बंदेबंदे अलीखाँ : (?-२७ जुलै १८९५). श्रेष्ठ बीनकर. ते दिल्लीजवळील किराणा (कैराना) ह्या गावाचे असून या घराण्याचे मूळ पुरूष मानले जातात. जयपूर, ग्वाल्हेर, इंदूर इ. दरबारांचा त्यांना आश्रय होता. ग्वाल्हेर घराण्याचे गवय्ये हद्दूखाँ यांचे हे जमात आणि प्रसिद्धधृपदिये जाकीरूद्दीनखाँ हे बंदे अलीखाँचे जामात. बीन (रूद्रवीणा)वादनात त्यांना अखिल भारतात ख्याती लाभली होती. अत्यंत सूक्ष्म स्वरांचे भान असणारे, विलक्षण मधुर वादक असा त्यांचा लौकिक होता. भींडेचे कर्णमधुर रसीले वादन हे त्यांचे वैशिष्ट्य. शिवाय ते धृपद गायकही होते.पं. भास्करबुवा बखले हे १८८५ मध्ये ‘किर्लोस्कर नाटक मंडळी ’ त असताना त्यांच्या गाण्याने विलक्षण मोहित होऊन बंदे अलीखाँ यांनी त्यांना स्वखर्चाने गंडा बांधला. पं.भास्करबुवा हे पुढे सु. सहा महिने त्यांच्याजवळ शिकले. बंदे अलीखाँची पत्नी व पट्टशिष्या चुन्नाबाई ही देखील त्या काळातील एकप्रख्यात गायिका होती. त्यांच्या अन्य शिष्यवर्गात चंद्रभागाबाई, बीनकार मुरादखाँ, इंदूरचे बीनकार वहीदखाँ व लतीफखाँ, देवासचे गवय्ये रजब अलीखाँचे पिता, मुगलूखाँ, बडोद्याचे वीनकार जमालुद्दीनखाँ इत्यादींचा समावेश होतो. सुप्रसिध्द गायक अब्दुल करीमखाँ हे बंदे अलीखाँचे चुलत पुतणे होते. अखेरीस बंदे अलीखाँचे वास्तव्य पुणे येथे होते व तेथेच त्यांचे निधन झाले. नव्या पुलाजवळील दर्ग्यामध्ये त्यांची कबर आहे.

देसाई, चैतन्य.