राल्फ व्हॉन विल्यम्सव्हॉन विल्यम्स, राल्फ : (१२ ऑक्टोबर १८७२ – २६ ऑगस्ट १९५८). प्रख्यात इंग्लिश संगीतरचनाकार. डाउन अँपनी, ग्लास्टरशर येथे जन्म. चार्टरहाउस स्कूल, लंडन ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्यूझिक, लंडन असा शैक्षणिक प्रवास झाला.

त्याच्या महत्त्वाच्या सिंफनी रचना पुढीलप्रमाणे : अ सी सिंफनी (१९१०, आधार वॉल्ट व्हिटमनच्या कविता), अ लंडन सिंफनी (१९१४), पास्टोरल सिंफनी (१९२२), सिनफोनिआ अंटार्क्टिका (१९५३). या सर्वांत इंग्लिशपण जाणवते, असे तज्ञांचे मत आहे. शिवाय मोठ्या वाद्य व गायक वृंदासाठी त्याने रचलेल्या कृतीही सर्वमान्य आहेत. उदा. टोअर्ड द अननोन रीजन (१९०७), फाईव्ह ट्यूडर पोर्ट्रेट्स (१९३६). यांतही खास देशाचे वळण होतेच. याशिवाय काही स्फुट गीते व संगीतिकांनीही त्याला इंग्लंडमध्ये एक खास स्थान मिळवून दिले.

त्याने इंग्लंडमधील लोकगीतांचा संग्रह करण्यास १८९० च्या आसपास कसोशीने आरंभ केला. त्याचप्रमाणे ट्यूडर काळातील संगीताचाही त्याने पाठपुरावा केला. या दोन्ही देशी प्रभावांनी त्याला पश्चिमात्य संगीतरचनांतील रूढ युरोपियन प्रवाहापेक्षा वेगळे वळण घेता आले. त्याच्या बाबतीत आणखीही एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. ब्रिटनमधील जनसंगीत (पॉप म्यूझिक) चळवळीविषयी त्याने कधी उच्चभ्रू तुच्छता दाखविली नाही. महोत्सवी स्पर्धा चळवळ (काँपिटिशन फेस्टिव्हल मूव्हमेंट) तसेच लोकनृत्य चळवळ (फोक-डान्स मूव्हमेंट) यांसारख्या लोकप्रिय संगीतातील चळवळींतही त्याचा सहभाग असे. द इंग्लिश हिम्नॉलचे त्याचे संपादन (१९०४-०६) हाही यत्न देशी संगीताचा आग्रह दर्शवितो. १९३५ मध्ये त्याला ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ मिळणे हा काही योगायोग नव्हे. लंडन येथे त्याचे निधन झाले.

रानडे, अशोक दा.