डबल बेस : पश्चिमी वाद्यवृंदातील व्हायोलीन गटातील सर्वांत मोठे व खालच्या पट्टीचे एक तंतुवाद्य. हे सर्वसाधारणतः चार तारांचे असते कधीकधी पाच ताराही असतात. गजाने तारा घासून व केवळ तारा छेडून (पिस्सिकातो) अशा दोन्ही प्रकारांनी ते वाजविले जाते. ते स्वतंत्र वाद्य म्हणून क्वचित वाजविले जाते, त्याचप्रमाणे ‘चेंबर म्युझिक’ साठीही कधीकधी त्याचा वापर केला जातो. हे वाद्य सोळाव्या शतकापासून प्रचारात आले. बेथोव्हन (१७७०–१८२७) या जर्मन संगीतकाराने आणि त्याच्या उत्तरकालीनांनी या वाद्यास ‘सिंफनी’ वाद्यवृंदामध्ये खास प्रतिष्ठा मिळवून दिली. दोमेनिको द्रागोनेत्ती (१७६३–१८४६) व सर्ज कूसेव्हिट्स्की (१८७४–१९५१) हे या प्रकारातील कुशल वादक होत. त्यांनी काही ‘काँचेर्टो ’ ही सादर केले.

रानडे, अशोक