कथाकालक्षेपम् : ‘कथाकालक्षेपम् ’ हा मनोरंजनाचा एक अनेकजिनसी प्रकार आहे. जाणकारांपासून सर्वसाधारण जनांपर्यंत सर्वांना त्याचे आवाहन पोहोचते. त्यात कंठसंगीत (गायन) आणि वाद्यसंगीत (वादन) अशा दोन्ही प्रकारच्या संगीताचा अंतर्भाव असतो. प्रसंगी थोडे नृत्यही असते. वाल्मीकी, कंबन आणि तुलसीदास यांच्या रामायणांमधली यथोचित आणि विपुल अवतरणे कथाकालक्षेपात सतत वाहती असल्यामुळे, ज्या श्रोत्यांना ही अभिजात काव्ये मुळामधून वाचण्याचे भाग्य लाभले नाही, त्यांना त्यांचे आपसूख शिक्षण मिळते. त्यागराजाची आणि अन्य थोर रचनाकारांची प्रसंगोचित गीते, खुसखुशीत निरूपणे, ⇨तिल्लाना आणि लोकगीते ह्यांचा समावेश कथाकालक्षेपात असतो. त्यामुळे एकाच वेळी संगीताच्या भिन्नरुची लोकांचे त्याने समाराधन होते. कथेच्या ओघात अनेकविध रसांचा आविष्कार अनुभवास येतो. ⇨ भागवतर जेव्हा विविध प्रसंगांचे आपल्या अस्खलित आणि परिणामकारक भाषणांनी निवेदन करतो, तेव्हा श्रोते एकाग्र मनाने आणि आस्थेने ते ऐकतात. सर्व प्रसंग आपल्या डोळ्यांदेखत घडत आहेत, असे त्यांना त्यावेळी वाटते. कथाकालक्षेपाची ‘हरिकथाकालक्षेपम्’ व ‘सत्कथाकालक्षेपम्’ अशीही दुसरी सार्थ नावे आहेत.या प्रकाराला उत्तर भारतात ‘कीर्तन ’ अशी संज्ञा असून ते करणाऱ्याला ‘कीर्तनकार’ म्हणतात. [→कीर्तन-२]कथाकालक्षेपाचे विद्याविषयक,सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक मूल्य अत्यंत श्रेष्ठ गायकांनाही मान्य झालेले होते आणि काहींनी तर त्याचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला होता.
आधुनिक कथाकालक्षेपाला दक्षिण भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात परिणत रूप प्राप्त झाले. ते देण्याच्या बाबतीत तंजावूर कृष्ण भागवतर (१८४७ — १९०३) हे प्रमुख होते, म्हणून त्यांचे वर्णन ‘आधुनिक कथाकालक्षेपाचे जनक’ असे यथार्थपणे करतात. पुराणपठनाच्या अगोदरच रूढ असलेल्या परंपरेमुळे कथाकालक्षेपामधील पांडित्याचा दर्जा कायम राहिला. १८६० सालाच्या सुमारास मोरकरबुवा आणि रामचंद्रबुवा यांसारखे ग्वाल्हेरचे कीर्तनकार तंजावरला आले आणि त्यांनी मराठी कीर्तने त्यांच्या सुश्लिष्ट संगीतासकट लोकप्रिय केली. त्यावेळी कृष्ण भागवतर यांनी मराठी कीर्तनशैलीतल्या सौंदर्यस्थळांचा अभ्यास करून त्यांतील उत्तमोत्तम घटकांचा तद्देशीय तमिळ शैलीशी आणि पद्धतीशी मेळ घालून आधुनिक कथाकालक्षेपाची सिद्धी केली. मोहक संगीताची आणि उदात्त विचारांची त्यागराजकृत गीते ही आदर्श निरूपणासाठी उपयोगी पडली. आवश्यक तेथे कृष्ण भागवतरांनी स्वतःच निरूपणे रचिली. मुव्वलूर सभापती अय्यर यांनी तेलुगूमध्ये जी काही रमणीय निरूपणे रचिली होती, त्यांचाही त्यांनी या कामी उपयोग करून घेतला. संगीत-नृत्यादी कलांचे उत्तम ज्ञान आणि निवेदनाची व विवेचनाची अद्भुत शैली यांमुळे कृष्ण भागवतरांनी कथाकालक्षेपाला त्याच्या उच्च नीतिप्रयोजनासह पहिल्या दर्जाच्या मनोरंजनप्रकाराचे स्थान प्राप्त करून दिले. गोपालकृष्ण भारती यांनी लिहिलेल्या नंदनार ह्या शैव संतावरील निरूपणावर कृष्ण भागवतरांनी जी कथाकालक्षेपरचना केली, ती तर इतकी हृदयंगम वठली, की स्वतः गोपालकृष्ण भारती यांनीच त्यांच्यावर स्तुतीचा वर्षाव केला म्हणून कृष्ण भागवतर यांना यथार्थतेने ‘दक्षिण भारतीय कथाकालक्षेपाचा मार्गदर्शी ’ म्हणतात. ह्या कलेमध्ये त्यांनी क्रांती घडवून तिला मनोवेधक स्वरूप दिले. मूळच्या कथाकालक्षेपामध्ये भक्तिरस हा प्रधान होता कृष्ण भागवतरांनी तो नवरसांनी संपन्न, रोचक केला आणि त्याला नवा रंग दिला.
निरूपणासाठी घेतलेल्या विषयानुसार आधुनिक कथाकालक्षेप प्रायः तीनचार तासांच्या अवधीचा असतो. त्यात तेलुगू, संस्कृत, तमिळ, कन्नड, मराठी आणि हिंदी या भाषांमधील गीते असतात तसेच त्यातील कोटिबाज उपाख्यानांनी आणि हलक्या-फुलक्या गीतांनी त्याचे विनोदपूर्ण भाग सजलेले असतात.
रामायणातील व महाभारतातील कथांव्यतिरिक्त कथाकालक्षेपामध्ये हरिश्चन्द्रोपाख्यान, नलोपाख्यान, चन्द्रहासोपाख्यान, उषाविवाह,रुक्मिणीविवाह आणि वत्सलाविवाह ह्यांसारखी अभिजात स्वरूपाची आख्यानोपाख्याने येतात. भारतीय संतांपैकी कबीर, तुलसीदास, पुरंदरदास, भद्राचलम् रामदास आणि त्यागराज यांच्या चरित्रांनी कथाकालक्षेपाच्या स्फूर्तीसाठी सामग्री पुरविलेली आहे. त्रेसष्ट शैव तमिळ संतांची चरित्रेही कथाकालक्षेपामध्ये गोवितात.
संस्कृत आणि अन्य भाषा यांमधील कीर्तनांव्यतिरिक्त या धर्मपर कार्यक्रमात काही वैशिष्ट्यपूर्ण संगीतप्रकारही संगीताच्या साथसंगतीसह ऐकावयास मिळतात. ‘निरूपणम्’ हा त्यांतील सर्वांत महत्त्वाचा. वेधक आणि उडत्या स्वरावलीचे हे एक छोटेखानी गीत असते. त्यातील साहित्य सरल शैलीचे असून कीर्तनातल्या विशिष्ट विषयाशी अथवा कथावस्तूशी ते संबद्ध असते. तेलुगू भाषेमधली कितीतरी निरूपणे इतकी आकर्षक आहेत, की त्यांचा सर्वदूर प्रचार आणि अभ्यास व्हावयाला पाहिजे. मेरटटूर वेंकटराम शास्त्री आणि तेलुगूमधील पदांचा रचनाकार मुव्वलूर सभापती अय्यर यांनी अनेकविध चरित्रांसाठी (गोष्टींसाठी) कितीतरी सुंदर निरूपणे रचिलेली आहेत. सभापती अय्यर यांची कवित्वशक्ती उच्चतर दर्जाची होती. तीवरून त्यांना चिन्न (छोटा) त्यागराज अशी पदवी मिळाली.
निरूपणाची संगीतरचना अगदी साधी आणि स्वरावली आकर्षक असते. तीत ‘संगती’ (स्वरवैचित्र्ये) नसतात. मात्र ⇨पल्लवी आणि ⇨अनुपल्लवी हे विभाग असतात. कधीकधी त्यात ⇨चरण हा विभाग देखील असतो. कथाकालक्षेपामधल्या उपगायकांपाशी पुष्कळ निरूपणांचा मोठा संग्रह असावा लागतो. निरूपणे तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये आहेत संस्कृतमध्ये मात्र ती नाहीत.
कथाकालक्षेपाच्या प्रारंभी जी नांदीसदृश आवाहनात्म गीते गायिली जातात, त्यांच्या समाहाराला ‘पंचपदी’ (पाच पदांचा – भक्तिगीतांचा समाहार) अशी संज्ञा आहे. यात आर्यांव्यतिरिक्त श्लोक, पद्ये, विरुत्तमे, अभंग, दोहरे, भजने, ओव्या, अष्टपद्या, तरंग, चूर्णिका, दण्डक, अष्टक, एकडा पदे, अंजनीगीते आणि नामावली यांचा समावेश असतो. त्याबरोबरच कथाकालक्षेपामध्ये सवाई, खडका, लावणी, साकी, दिंडी, देवरनाम, तेवार, तिरुवाछग आणि तिरुप्पुगळ्ळ हे प्रकारही गायिले जातात. उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी कथाकालक्षेपामध्ये तिल्लानाही गातात.
याच्या पूर्वभागात एक गीत येते. त्याला ‘प्रथम-पद ’ म्हणतात. प्रथम-पद हे सूत्रभूत गीत असून पुढे येणाऱ्या कथावस्तूचे महत्त्व त्यात साररूपाने सांगितलेले असते.
सांबमूर्ती, पी. (इं.) मंगरूळकर, अरविंद (म.)