चायकॉव्हस्की, प्यॉटर इल्यीच : (७ मे १८४०–६ नोव्हेंबर १८९३). प्रख्यात रशियन संगीतकार. जन्म व्हॉट्‌किन्स्क येथे. त्याने कायद्याचा अभ्यास केला व काही काळ न्यायखात्यात नोकरी केली. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याने ‘सेंट पीटर्झबर्ग काँझर्व्हेटरी’ या संगीत अकादमीमध्ये अन्टॉन रुब्यिनश्टाइन याच्या हाताखाली शिक्षण घेतले. सुरुवातीला त्याच्या रचना लोकप्रिय झाल्या नाहीत. पुढे १८७६ मध्ये नद्येझ्द फॉन मेक या संगीतप्रेमी श्रीमंत स्त्रीचा त्यास आश्रय लाभला व त्यामुळे संगीत रचनांवर लक्ष केंद्रित करणे त्याला शक्य झाले.

प्यॉटर चायकॉव्हस्की

चायकॉव्हस्कीच्या संगीतकृतींमध्ये बॅले, संगीतिका आणि सिंफनी ह्या रचनांचे वैपुल्य आहे. त्याच्या सहा सिंफनी रचनांपैकी पॅथेटिक (१८९३) ही सर्वांत प्रसिद्ध होय. ह्याच पद्धतीच्या छोट्या रचनांमध्ये रोमिओ अँड जूलिएट (१८७०) व फ्रांचेस्का दा रीमिनी  (१८७६) या उल्लेखनीय आहेत. पियानोसाठी त्याने तीन ‘काँचेर्टो’ रचले. त्यांतील क्रमांक एकचा सर्वोत्कृष्ट आहे. ‘अत्यंत अवघड आणि न वाजवता येण्याजोगी रचना’, असे म्हणून रुब्यिनश्टाइनने ती नाकारली होती. त्याच्या संगीतिकांमध्ये यूजीन यून्येज्यिन (१८७८) व क्वीन ऑफ स्पेड्‌स (१८९०) या प्रसिद्ध आहेत. बॅलेसाठी केलेल्या स्वान लेक (१८७६), द स्लीपिंग ब्यूटी (१८८९) आणि द नट्‌क्रॅकर (१८९२) ह्या रचना लोकप्रिय आहेत.

एकोणिसाव्या शतकात रशियामध्ये बलाक्यिर्‌रेव्ह् प्रभृती पाच बड्या संगीतकारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रनिष्ठ संगीत संप्रदाय सुरू झाला पण चायकॉव्हस्की त्यात सामील नव्हता. उलटपक्षी रशियन लोकधुनांना पाश्चात्त्य साज चढविण्याकडे त्याचा कल होता. पौर्वात्य संस्कार न झालेला एकमेव रशियन रचनाकार, असेही त्याचे वर्णन केले जाते. पाश्चात्य संगीताचा प्रवाह रशियन संगीतामध्ये आणून सोडल्याबद्दल संगीतेतिहासात त्याचे नाव अजरामर राहील.

आयुष्याच्या अखेरीस त्याने अमेरिकेला भेट दिली व न्यूयॉर्कच्या कार्नेगी सभागृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी वाद्यवृंदनिर्देशन केले. केंब्रिज विद्यापीठातर्फे त्याला ‘डॉक्टर ऑफ म्यूझिक’ ही पदवी देण्यात आली (१८९३). सेंट पीटर्झबर्ग येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Abraham, G. E. H. Ed. Tchaikovsky : A Symposium, London, 1946.

           2. Abraham, G. E. H. Tchaikovsky : A Short Biography, London, 1944.

मेदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)