सदारंग-अदारंग : (अठरावे शतक). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ख्याल रचनाकारांची जोडी. ⇨ख्याल गायनप्रकाराचे व ख्याल नामक गीतरचनांचे ते प्रवर्तक मानले जातात. त्यांची मूळ नावे न्यामतखाँ (सदारंग) व फिरोजखाँ (अदारंग) असून, त्यांनी गीतरचनांसाठी ‘ सदारंग-अदारंग ’ ही टोपणनावे घेतली. दिल्लीचा संगीतशौकीन बादशहा महंमदशहा (कार. १७१९-४८) ‘ रंगीले ’ याच्या दरबारी हे गायकबंधू (काहींच्या मते पितापुत्र) उदयास आले. ते उत्तमपैकी बीनवादक होते. अकबरकालीन नौबतखाँ या बीनकारांचे हे दहावे वंशज होत. त्यांनीस्वतंत्र वादन न करता दरबार गायकांना साथ करावी, असे फर्मान बादशहाने काढले. तसेच दरबारात धृपदियांकडून (गायक) बीनकारांची (वादक) सदैव मानखंडना होत असल्याने त्यांनी रागावून दिल्ली सोडली. पुढे धृपदांच्या नमुन्यांवर, पण भिन्न स्वरूपाची व अनेक रागांत ‘ ख्याल ’ नावाची नवीन प्रकारची शेकडो गीते रचून, त्यांनी ती आपल्या शिष्यांकडून दरबारात गाऊन घेऊन पुन्हा प्रतिष्ठा मिळविली. ख्याल या प्रकाराला नीटस घाट देऊन, शेकडो चिजा रचून त्याचा पद्घतशीर प्रसार करण्याचे कार्य सदारंग-अदारंग यांनी केले. ह्यांचे ख्याल अदयापही मैफलींमध्ये प्रतिष्ठेच्या रचना म्हणून गायिले जातात. यांच्या कर्तृत्वामुळे ख्यालगायन शिष्टसंमत होऊन धृपदगायन-परंपरा कमी झाली.

संदर्भ : जोशी, लक्ष्मण दत्तात्रेय, संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास, पुणे, १९३५.

मंगरूळकर, अरविंद