मास्टर दिनानाथ

मंगेशकर, दीनानाथ : (२९ डिसेंबर १९०० – २४ एप्रिल १९४२). प्रख्यात मराठी गायकनट. संगीत रंगभूमीच्या सुवर्ण युगाचा एक प्रतिभावंत शिल्पकार. एका अनुपम मोहक अशा रससशीत गानशैलीचा कल्पक उद्‍गाता. प्रथम श्रेणीच्या मौजक्या गायकनटांपैकी एक अतुलनीय तेजस्वी व मनस्वी व्यक्तिमत्त्व. गोव्यातील मंगेशी येथे जन्म. तेथील निसर्गसम्य परिसरात दीनानाथांचे बालपण गेले. श्रीमंगेश देवस्थान येथील उपाध्ये-पुजारी गणेशपंत नवाथे (अभिषेकी) हे त्यांचे वडील व येसूबाई (पूर्वाश्रमीच्या राणे) मातोश्री होत. त्यांना उपजतच उंच, खणखणीत, सुरेल व भिंगरीसारखी फिरत असलेला असामान्य आवाज व अस्खलित वाणी लाभली होती. बालपणीच त्यांचा नावलौकिक ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ सारख्या श्रेष्ठ नाट्यसंस्थेच्या चालकांच्या कानावर गेला आणि केवळ चौदा वर्षांच्या दीनानाथांना बालगंधर्वांसारख्या अलौकिक गायकनटाची जागा भरून काढण्यासाठी पाचारण करण्यात आले. किर्लोस्कर मंडळीच्या ताजे वफा, काँटोंमें फूल इ. हिंदी-उर्दू नाटकांतील दीनानाथांच्या संगीत भूमिका विलक्षण लोकप्रिय ठरल्या. आपल्या विशाल, पाणीदार नेत्रांच्या, देखण्या व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने व निर्भर अशा मुक्त गायनाने त्यांनी रंगभूमी गाजवून सोडली. अच्युतराव कोल्हटकरांनी दीनानाथांना ‘मास्टर’ हे उपपद लावले.

मास्टर दीनानाथ हे ‘बलवंत संगीत मंडळी’ चे (स्थापना १९१८) प्रमुख मालक-भागीदार होते. या नाटक मंडळीने मनोरंजनाबरोबरच बोध, देशभक्ती, समाजसुधारणा यांचे दर्शन घडवणारी राम गणेश गडकरी, वीर वामनराव जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव शास्त्री खरे, विश्राम बेडेकर इ. अग्रगण्य नाटककारांची नवनवीन नाटके रंगूभूमीवर आणली. तसेच जुनी गाजलेली नाटकेदेखील बलवंतच्या रंगभूमीवर होत असत. ‘गंधर्व’ आणि ‘ललितकलादर्श’ अशा प्रस्थापित नाटक मंडळ्यांबरोबर बलवंतने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. दीनानाथांच्या सुरूवातीच्या ‘किंकिणी’ आणि पुढे ‘कालिंदी’ (पुण्यप्रभाव) ‘लतिका’ (भावबंधन) ‘पद्मावती’ (उग्रमंगल) ‘तेजस्विनी’ (रणदुंदुभी) वेगळ्या घाटणीचा ‘धैर्यधर’ (मानापमान) ‘सुलोचना’ (संन्यस्त खड्ग) ‘गोतम’ (ब्रह्मकुमारी) ‘शिंवागी’ (राजसंन्यास) इ. स्त्री-पुरूष भूमिका व त्यांची वेगळ्या शैलाची तडफदार गाणी नाट्यरसिकांना वेड लावून गेली. दीनानाथांच्या गाण्यांतून व अभिनयातून वीर, शृंगार, शांत हे रस प्रामुख्याने प्रत्ययास येते. मृदुलमधुर गानवृत्तीचे बालगंधर्व व प्रखर आक्रमक गानपद्धतीचे केशवराव भोसले हे चंद्र-सूर्य तळपत असतानाच तेजस्वी शुक्रासारखे दीनानाथ रंगभूमीवर आले. यांपैकी कुणाचेही अनुकरण न करता, स्वतःचे स्वतंत्र आणि चमत्कृतीपूर्ण, पण अत्यंत भावमधुर व काळजाला भिडणारे गाणे गाऊन गेले, यातच दीनानाथांचे महत्त्व व मोठेपण सामावले आहे. मराठी नाट्यसंगीतावर बालगंधर्वप्रमाणेच दीनानाथांच्या गानपद्धतीचा ठसादेखील स्पष्टपणे उमटलेला आढळतो. नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्त संगीतही दीनानाथ उत्तम प्रकारे, स्वतःच्या स्वतंत्र व कल्पक वळणाने गात असत. त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला, असे मानले जाते. त्यांनी मैफली गाजवल्या, संगीत समारोहांत स्वतःचे स्थान सिद्ध केले. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून निराळे. सुंदर गाणे रसिकांना ऐकवले. गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे ह्यांचे ते गंडाबंद शागीर्द होत तथापि इतर अनेकांची गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली घडवली. श्रीमत् शंकराचार्यांनी दीनानाथांना ‘संगीत रत्न’ म्हणून गौरवले. भारतीय ज्योतिष, रमल इत्यादींचा दीनानाथांचा सखोल व्यासंग होता. तसेच सारंगीवादन, कथ्थक नृत्य, संस्कृत साहित्य, शिकार हे त्यांचे आवडते छंद होते.

१९३४ मध्ये ’बलवंत पिक्चर कॉर्पोरेशन’ काढून त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. कृष्णार्जुन युद्ध हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी अर्जुनाची भूमिका केली. त्यांची ‘सुहास्य तुझे मनासि मोही’ यासारखी या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली.

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा व हृदयनाथ ही दीनानाथ व त्यांच्या द्वितीय पत्नी श्रीमती (ऊर्फ माई) यांची अपत्ये होत. या सर्वांच्या गळ्यात ‘दीनानाथांचा सूर’ आहे.

दीनानाथांचे कावीळ, जलोदराच्या विकाराने पुण्यात अकाली दुःखद निधन झाले.

संदर्भ : मंगेशकर, लता, संपा. मास्टर दीनानाथ स्मृति-दर्शन, मुंबई, १९५०.

जठार, प्रभाकार