व्हायोलिन : स्वतंत्रपणे साथसंगतीसाठी वा वृंदवादनासाठी गजाने वाजविण्याचे युरोपीय तंतू-वाद्य. व्हायोलिन हे एक वाद्यकुलही असून त्यात अनेक तत्सम वाद्यांचा समावेश होतो. व्हायॉल हे व्हायोलिनच्याच जातीचे दुसरे वाद्य सामान्यत: सहा तारांचे असून ते दांडी वर व कोठा (बॉडी) खाली करून दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून वाजवितात. व्हायोला हेही याच कुलातील आणखी एक वाद्य आहे. पण याचा आकार व्हायोलिनपेक्षा थोडा मोठा असतो व नाद मंद्र असतो. याचे स्वर मध्य षड्जाच्या खाली सुरू होऊन मंद्र षड्जाला संपतात. यासारखे एक तार असलेले व गजाने वाजवले जाणारे तंत्रीवाद्य कर्नाटक राज्यातील अगस्त्येश्वर मंदिरातील तसेच चिदंबरम् येथील नटराज मंदिरातील शिल्पांत आढळते (इ.स. बारावे शतक). युरोप मध्ये नृत्याच्या साथीसाठी वापरले जाणारे व मूलतः पौर्वात्य असलेले रेबेक, तसेच सारिंदा व रबाब या तीनतारी व गजाने वाजविण्याच्या वाद्यातून व्हायोलिनची उत्क्रांती झाल्याचे मानतात.
षड्ज-पंचम-भावाने लावलेल्या चार तारांचे, प्रचलित स्वरूपाचे व्हायोलिन १५५० ते १६०० च्या दरम्यान उत्तर इटलीत तयार झाले. प्रारंभी नृत्याच्या साथीसाठी आणि हलक्याफुलक्या संगीतासाठी त्याचा वापर होई. नंतर मात्र अभिजात संगीतात त्याला मानाचे स्थान मिळाले. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड व चेकोस्लाव्हाकिया या देशांतही या वाद्याची निर्मिती होई आणि होत आहे. ‘सिंफनी’ वाद्यवृंदात व्हायोलिनची सुरुवातीपासून शेवटपर्यंत महत्त्वाची कामगिरी असते. इटलीमधील क्रिमोनाचे आमाती कुटुंबीय, स्ट्राडिव्हारी, ग्वारन्येअरी ऊर्फ डेल जेसू व ब्रेश येथील बर्तोलोती ऊर्फ गास्पारो दा सालो वा माद्जिनी हे काही सुप्रसिद्ध व आजही आदर्श मानलेले वाद्य-निर्माते होत.
हे वाद्य लहानमोठ्या सत्तर अवयवांच्या जटिल रचनेचे आणि मजबूतही असते. सिंहकटीमुळे सर्व तारांवर गज चालविणे सुलभ होते. ध्वनिपेटिकेचे खालवरचे बहिर्गोलाकार फुगवटे वाद्याची मजबुती आणि आवाजाचा दर्जा वाढवितात. याच्या निरनिराळ्या भागांसाठी सिकॅमूर, पाइन, अबनूस, रोझवुड अशा कठीण व मऊ लाकडांचा वापर करतात.
व्हायोलिनचे प्रमुख भाग पुढीलप्रमाणे होत : (१) बहिर्गोल फुगवट्याचा तळ व वरच्या तक्त्यांची (नादपटांची) बाजूच्या फासळ्यांनी जोडलेली चपट्या व खास आकाराची ध्वनिपेटिका. वरच्या तक्त्यावरील उलट्या-सुलट्या तिरप्या ‘एफ्’ सारखी ध्वनुरंध्रे. (२) वादनपट, वाद्यग्रीवा व तिच्या टोकाजवळचे खुंटाळे. (३) तारांसाठी तारदान व खीळ. (४) तारघोडी. (५) तारघोडीच्या खाली ध्वनिपेटिकेत उजव्या बाजूस ध्वनिस्तंभ व डाव्या बाजूस, नादपटाच्या आतल्या बाजूस, वाद्याला समांतर अशी लावलेली आधारशलाका. याच्यामुळे निर्मित नादाचा जोरकसपणा व धुमारा वाढतो.
याच्या तारा प्रायः तातींच्या आणि धातूच्या तारेने वेढलेली मंद्रतार अशा असतात. तारा धातूंच्याही वापरतात. या वाद्यात स्वरधर्मात फरक करणारा ‘म्यूट’ चिमटा, वादकाच्या हनुवटीसाठी आधार वगैरे सुधारणा घडून आल्या. वादनाच्या गजातही अनेक सुधारणा झाल्या. फ्रांस्वा तूर्त (१७४७-१८३५) याने व्हायोलिनचा प्रचलित वक्राकार गज विकसित केला. तसेच गजाची लांबी, घोड्याच्या केसांचा ताण कमीजास्त करण्याचे मळसूत्र यांतही अनेक बदल झाले.
जुन्या वाजविण्याच्या पद्धतीतही फरक होऊन आजचा पाश्चिमात्य वादक हे वाद्य उभ्यानेच वाजवतो. मोंतेव्हेर्डी याने १६०० सालीच या वाद्याचा उपयोग केला असला तरी फोंताना याने १६३० मध्ये खास व्हायोलिनसाठी स्वरलेखन केले. पुढे मारीनी, फारीना, विवाल्डी, कोरेल्ली, फॉन बायबर, वॉल्टर, ⇨ बाख, ⇨ मोट्सार्ट, ⇨ बेथोव्हन या इतर प्रसिद्ध रचनाकारांनी या वाद्यासाठी स्वरलेखन केले आहे. व्हिओती कुल्झर, रॉद, क्रॅमर, द बेरिओ, नीकोलो पागानीनी, स्याये, ⇨ येहूदी मेन्युइन हे काही प्रसिद्ध व्हायोलिन-वदक होत.
भारतीय संगीतातील सर्वच बारकावे या वाद्यातून प्रकट करता येतात, यामुळे हिंदुस्थानी व कर्नाटक या दोन्ही संगीतपद्धतींत साथीसाठी व स्वतंत्र वादनासाठी एकोणिसाव्या शतकापासून हे वाद्य प्रचारात आहे. भारतातील फर लाकूड व बांबू वापरून वाद्याची निर्मितीही झाली आहे. पाश्चात्त्य उभ्या वादनपद्धतीऐवजी, भारतीय वाद्यपद्धतीत हे वाद्य वाद्यग्रीवा जमिनीवर टेकवून व वाद्य छातीला लावून, बसून वाजवितात. ⇨गजाननराव जोशी, श्रीधर पार्सेकर, विष्णुपंत जोग, पुष्पलता कुलकर्णी, डी.के. दातार, एम्. राजम् हे हिंदुस्थानी पद्धतीतील वादक तर बालुस्वामी दीक्षितर, वडिवेलू, पुभुस्वामी, सुब्बारायर, नारायणस्वामी व गोविंदस्वामी पिल्ले हे कर्नाटक पद्धतीतील काही प्रसिद्ध वादक होत.
पहा : चेलो डबल बेस वाद्य व वाद्यवर्गीकरण.
गोंधळेकर, ज. द.