क्लॅव्हिकॉर्ड : एक पश्चिमी तंतुवाद्य. स्वरपट्टी असलेले हे वाद्य पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत चांगले लोकप्रिय होते. लहान लांबट चौकोनी पियानोसारख्या दिसणाऱ्या या वाद्यात प्रत्येक स्वरासाठी, एक वा दोन तारांवर आघात करणाऱ्या छोट्या हातोड्या असतात. कोणत्याही स्वराची पट्टी दाबली, की हातोडी आणि त्याबरोबर तारही उचलली जाते.

आधुनिक क्लॅव्हिकॉर्ड

स्वराची पट्टी जितकी जोरात दाबावी, तितक्या प्रमाणात तारेवरील ताणही वाढत असल्याने स्वराची तीव्रता, जाणवेल अशा तऱ्हेने, कमीजास्त करता येते. एखाद्या संवेदनशील वादनकार कुशल बोटफिरत करून स्वरात अधरपणा (tremolo) न आणता कंप (vibrato) आणू शकतो. तार आणि हातोडी यांतले यांतले अंतर कमीअसल्याने मृदू आवाज निर्माण करणाऱ्या या वाद्याचा पूर्वीचा इतिहास मोनोकॉर्डपर्यंत नेऊन भिडविता येतो. या शतकात क्लॅव्हिकॉर्डचे पुनरुज्जीवन होत आहे.

मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)