त्यागराज : (४ मे १७६७–६ जानेवारी १८४७). कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ व गायक–वैणिक. त्यागराज, मुथ्थुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री या प्रख्यात त्रिमूर्तींपैकी पहिला. तंजावर जिल्ह्यातील तिरुवारूर येथे जन्म. तो रामभक्त आणि श्रेष्ठ साधुवृत्तीचा महापुरुष होता. सीताम्मा व रामब्रह्मम् हे त्याचे आईवडील. तंजावरमहाराज दुसरा तुळजाजी (१७६५–८७) याच्या विनंतीनुसार रामनवमीच्या उत्सवात रामब्रह्मम् दरबारात रामायणावर प्रवचने करीत असे त्यावेळी छोटा त्यागराज श्लोकपठण करी. तथापि पुढे तंजावर दरबाराच्या आश्रयाला राहण्याची राजाची विनंती त्याने रामभक्तीस्तव नाकारली. वयाच्या अठराव्या वर्षी त्याचा विवाह झाला. तेलुगू व संस्कृत भाषांचे त्याला उत्तम ज्ञान होते. लहानपणी तो घराच्या भिंतीवर आपल्या गीतरचना लिहून ठेवी. गुरू सोंटी वेंकटरमणय्या याकडे त्याचे संगीताचे शिक्षण एका वर्षातच पूर्ण झाले. उंछवृत्तीने भिक्षा मागून तो स्वतःचा, मोठ्या शिष्यशाखेचा आणि अतिथींचा चरितार्थ चालवीत असे. तिरुवैय्यर येथील आपल्या आश्रमात तो निःशुल्क व यथापात्र शिक्षण देत असे. कांची, तिरुपती इ. सर्व महत्त्वाच्या तीर्थस्थानांची त्याने शिष्यगणांसह पदयात्रा केली. जीवनाच्या मध्यावधीतच त्याची कीर्ती इतकी दूरवर पसरली, की महान गायक–वादक, संगीतज्ञ आणि राजेमहाराजे त्याची भेट घेण्यात धन्यता मानू लागले. मृत्यूपूर्वी त्याने संन्यासाश्रम स्वीकारला. कावेरीतीरी त्याचा अंत्यसंस्कार झाला. गुरूच्या शेजारी त्याची समाधी असून तिरुवैय्यरला वर्षातून दोन वेळा (एप्रिल व जानेवारी) भव्य प्रमाणात त्यागराजमहोत्सव साजरे होतात. दोनशेहून अधिक रागांमध्ये त्यागराजाच्या सु. १,००० ‘कृती’ (रागदारीवर आधारित रचनाप्रकार) उपलब्ध आहेत. ‘सोगसुगा मृदंग तालमू’ (श्रीरंजनी राग) या आपल्या रचनेत त्याने आदर्श कृतीचे लक्षण दिलेले आहे. प्रल्हादभक्तिविजयम्, नौकाचरित्रम् आणि सीतारामविजयम् ह्या त्याच्या संगीतिका प्रसिद्ध आहेत.

त्यागराजाचा काळ कर्नाटक संगीताचा सुवर्णकाळ होता. त्यागराजाला ‘गंधर्वशारीरा’ ची (दिव्य आवाजाची) देणगी होती. तो कवी, संत व तत्त्वज्ञ असल्यामुळे त्याच्या कृतींत बुद्धी, भावना, तात्त्विक विचार, साहित्यगुण, अत्युत्कट भक्तिभाव, नादसौंदर्य, रचनाकौशल्य व भाव–राग–ताल यांचा सुरेख मेळ आढळतो. ‘नादरचने’चा आरंभ त्याच्यापासूनच झाला. रामायणाचा तो एकमेव महान ‘वाग्गेयकार’ व ‘संगीतसिद्धांती’ असून भजनांचा नवीन संप्रदायही (दिव्यनामकीर्तने व उत्सव–संप्रदाय–कीर्तने) त्याच्यापासूनच सुरू झाला. या सर्व कारणांस्तव त्याला ‘भूलोकनारद’ ही संज्ञा मिळाली. नामजप करणारे ‘भागवत’ (गायक) व ‘संगीतविद्वान’ यांचा त्याने प्रथमच समन्वय साधला. तानआलापयुक्त अशा त्याच्या कृतींत उपदेश, नीतिबोध, वंदने, संगीतप्रशस्ती इ. स्वरूपाचा आशय आढळतो. त्यागराजाची शिष्यपरंपरा फार मोठी होती. त्याचा ज्येष्ठतम शिष्प तंजावर राम राव हा मराठी गृहस्थ होता. तो त्यागराजाचा अतिशय निकटवर्ती व जवळजवळ खाजगी चिटणीसच होता. त्याला ‘चिन्न त्यागराज’ (छोटा त्यागराज) असेच म्हणत असत. त्याने त्यागराजाचा दुसरा एक शिष्य वालाजापेट वेंकटरमण भागवतर याच्या समवेत त्यागराजाचे एक चरित्र भूर्जपत्रावर लिहिले आहे.

संदर्भ : Sambamoorthy, P. Tyagaraja, New Delhi, 1967.

मंगरूळकर, अरविंद