जोशी, गजाननराव : (३० जानेवारी १९११ –   ). प्रख्यात व्हायोलीनवादक व ग्वाल्हेर घराण्याचे नामवंत गायक. औंध संस्थानचे दरबारगवई पं. अनंत मनोहर जोशी यांचे चिरंजीव. त्यांनी वडिलांप्रमाणेच पं. रामकृष्णबुवा वझे, उस्ताद भुर्जीखाँ आणि उस्ताद विलायत हुसेन खाँ यांच्याकडे गाण्याची तालीम घेतली. पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे ते शिष्य होत. वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांनी व्हायोलीनवादनाचे जाहीर कार्यक्रम केले. आकाशवाणीवर तसेच निरनिराळ्या संगीत परिषदांतून भाग घेतला. आकाशवाणीवर संगीत-सल्लागार म्हणून दीर्घकाळ नोकरी केली. १९५६ साली नेपाळचा व १९६० साली पाकिस्तानचा दौरा केला. त्यांना १९७२ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार लाभला. उत्तर हिंदुस्थानी संगीत व्हायोलीनवर भारदस्तपणे वाजवून या वाद्याचे स्वतंत्र कार्यक्रम करण्यात ते अग्रगण्य मानले जातात. लयकारी व रागदारीवर प्रभुत्व हे वैशिष्ट्य. ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा या तीन घराण्यांच्या गायकीचे धागे त्यांच्या गायकीत मिसळले आहेत. त्यामुळे गायक म्हणूनही त्यांना विद्वज्जनांत मान्यता आहे.

रानडे अशोक