गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझेवझे, रामकृष्णबुवा : (? ऑक्टोबर १८७३−५ मे १९४५). महाराष्ट्रातील थोर गायक. सावंतवाडी संस्थानातील ओझरे गावी जन्म. ते दहा महिन्यांचे असतानाच त्यांचे वडील वारले. पुढे त्यांची आई त्यांना घेऊन कागल येथे आली आणि मोलमजुरी करू लागली. त्यांचे बालपण फार कष्टात व हालअपेष्टांत गेले. जेमतेम मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणापासून बुवांना गाण्याचा नाद होता. त्यामुळे कागलचे गायक बळवंतराव पोहरे यांच्याकडे त्यांचे गाण्याचे प्राथमिक शिक्षण झाले. नंतर ते मालवणला गेले आणि वर्षभर विठोबाआण्णा हडप यांच्याकडे तालीम घेतली. वयाच्या बाराव्या वर्षी रामकृष्णबुवांचे लग्न झाले. त्यानंतर गवई होण्याच्या तीव्र इच्छेपोटी त्यांनी घर सोडले व पायी प्रवास करून इंदूर गाठले. तेथे सुप्रसिद्ध पखवाज वादक नानासाहेब पानसे यांच्याकडे ते राहिले. गाणे शिकण्याची रामकृष्णबुवांची जिद्द जाणून पानसे यांनी त्यांना ग्वेल्हेरला जाण्यास सांगितले. बुवा ग्वाल्हेरला आले आणि ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध उस्ताद निसार हुसेनखाँ यांच्याकडे गाणे शिकू लागले. माधुकरी मागून, अत्यंत कष्टाने व जेथून जे मिळेल तेथून ते घ्यायचे अशा वृत्तीने त्यांनी ग्वाल्हेरला गानविद्या संपादन केली व नंतर लौकिक मिळविण्यासाठी ते बाहेर पडले. स्वामी विवेकानंद यांच्या सहवासात ते पंधरा दिवस राहिले होते. अनेक गवयांचाही त्यांनी सहवास केला. गाणे ऐकावयाचे व प्रसिद्ध कलावंतांची सेवा करून विद्या मिळवायची, अशी त्यांची वृत्ती होती. गायक म्हणून नेपाळला ते एक वर्षभर होते. आपल्या भ्रमणात ते अनेक कलावंतांना ऐकून, शक्य तेथे त्यांच्याकडून बंदिशी मिळवत व संग्रह करीत आपली विद्या संपन्न करीत होते. बारा वर्षानंतर ते परत आपल्या गावी आले. काही वर्षे गोव्यात राहून वझेबुवांनी अनेक शिष्य-शिष्या तयार केल्या. ते गाण्याच्या शिकवण्या करीत असत. ‘बलवंत संगीत मंडळी’ आणि ‘ललितकलादर्श’ या नाटकमंडळ्यांमध्ये ते संगीतगुरू म्हणून काही काळ राहिले. मुंबई, पुणे, धारवाड इ. अनेक ठिकाणी त्यांचे या तऱ्हेने वास्तव्य झाले. आयुष्याच्या अखेरीस ते पुण्यात स्थायिक झाले व तेथेच त्यांचे निधन झाले.

रामकृष्णबुवा वझे हे संगीतक्षेत्रात अत्यंत भरतीदार गवई, विद्वान, रंगतदार व बहुरंगी कलावंत असून ‘गायनाचार्य’ म्हणून मान्यता पावले होते. अनेक कलावंतांच्या सहवासामुळे त्यांनी स्वतःच्या गायकीचे एक वेगळेच वैशिष्ट्य निर्माण केले होते. त्यांचा आवाज बुलंद होता आणि लयदार आलापी, लडिवाळ बोल−उपज आणि वजनदार ताना हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते. मराठी रंगभूमीला संगीत देऊन त्यांनी नाट्यसंगीतात मोलाची भर घातली. त्यांच्या संगीत कलाप्रकाश (१९३८) या पुस्तकात त्यांच्या काही चिजा समाविष्ट आहेत, तसेच त्यांचे आत्मचरित्रही थोडक्यात दिले आहे. त्यांचे चिरंजीव शिवरामबुवा वझे, हरिभाऊ घांगरेकर, केशवराव भोसले, मा. दीनानाथ, बापूराव पेंढीरकर, भालचंद्र पेंढारकर, दन्नीबाई, तानीबाई, कागलकरबुवा वगैरे कलावंत मंडळींचा त्यांच्या शिष्यवर्गात समावेश होतो.

आठवले, वि. रा.