहीसा होत आहे.

आजकालचे काही प्रख्यात ऑर्गनवादक म्हणून आल्बेअर श्वाइस्तर, फेर्नांदो जेर्मानी, सायमन प्रेस्टन, ई. पॉवर बिग्ज, मार्सेल द्यूप्रे, लायोनेल रॉग, हेल्मूट वाल्चोयांचा निर्देश करता येईल. (चित्रपत्र ७७).

संदर्भ : 1. Audsley, G. A. Art of Organ Building, 2 Vols., New York, 1905.

             2. Skinner, E. M. Modern Organ, New York, 1917.

             3. Clutton, Cecil Dixon, George,Organ, its Tonal Structure and Registration, London, 1950.

             4. Sumner, W.L. Organ its Evolution, Principles of Construction and Use, New York, 1952.

मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)

एक अलंकृत चेंबर ऑर्गन, जर्मनी, १६२७.