हस्सूखाँ : (१७९०–१८५५). एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एक प्रख्यात ख्याल गायक व कादरबक्ष यांचे ज्येष्ठ चिरंजीव. यांच्या पूर्वायुष्याविषयी तसेच जन्ममृत्यूंच्या तारखांविषयी फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. हस्सूखाँ आणि त्यांचे धाकटे बंधू हद्दूखाँ यांना आज प्रचलित असलेल्या ग्वाल्हेर गायकीचे जनक मानले जाते. यांचे कुटुंब मूळचे लखनौचे. वडील कादरबक्ष यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे आजोबा नथ्थन पीरबक्ष त्यांना उदरनिर्वाहासाठी ग्वाल्हेर येथे घेऊन गेले. त्यांनीच त्यांचा सांभाळ केला. हस्सूखाँ आणि हद्दूखाँ या दोन्ही गायक बंधूंचा उल्लेख अनेक वेळा एकत्रच आलेला दिसतो.

 

संपूर्ण देशात ⇨ ग्वाल्हेर घराणे ख्याल गायनाचे महत्त्वाचे केंद्रमानले जात होते. ग्वाल्हेरचे तत्कालीन गुणग्राहक महाराज जनकोजी शिंदे (कार. १८२७–४३) यांचे इतर कलांबरोबरच संगीतकलेस खूप प्रोत्साहन होते. त्यांच्या दरबारात अनेक कलाकार-संगीतकार आश्रयास होते. तसेच देशातील अनेक प्रख्यात ख्याल गायक, धृपदिये, वादक प्रसंगोपात्त हजेरी लावत असत.

 

नथ्थन पीरबक्ष आणि त्यांच्या दोन्ही नातवंडांना महाराजांनी आपल्या दरबारात प्रेमाने आश्रय दिला व त्यांची सर्व व्यवस्था केली. त्या वेळी त्यांच्या दरबारात ‘कव्वाल-बच्चेङ्ख शैलीचे बडे महम्मदखाँ हे प्रख्यात दरबार-गायक होते. हस्सूखाँ आणि हद्दूखाँ यांना बडे महम्मदखाँ यांनी ख्याल गायकी शिकवावी, अशी महाराजांची इच्छा होती तथापि महम्मदखाँ यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा महाराजांनी महम्मदखाँ यांचे गाणेया दोन्ही भावांना पडद्याआडून चोरून ऐकता येईल, अशी व्यवस्थाकेली. जन्मतःच प्रतिभा घेऊन आलेल्या हस्सूखाँ यांनी अवघ्या सहा महिन्यांत त्यांची फक्त गायकी आत्मसात केली नाही, तर तिला स्वतःच्या विचारांची जोड देऊन एक वेगळी शैली निर्माण केली.

 

यथावकाश बडे महम्मदखाँ यांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यांना अर्थातच हे सर्व रुचणारे नव्हते. त्या दोन्ही भावांची गाण्यातील प्रगती पाहून त्यांच्यातील मत्सर जागृत झाला. एका मैफलीत गात असताना हस्सूखाँ यांनी महम्मदखाँ यांच्या सांगण्यावरून ‘कडक बिजली ङ्खची तान अत्यंत तयारीने पेश केली. महम्मदखाँ यांनी मुद्दामच ती त्यांना पुन्हा गाण्याची आज्ञा केली. असे म्हणतात, की हा अवघड प्रकार असलेल्या गवयांनाही एकदाच गाता येतो. दुसऱ्यांदा ती तान गाताना फुप्फुसावर आलेल्या विचित्र ताणामुळे त्यांना रक्तस्राव झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी वदंता आहे.

 

हस्सूखाँ आणि त्यांचे बंधू हद्दूखाँ यांनी विकसित केलेली गायकी आज ग्वाल्हेर गायकी म्हणून ओळखली जाते. ‘अष्टांग परिपूर्ण’ (म्हणजे आलाप, बोल आलाप, तान, बोल तान, लयकारी, गमक, मींड आणि मुरकी या वैशिष्ट्यांचा समावेश असलेली) अशी ही गायकी पुढे बाबा दीक्षित, वझेबुवा, निसार हुसेनखाँ, रहिमतखाँ, अनंत मनोहर, पं. मिराशीबुवा, पं. वि. दि. पलुसकर इ. अनेक मातब्बर कलाकारांनी आपल्या प्रतिभेने अधिक समृद्ध केली. हस्सूखाँ यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यांमध्ये त्यांचा मुलगा गुल-ए-इमामखाँ आणि पं. वासुदेवबुवा जोशी (पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे गुरू) यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

 

पहा : ग्वाल्हेर घराणे.

 

संदर्भ : देशपांडे, वा. ह. घरंदाज गायकी, मुंबई, १९६१.

कुलकर्णी, रागेश्री अजित